रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रमुख भूमिका असणारा अयान मुखर्जी (Ayan Mukerji) दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट पुढच्या आठवड्यात चित्रपट रसिकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या निर्मितीवर 410 कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आलाय. एवढ्या मोठ्या बजेटसह बनलेला ‘ब्रम्हास्त्र’ हा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट देखील ठरलाय.
‘ब्रम्हास्त्र’च्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असतानाच आता या चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येतेय. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरु असलेल्या ‘बॉयकॉट बॉलिवूड’ मोहिमेचाच हा भाग आहे. सध्या सोशल मीडियावर कथितरित्या ‘बीबीसी हिंदी’च्या बातमीचे ट्विट म्हणून एक स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. या ट्विटच्या आधारे ‘ब्रम्हास्त्र’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जातेय.
“पाकिस्तानमध्ये नुकत्याच आलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडने मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी ब्रम्हास्त्रचा निर्माता करण जोहरने 5 कोटी, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी प्रत्येकी 1 कोटींची मदत केली आहे. चित्रपट हिट झाल्यास आणखी 51 कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे” अशा प्रकारचा दावा या ट्विटमध्ये करण्यात आलाय.
फेसबुकवर हा स्क्रिनशॉट प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल स्क्रिनशॉट व्यवस्थित बघितला तर त्यात व्याकरणाच्या अनेक चुका असल्याचे सहज लक्षात येईल. जसे की पहिलेच वाक्य अर्धवट सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वप्रथम तर आम्ही करण जोहर, रणबीर कपूर किंवा आलिया भट्टकडून पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आल्याची बातमी शोधायचा प्रयत्न केला. मात्र अशा प्रकारची कुठलीही बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही.
आम्ही बीबीसी हिंदीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर जाऊन व्हायरल ट्विट शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र व्हायरल ट्विटसारखे कोणतेही ट्विट आम्हाला सापडले नाही. उलट बीबीसीनेच व्हायरल ट्विट फेक असल्याचे सांगणारे ट्विट केल्याचे बघायला मिळाले.
बीबीसीच्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून व्हायरल ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करण्यात आलाय आणि कॅप्शनमध्ये स्पष्ट करण्यात आलेय की सदर ट्विट फेक असून बीबीसीने अशा प्रकारची कुठलीही बातमी दिलेली नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘ब्रम्हास्त्र’च्या टीमकडून पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर ‘बीबीसी हिंदी’च्या नावाने शेअर केल्या जाणाऱ्या ट्विटचा स्क्रिनशॉट फेक आहे. बीबीसीकडूनच हा स्क्रिनशॉट फेक असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- ‘पठाण’ चित्रपटाला विरोध सुरू होताच शाहरुख खान पोहोचला दहीहंडी उत्सवात? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment