Press "Enter" to skip to content

पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू महिलेवर जीवघेणा हल्ला? वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक पुरुष एका महिलेच्या केसांना पकडून तीला जमिनीवरून ओढून घेऊन जात असल्याचे बघायला मिळतेय. त्यानंतर इतरही अनेकजण त्या महिलेला लात, चप्पल आणि काठ्यांनी मारहाण करत असल्याचे बघायला मिळतेय. हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जातोय की व्हिडीओ पाकिस्तानातील असून पीडित महिला हिंदू समुदायातील आहे. केवळ हिंदू असल्याने तिला अमानुष मारहाण केली जातेय.

Advertisement

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट केलाय.

‘झी हिंदुस्तान’च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देखील हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता.

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधल्या असता ‘जिओ न्यूज’ या पाकिस्तानी न्यूज वेबसाईटवर 9 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार घटना पाकिस्तानातील सियालकोटमधील आहे. जमिनीच्या वादातून वृद्ध महिलेला अमानुष मारहाणीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

geo tv news screenshot
Source: geo tv

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सियालकोट पोलिसांनी 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून 9 आरोपींना अटक केली होती. आरोपींमध्ये 4 महिलांचा देखील समावेश होता. वृद्ध महिलेने जिओ न्यूजशी बोलताना गेल्या 13 वर्षांपासूनच्या जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले होते. संपूर्ण बातमीमध्ये कुठेही या प्रकरणात कुठलाही धार्मिक तणावाचा मुद्दा असल्याचा उल्लेख बघायला मिळाला नाही.

‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या वेबसाईटवर देखील 10 जानेवारी 2022 रोजी यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीनुसार मुनव्वर कंवल आणि नसरीन बीबी यांच्यात वाद झाला होता. नसरीन बीबी आणि तिच्या नातेवाईकांकडून मुनव्वर कंवलला बेदम मारहाण केली गेली. नसरीनच्या भावांनी मुनव्वरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

पाकिस्तानामध्ये कार्यरत असलेल्या ‘बीबीसी उर्दू’च्या पत्रकार सारा अतीक यांनी पीडितेशी संपर्क केला होता. सारा अतिक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडिता आणि आरोपी दोन्हीही मुस्लिम समुदायातील आहेत. या प्रकरणात कुठलाही धार्मिक अँगल नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडिओतील पीडित महिला आणि या प्रकरणातील आरोपी दोन्हीही मुस्लिम समुदायातील आहेत.

हेही वाचा- इंदौरमध्ये भर रस्त्यावर तरुणीला चाकुचा धाक दाखवणारा तरुण मुस्लिम नाही!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा