Press "Enter" to skip to content

पंडित नेहरू आणि मुहम्मद अली जिन्ना सावत्र भाऊ असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल पोस्ट्स फेक!

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्या आईचे नाव थुसू रहमान बाई, वडिलांचे नाव जनाब मुबारक अली होते. तसेच मुहम्मद अली जिन्ना (Muhammad Ali Jinnah) आणि शेख अब्दुल्ला (Sheikh Abdullah) नेहरूंचे सावत्र भाऊ होते असे त्यांचे वैयक्तिक सहाय्यक एम. ओ. मथाई (A O Mathai) यांनी लिहून ठेवल्याचे दावे करणारी एक लांबलचक प्रश्नोत्तरांची पोस्ट सोशल मीडियात फिरत आहे.

Advertisement

व्हायरल पोस्ट:

अर्काइव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण फडणीस आणि राजेंद्र काळे यांनी ट्विटर प्रमाणेच फेसबुक आणि व्हॉट्सऍपवरही हे दावे व्हायरल होत असल्याचं निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

Nehru Muslim family FB claim screenshot check post Marathi
Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल पोस्टमध्ये अनेक दावे आहेत. या सर्व दाव्यांना आधार म्हणून पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे वैयक्तिक सहाय्यक ‘एम. ओ. मथाई’ यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संदर्भ दिलाय. त्यामुळे आम्ही मथाई यांच्या पुस्तकांविषयी शोधाशोध केली तेव्हा त्यांच्या ‘ ‘Reminiscences of the Nehru Age’ (1978) आणि ‘My Days with Nehru’ (1979) या दोन्ही पुस्तकांचे अर्काईव्ह सापडले. त्यातील मजकुराशी व्हायरल दाव्यांची पडताळणी करून पाहिली असता तपशीलवारपणे जे सापडलं ते पुढीलप्रमाणे-

१. नेहरूंच्या आईचे नाव ‘थुसू रहमान बाई’ होते?

नाही. अशा कुठल्याही नावाचा उल्लेख मथाई यांच्या पुस्तकांत नाही. नेहरूंच्या आईचे नाव काय होते हे शोधले असता कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर आम्हाला माहिती सापडली. या माहितीनुसार नेहरूंच्या आईचे नाव स्वरूप राणी (Swarup Rani Nehru) असल्याचे समजले. तसेच नेहरूंच्या आत्मचरित्रातसुद्धा आईचे नाव स्वरूप राणी नेहरू असेच आहे.

INC website info about Nehru's mother
Source: INC website

२. नेहरूंच्या वडिलांचे नाव मुबारक अली होते?

नाही. पंडित नेहरू यांच्या वडिलांचे नाव मुबारक अली असल्याचाही मथाई यांच्या पुस्तकात उल्लेख नाही. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते हे सर्वज्ञात आहे. अगदी ब्रिटानिका सारखी अधिकृत माहितीची वेबसाईटसुद्धा हीच माहिती देताना आढळते.

३. नेहरूंचे आजोबा/ पूर्वज मुस्लीम होते?

व्हायरल पोस्टमध्ये नेहरूंच्या आजोबांचे नाव घियासुद्दीन गाझी होते असा उल्लेख आहे. या नावावरून ते मुस्लीम होते असा दावा केला जातोय. या विषयी देखील मथाई यांच्या पुस्तकात उल्लेख नाही.

नेहरूंनी स्वतः आपल्या चरित्रात लिहिले आहे की त्यांचे पूर्वज ‘राज कौल’ यांचे आडनाव ‘नहर/ कालवा’ यामुळे नेहरू असे पडले. अर्थातच कौल हे देखील मुस्लीम नव्हते त्यामुळे त्यांची वंशावळ असलेले नेहरूंचे आजोबा मुस्लीम असण्याचा संबंध येतोच कुठे? त्यांचे नाव गंगाधर नेहरू असे होते.

नेहरूंच्या आत्मचरित्रातील उल्लेख:

Screenshot of Nehru's Autobiography

४. मुहम्मद अली जिन्ना आणि शेख अब्दुल्ला हे नेहरूंचे सावत्र भाऊ होते?

भारताची फाळणी करून पाकिस्तान वेगळा करणारे मुहम्मद अली जिन्ना (Muhammad Ali Jinnah) आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला हे नेहरूंचे (Jawaharlal Nehru) सावत्र भाऊ होते असा दावा केला गेलाय. या सर्वांच्या माता वेगळ्या असल्या तरी त्यांचे पिता मोतीलाल नेहरुच होते असा उल्लेख त्या पोस्टमध्ये आहे.

मथाई यांनी अशा प्रकारची कसलीही माहिती आपल्या पुस्तकांत दिलेली नाहीये. परंतु व्हायरल दावा जर नेटका वाचला तर असे समजेल की जिन्ना हे मोतीलाल नेहरूंच्या चौथ्या पत्नीपासून झालेले पुत्र आहेत असा उल्लेख आहे. मोतीलाल नेहरू यांचा जन्म १८६१ सालचा आणि जिन्ना यांचा १८७६ सालचा. म्हणजे मोतीलाल नेहरू यांना वयाच्या १५ व्या वर्षात चौथी पत्नी होती जिच्यापासून जिन्ना जन्मले? अजिबात तर्कात बसत नाही.

पाकिस्तानच्या शासकीय वेबसाईटनुसार जिन्ना यांच्या वडिलांचे नाव जीन्नाभाई पुंजा असे आहे.

५. इंदिरा गांधी यांचे पती फिरोज हे मुस्लीम होते?

इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे खरे नाव ​​ममुना बेगम खान असे होते आणि त्यांच्या पतीचे नाव जहांगीर फिरोज खान (Jehangir Feroz Khan) होते असा दावा केला गेलाय. याविषयी देखील मथाई यांच्या पुस्तकात एकही अक्षर लिहिलेले नाही.

‘चेकपोस्ट मराठी’ने फिरोज गांधी हे गांधी होते की खान होते की शहा होते या दाव्यांना पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. तो रिपोर्ट ‘येथे‘ क्लिक करून वाचू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये पंडीत जवाहरलाला नेहरू यांच्या माता पित्यांना, पूर्वजांना आणि मुलीला मुस्लीम ठरवण्यासाठी जे दावे केले आहेत ते सर्व फेक असल्याचे सिद्ध झाले.

नेहरूंचे वैयक्तिक सहाय्यक ‘एम. ओ. मथाई’ यांच्या पुस्तकांचा सदर्भ देत हे दावे व्हायरल होतायेत पण यातील एकही बाब त्यांच्या पुस्तकांत नाही.

२०१९ साली पायल रोहतगी या अभिनेत्रीने अशाच एका पोस्ट्चा आधार घेत ट्विटर व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यावरून तीला खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करण्याच्या आरोपाखाली ९ दिवसांचा कारावास भोगावा लागला होता.

हेही वाचा: इंदिरा गांधींच्या मृतदेहासमोर राहुल आणि राजीव गांधी ‘कलमा’ पठण करत होते?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा