कोव्हीड १९ (Covid-19)महामारीला प्रतिबंध करणाऱ्या लशीचे दोन डोस घेतले की नाही याविषयी विचारणा करणारे फोन कॉल जर आले तर ते उचलू नका, कुठलेही नंबर दाबू नका नाहीतर तुमच्या आधार कार्डला जोडलेल्या बँक खात्यातील रक्कम चोरी होईल. अशा अर्थाचे काही मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
व्हायरल मेसेज:
कोणत्याही नंबरवरून फोन आला आणि तुम्ही लसीचे दोन डोस घेतले आहेत का? फोनचे कोणतेही उत्तर देऊ नका. तसेच कोणताही नंबर दाबू नका. नंबर दाबल्याने आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक होईल.
परिणामी, तुमच्या बँक खात्यातून पैसे निघतील. ही घटना काल अहमदाबादमध्ये घडली. मोबाईलवर फोन आला तुम्ही लसीचे दोन डोस घेतले असतील तर एक नंबर डायल करा. तो नंबर दाबून खात्यातून 20 हजार काढले. हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करा जेणेकरून कोणी लुटले जाणार नाही.
फेसबुक, व्हॉट्सऍपवर हे दावे व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी २० हजार चोरल्याचे सांगितले जातेय तर काही ठिकाणी ५० हजार.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक करण गायकवाड आणि राजू पाटील यांनी सदर मेसेज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने गुगल सर्च करून पाहिले परंतु अहमदाबादच्या त्या कथित घटनेविषयी कुठेही बातमी आढळली नाही.
राहिला प्रश्न आधार कार्ड जर आपल्या बँक खात्याशी जोडलेला असेल तर आपल्याला केवळ फोन करून, किंवा मोबाईलवर काही आकडे दाबण्यास भाग पाडून आपली रक्कम लुटू शकते का? याविषयी तपास करताना आपणास आधार कार्ड पुरवणाऱ्या ‘युनिक आयडेंटीफीकेशन ऑथोरीटी ऑफ इंडिया’ (UIDAI) या केंद्र शासनाच्या विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती सापडली.
त्यात असे सांगण्यात आले आहे की, “जसे केवळ एखाद्याचा अकाऊंट नंबर माहिती आहे यावरून कुणी त्याच्या बँक खात्यातून पैसे काढून घेऊ शकत नाही तसे केवळ आधार नंबर माहिती झाला म्हणजे कुणी आपल्या बँक खात्यातील पैसे काढू घेऊ शकत नाही. जसे बँकेतून पैसे काढण्यासाठी तुमची सही, डेबिट कार्ड, पिन, ओटीपीची आवश्यकता असते तसे आधारकार्डमार्फत पैसे काढण्यासाठी तुमचे बायोमेट्रिक म्हणजेच बोटाच्या ठश्यांचे किंवा डोळ्याचे स्कॅन करणे गरजेचे असते. तसेच लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी देखील महत्वाचा असतो. आजवर अशी एकही घटना घडल्याचे निदर्शनास आले नाही जेथे आधार नंबरच्या आधारे पैशांची लुट झाली आहे”
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल मेसेज फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे केवळ फोन कॉलवर आधार नंबरच्या आधारे कुणीही कोणाच्याही बँक खात्यातील रक्कम काढून घेऊ शकत नाही. तरीही खबरदारी म्हणून आपल्या फोनवर आलेला ओटीपी, कुठला पिन जर कुणी आपणास मागत असे तर असे कॉल लागलीच कट करा आणि सदर नंबर थेट रिपोर्ट अथवा ब्लॉक करा.
हेही वाचा: तुमची KBC च्या २५ लाख रुपयांच्या लॉटरीसाठी निवड झाल्याचे मेसेज आल्यास सावधान!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]