सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड चित्रपटांच्या बहिष्काराचा ट्रेंड सुरु आहे. ‘लाल सिंह चड्ढा’, ‘दोबारा’ आणि ‘लाईगर’ नंतर आता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी मोहीम चालवली जात आहे. अशातच आता अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये शाहरुख खान दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन दहीहंडी फोडताना बघायला मिळतोय.
शाहरुखचा दहीहंडी फोडतानाचा व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की सोशल मीडियावर ‘पठाण’ला विरोध सुरु होताच आता शाहरुख दहीहंडी उत्सवात सहभागी झाला आहे. या माध्यमातून हिंदू प्रेक्षकांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र याचा काहीही फरक पडणार नाही. पठाण चित्रपटावरील बहिष्कार कायम राहील.
पडताळणी:
किवर्डसच्या आधारे युट्यूबवर शोध घेतला असता ‘व्हायरल बॉलिवूड’ या युट्यूब चॅनेलवरून 24 ऑगस्ट 2019 रोजी शाहरुख खानचा दहीहंडी फोडतानाचा व्हिडीओ अपलोड केला गेला असल्याचे बघायला मिळाले.
आम्हाला ‘तरुण भारत’च्या वेबसाईटवर 24 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध बातमी देखील बघायला मिळाली. या बातमीनुसार शाहरुखचा दहीहंडी फोडतानाचा व्हिडीओ त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्यावरील आहे. शाहरुखने मन्नतवर उत्साहात दहीहंडी साजरी केली, मात्र, शाहरुखने ज्याप्रकारे हंडी फोडली, त्यावरून तो चांगलाच ट्रोल झाला, असेही बातमीत सांगण्यात आले आहे. दहीहंडी फोडण्यासाठी आपल्या बॉडीगार्डच्या खांद्याचा आधार घेतल्याने नेटकऱ्यांनी त्यावेळी शाहरुखला ट्रोल केले होते.
प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी देखील 24 ऑगस्ट 2019 रोजी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अभिनेता शाहरुख खानच्या व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. शाहरुखचा दहीहंडी फोडतानाचा व्हिडीओ सध्याचा नसून जवळपास तीन वर्षांपूर्वीचा आहे. शाहरुखने 2019 मध्ये आपल्या मन्नत बंगल्यावर साजऱ्या केलेल्या दहीहंडी उत्सवातील हा व्हिडीओ आहे.
हेही वाचा- ‘दोबारा’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तापसी पन्नू सिद्धिविनायकाच्या चरणी? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]