चित्रपट अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा ‘पठाण’ हा सिनेमा लवकरच चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा शाहरुख संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की योगी आदित्यनाथ यांनी ‘पठाण’ चित्रपट न बघण्याचे आवाहन केले आहे.
व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता ANI या वृत्तसंस्थेच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून 4 नोव्हेंबर 2015 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओच्या शीर्षकामध्ये योगी आदित्यनाथ यांनी शाहरुख खानची तुलना मुंबई हल्ल्यातील आरोपी हाफिज सईदशी केल्याचे सांगण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ म्हणताहेत, सेक्यूलॅरिजमच्या नावाखाली या देशातील डाव्या विचारसरणीचे काही तथाकथित लेखक आणि कलाकार आता केवळ भाजपच नव्हे, तर भारताविरोधात आवाज उठवू लागले आहेत. दुर्दैवाने शाहरुख खानसारख्या कलाकाराने देखील सुरात सूर मिळवला आहे. शाहरुखने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर या देशातील बहुसंख्य समाजाने त्याच्या चित्रपटांचा बहिष्कार केला, तर एखाद्या साधारण मुसलमानासारखं त्याला सुद्धा रस्त्यावर फिरावं लागेल.
दरम्यान, आदित्यनाथ यांनी शाहरुख खान विषयी ही प्रतिक्रिया शाहरुखच्या देशातील असहिष्णुते (Intolerance) संदर्भातील वक्तव्याला प्रत्युत्तर होतं. शाहरुख खानने ‘आज तक’च्या राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत फक्त देशातच नाही, तर सोशल मीडियामुळे अनेक ठिकाणी असहिष्णुता वाढली असल्याचं म्हंटलं होतं.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट न बघण्याचे आवाहन केलेले नाही. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ आताचा नसून 2015 सालचा आहे. त्यावेळी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील नव्हते. शाहरुख खानच्या देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या वक्तव्याचा निषेध करताना योगी आदित्यनाथ यांनी शाहरुखची तुलना हाफिज सईदशी केली होती.
हेही वाचा- शाहरुखच्या वडिलांची ‘भारत छोडो’ आंदोलनातील भूमिका नाकारण्यासाठी केले जात असलेले दावे चुकीचे!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: योगी आदित्यनाथ यांनी शाहरुखच्या ‘पठा… […]