Press "Enter" to skip to content

इंदिरा गांधींच्या मृतदेहासमोर राहुल आणि राजीव गांधी ‘कलमा’ पठण करत होते?

सोशल मीडियावरील व्हायरल फोटोत माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) एका अंत्ययात्रेत नमाज पढत असल्यासारखे दिसताहेत. फोटोत त्यांच्या बाजूला माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) देखील दिसताहेत. दावा केला जातोय की हा फोटो इंदिरा गांधी यांच्या अंत्ययात्रेदरम्यानचा (Indira Gandhi funeral) असून त्यावेळी राजीव गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) मुस्लिम रिवाजाप्रमाणे ‘कलमा’ पठण करत होते.

Advertisement

“बड़ी मुश्किल से यह फोटो मिली है इंदिरा की लाश के सामने राहुल और राजीव गांधी कलमा पढ़ रहे हैं फिर भी हमारे देश के लोगो को लगता है कि यह लोग हिंदू हैं” अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

  • व्हायरल फोटो नेमका कधीचा आणि कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. ‘खान अब्दुल गफ्फार खान-शांतिदूत’ या लेखात हा फोटो वापरण्यात आला असल्याचे आम्हाला बघायला मिळाले.
  • फोटोच्या कॅप्शननुसार राजीव गांधी १९८८ साली ‘बाचा खान’ (Bacha Khan) यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहिले होते. राजीव गांधी त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते आणि ते पेशावरमध्ये बाचा खान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहिले होते. 
Source: tawarikhkhwani.com

कोण होतेबाचा खान‘?

  • ‘बाचा खान’ किंवा ‘बादशाह खान’ म्हणजेच खान अब्दुल गफ्फार खान (Khan Abdul Ghaffar Khan) होत.
  • वायव्य सरहद प्रांतातील सर्वात प्रभावी नेते असणारे बादशाह खान हे गांधीजींचे अनुयायी होते. गांधीजींवर त्यांची अपार निष्ठा होती. ते गांधीजींच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक समजले जात असत.
  • गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वावरच त्यांनी आपला लढा उभारला होता. ते सरहद गांधी (Sarhad Gandhi) म्हणून देखील ओळखले जात असत.
  • खान अब्दुल गफ्फार खान यांनी १९२९ साली ‘खुदाई खिदमतगार’ नावाची संघटना स्थापन केली होती. या संघटनेने स्वातंत्र्यलढयात कायमच मुस्लिम लिगचा धार्मिक विभाजनाचा अजेंडा नाकारत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सक्रिय साथ दिली.
  • त्यामुळे फाळणीनंतर ज्यावेळी त्यांना पाकिस्तानात जावे लागले, त्यावेळी ते प्रचंड दुःखी झाले. याविषयी त्यांनी गांधीजी आणि काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वाकडे आपली तक्रार देखील नोंदविली होती.
  • भारत सरकारने १९८७ साली देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन खान अब्दुल गफार खान यांचा सन्मान केला. २० जानेवारी १९८८ रोजी वयाच्या ९८व्या वर्षी पाकिस्तानातील पेशावर येथे बादशाह खान यांचे निधन झाले. मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार अफगाणिस्तानातील जलालाबाद येथे त्यांचा मृतदेह दफन करण्यात आला.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर खान अब्दुल गफ्फार खान यांच्यावर फिल्म्स डिव्हिजनने बनवलेली डॉक्युमेंट्री बघायला मिळते. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून खान अब्दुल गफ्फार खान यांच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू उलगडतात.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो दिशाभूल करणारा आहे. व्हायरल फोटोमध्ये राजीव गांधी दिसत असले तरी तो फोटो इंदिरा गांधी यांच्या अंत्ययात्रेदरम्यानचा (Indira Gandhi funeral) नसून ‘सरहद गांधी’ उर्फ ‘खान अब्दुल गफ्फार खान’ यांच्या अंत्ययात्रेदरम्यानचा आहे. 

खान अब्दुल गफ्फार खान यांचा २० जानेवारी १९८८ रोजी पाकिस्तानातील पेशावरमध्ये मृत्यू झाला होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहिले होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ३१ ऑक्टोबर १९८४ रोजीच मृत्यू झाला होता.  

हेही वाचा- इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव ‘फिरोज गांधी’ नव्हे ‘फिरोज खान’ होते? वाचा सत्य!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा