अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा बहुचर्चित ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळताना दिसतोय. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल मीडियावर मोहिमा चालविण्यात आल्या होत्या.
आता सोशल मीडियावर आमिर खानचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये आमिर खान बहुतांश प्रेक्षकांना आपला चित्रपट आवडला नसल्याचे सांगत असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की आमिर खानने स्वतः ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाल्याची कबुली दिली आहे.
व्हिडिओमध्ये आमिर म्हणतोय, “आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, आम्ही आमच्या प्रयत्नात कुठेही कमी पडलो नाही, पण कुठेतरी चूक झाली. काही प्रेक्षकांना चित्रपट आवडलाय, आम्ही त्यांचे आभार मानतो. पण असे प्रेक्षक खूप कमी आहेत. बहुतेकांना चित्रपट आवडला नाही याची आम्हाला कल्पना आहे. नक्कीच आमचं काहीतरी चुकलं असावं आणि याची पूर्ण जबाबदारी मी घेतो”
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ‘हिंदी Rush’चा लोगो बघायला मिळतोय. त्यामुळे आम्ही युटयूबवर किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता ‘हिंदी रश’च्या युट्यूब चॅनेलवर 27 नोव्हेंबर 2018 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला.
आमिर खानचा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाच्या अपयशानंतर पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्याने चित्रपट फ्लॉप झाल्याचे स्वीकारत प्रेक्षकांची माफी मागितली होती. शिवाय या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी आपली असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद तिसऱ्या दिवशी देखील थंडच राहिला असून 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 27.96 कोटींचा व्यवसाय केला आहे. भारतात बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी करणाऱ्या या चित्रपटाला परदेशात मात्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जातेय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले की सोशल मीडियावरील आमिर खानचा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. आमिरचा व्हिडीओ ‘लाल सिंह चड्ढा’ संदर्भातील नसून ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेतील आहे.
हेही वाचा- आमिर खानने स्वतःच ‘लाल सिंह चड्ढा’ बघायचा नसल्यास नका बघू असं म्हंटलंय?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment