हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे निधन झाल्यापासून सोशल मीडियात त्यांच्याविषयी विविध दावे व्हायरल होताहेत. त्यापैकीच काही म्हणजे दिलीप कुमार आणि पत्नी सायरा बानो (Saira Banu) यांनी नौदल जवानांच्या विधवांसाठी उभारलेल्या NGOमध्ये भ्रष्टाचार केला होता. तसेच त्यांच्या घरात रेडीओ ट्रान्समीटर सापडलेले, ते पाकिस्तानी एजंट (Pakistani spy) होते.
व्हायरल मेसेज मधील ३ मुख्य दावे:
१. नौदल हुतात्मा जवानांच्या विधवांसाठी सरकार मार्फत उभ्या केलेल्या NGO च्या सदस्य आणि नंतर प्रमुख झालेल्या सायरा बानो यांच्या मार्फत पती युसुफ खान म्हणजेच दिलीप कुमार यांनी तब्बल १४० करोड रुपयांचा भ्रष्टाचार केला.
२. 1971 च्या हिंदुस्थान पकिस्तान युद्धा आधी याच युसुफ – सायरा च्या बंगल्याच्या तळघरामधुन हाय फ्रीक़्वेंसी रेडीयो ट्रांसमीटर पकडले गेले होते. दिलीप कुमार (Dilip Kumar) पाकिस्तानी एजंट (Pakistani spy) होते.
३. युसुफ खान उर्फ दिलीप कुमार ने मरताना 98 करोड रुपये रोख, स्थावर जंगम मालमत्ता वक़्फ बोर्ड ला दिली.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सचिन झगडे, राजेश दुर्गे, रविंद्र खांबेकर, प्रवीण फडणीस, प्रवीण सागर, राजेंद्र काळे आणि रणधीर नायडू यांनी फेसबुक, व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत असलेले दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
व्हायरल मेसेजमधील मजकूर व्यवस्थितपणे वाचल्यानंतर ‘चेकपोस्ट मराठी’ने एकेका दाव्याची सखोल पडताळणी करण्याचा प्रयत्न केला.
दावा १: दिलीप कुमार यांनी नौदल हुतात्म्यांच्या विधवांसाठी असलेल्या NGOमध्ये भ्रष्टाचार केला.
वस्तुस्थिती:
- मुळात NGO म्हणजे ‘Non Government Organization’. एक अशासकीय संस्था उभारण्यासाठी स्वतः शासन का पुढाकार घेईल?
- तरीही आम्ही शोधाशोध केली असता आमच्या पडताळणीत अब्दुल रहमान अंतुले (Abdul Rehman Antulay) यांच्या कार्यकाळात नौदल हुतात्म्यांच्या विधवांसाठी अशी कुठली संस्था उभारल्याचे आढळले नाही.
- या उलट दिलीप कुमार यांच्याविषयी व्यवस्थित वाचले तर लक्षात येईल की त्यांनी स्वतःचे स्टारडम वापरून विविध अंध, मूक-बधीर लोकांना सहकार्य करणाऱ्या संस्थांसाठी फंड गोळा करून दान केलाय.
- भारत-चीन युद्धावेळी जखमींना मदत म्हणून त्यांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, आझाद मैदान सारख्या परिसरात रस्त्यांवर फिरून दान मागितलंय. त्यावेळी इमारतींतून अक्षरशः पैशांचा पाऊस पडायचा असे स्वतः गुलजार सांगतात.
दावा २: दिलीप कुमार पाकिस्तानी एजंट होते, त्यांच्या घरी रेडीओ ट्रान्समीटर सापडला होता.
वस्तुस्थिती:
- दिलीप कुमार पाकिस्तानी एजंट असल्याच्या अनेक वावड्या मुस्लीम द्वेष्ट्यांनी उठवल्या होत्या हे खरे आहे. त्यांच्या घरी रेडीओ ट्रान्समीटर सापडला होता हे देखील खरे आहे. परंतु या वन-लायनर कथेमागची विस्तृत पार्श्वभूमी वेगळी आहे.
- साधारण ६० च्या दशकाच्या सुरुवातीला कलकत्ता पोलिसांनी एका पाकिस्तानी हेराला पकडले होते. त्याच्या डायरीत विविध लोकांची नावे होती, त्यामध्ये दिलीप कुमार यांचेही नाव होते.
- पोलिसांनी डायरीत असणाऱ्या मुस्लीम नावांची लिस्ट बनवली आणि त्यावर धाडसत्र सुरु केले. दिलीप कुमार यांच्या घरावर देखील धाड पडली. खूप शोधाशोध केल्या नंतर त्यांच्या घरात संशयास्पद वस्तू म्हणून रेडीओ ट्रांसमीटर सापडला.
- ‘द टेलिग्राफ‘ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार चौकशीअंती हे सिद्ध झाले की भारताने पाकिस्तानी रेडीओ बॅन केला होता परंतु दिलीप कुमार यांना पाकिस्तानी संगीत ऐकण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याने त्यांनी तो ठेऊन घेतला होता.
- या व्यतिरिक्त त्यांना पाकिस्तानी एजंट म्हणावे यासाठी कुठलाही सबळ पुरावा सापडला नाही.
- युद्ध काळात त्यांनी कधीच पाकिस्तानचा निषेध केला नाही असाही आरोप त्यांच्यावर केला गेलाय, परंतु हे तथ्यहीन आहे. भारत-चीन युद्धावेळी दिलीप कुमार आणि सुनील दत्त सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वतः सीमेवर गेले होते.
- ते केवळ नेहरूंचेच मित्र नव्हते तर अटल बिहारी वाजपेयी यांचेही मित्र होते. कारगिल युद्धाच्या काळात अटलजींनी स्वतः दिलीप कुमार यांना दिल्लीला बोलावले होते.
- वाजपेयी यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फोन केला आणि दिलीप कुमार यांच्याकडे सोपवला. त्यावेळी दिलीप कुमार यांनी शरीफ यांना युद्ध थांबवण्यासाठी खडे बोल सुनावले होते.
- दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार ‘निशान ए इम्तियाज़’ जाहीर झाला तेव्हा भारतात राजकारण तापले होते. परंतु वाजपेयींनी तो पुरस्कार दिलीप कुमार यांनी घ्यायला हवा असा सल्ला दिलेला. ‘बिल्कुल लेना चाहिए, क्योंकि वे कलाकार हैं. कलाकार राजनीतिक और भौगोलिक सीमाओं से परे होता है’” असे वाजपेयींचे शब्द होते.
दावा ३: युसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांनी मरताना 98 करोड रुपये रोख, स्थावर जंगम मालमत्ता वक़्फ बोर्ड ला दिली.
वस्तुस्थिती:
- या दाव्याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’ने या आधीच पडताळणी केली आहे.
- त्यानुसार स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दिलीप कुमार यांनी आपली सर्व संपत्ती वक्फ बोर्डाला दान केल्याचे दावे निराधार आणि काल्पनिक आहेत. वक्फ बोर्डाकडून ही बाब नाकारण्यात आली आहे.
- त्या संबंधी विस्तृत रिपोर्ट ‘येथे‘ वाचू शकता.
हेही वाचा: इंदिरा गांधींच्या मृतदेहासमोर राहुल आणि राजीव गांधी ‘कलमा’ पठण करत होते?
[…] […]