सोशल मीडियावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नावाने एक भला मोठा मेसेज व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना साथीच्या समाप्तीची तारीख जाहीर केली आहे. संघटनेने २०२२ सालच्या सुरुवातीस कोरोना महामारी संपणार असल्याचे जाहीर केले आहे.
कोरोना विषाणूवरील प्रभावी उपचारांसाठी जर्मनीच्या रिजीबेल आणि अमेरिकेच्या मर्क यांनी मोनापिनावीर नावाचे जादुई औषध विकसित केले असून या कॅप्सूलच्या तीनही टप्प्यातील चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना आता संपल्यात जमा असल्याचा दावा करण्यात येतोय.
पडताळणी:
अवघे जग कोरोनाशी लढताना मेटाकुटीला आलेले असताना जागतिक आरोग्य संघटनेकडून जर कोरोना संदर्भातील अशा प्रकारची कुठली घोषणा करण्यात आली असती तर साहजिकच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये याविषयीच्या बातम्या बघायला मिळाल्या असत्या. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या समाप्तीची घोषणा केल्याची कुठलीही बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर देखील अशा प्रकारची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. याउलट जागतिक आरोग्य संघटनेच्या ट्विटर अकाऊंटवरून २१ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सतर्कतेचा इशाराच देण्यात आला आहे.
जगभरात सगळीकडे कोरोनाचे लसीकरण झाले नाही, तर कोरोना महामारी कुठेच जाणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
त्यानंतर डब्ल्यूएचओच्या अकाउंटवर आम्हाला संघटनेच्या आपत्कालीन आरोग्य कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डॉ.माईक रायन (Dr. Mike Ryan) यांचा एक व्हिडिओ मिळाला. व्हिडिओमध्ये डॉ. रायन सांगतात की,
“सध्याचा आपला सर्वात मोठा शत्रू कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर आनंदी किंवा समाधानी असण्याची भावना आहे. आपण लक्षात घेतले पाहिजे की अजूनही कोरोना विषाणू आपल्यामध्येच आहे. कोरोनाशी लढण्यासाठी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे”
व्हायरल मेसेजमध्ये मोनापिनावीर नावाच्या औषधीचा उल्लेख आहे. याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की औषधीचं नाव मोनापिनावीर नसून मोलनुपिराविर (Molnupiravir) आहे. रिजबॅक बायोथेरप्यूटिक्स एलपी आणि मर्क अँड कंपनीने हे औषध विकसित केले आहे. हे औषध कोरोनावरील उपचारांसाठी वापरले जाऊ शकते. परंतु ते कुठले जादुई औषध असल्याच्या दाव्यांना काहीही आधार नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने २०२२ सालच्या सुरुवातीस कोरोना महामारी संपणार असल्याचे जाहीर केल्याचा दावा चुकीचा आहे. संघटनेकडून अशा प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा- ‘कोव्हीड१९’ची लस घेतल्याने भारतीय सैनिक बेशुद्ध पडताहेत?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment