Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटची भविष्यवाणी 1963 सालच्या चित्रपटात करण्यात आली होती?

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून कथितरित्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंट संदर्भातील चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ (the omicron variant) नावाचा चित्रपट 1963 सालीच प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचे हे पोस्टर असल्याचे सांगितले जातेय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

गुगलवर ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाच्या चित्रपटाचा शोध घेतला असता असे समजले की या नावाचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मात्र, 1963 मध्ये ‘ओमिक्रॉन’ (omicron)  नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. उगो ग्रेग्रट्टी दिग्दर्शित चित्रपटात रेनाटो सॅल्व्हॅटरी, रोजमेरी डेक्स्टर आणि फ्रँको लुतझी हे प्रमुख भूमिकेत होते.

एक एलियन पृथ्वीवर ताबा मिळविण्यासाठी माणसाच्या शरीरात प्रवेश करून पृथ्वीबद्दलची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो, अशा प्रकारच्या कथानकावर हा चित्रपट आधारित होता. शिवाय या चित्रपटाचे पोस्टर देखील सध्या व्हायरल होत असलेल्या पोस्टरपेक्षा वेगळे होते.

Source: Republic World

सध्या व्हायरल होत असलेले पोस्टर रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधले असता आयरिश लेखिका बेकी चीटल यांचे 28 नोव्हेंबर 2021 रोजीचे ट्विट मिळाले. या ट्विटमध्ये त्यांनी सत्तरच्या दशकातील वेगवेगळ्या सायंस फिक्शन चित्रपटाच्या पोस्टरवर फोटोशॉपच्या मदतीने ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ लिहिले असल्याचे सांगितले आहे.

बेकी चीटल यांनी फोटोशॉप केलेले पोस्टर 1974 सालच्या ‘फेज IV’ या चित्रपटाच्या पोस्टरवर आधारित आहे. वाळवंटातील मुंग्या कशाप्रकारे तिथल्या रहिवाशांविरोधात युद्ध छेडतात याविषयीचा हा चित्रपट आहे. यावरील हातावर मुंगीने केलेल्या जखमेचे चित्र जसेच्या तसे व्हायरल पोस्टरवर कॉपी केले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की १९६३ साली ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. त्या वर्षी ‘ओमिक्रॉन’ नावाचा एक सायंस फिक्शन चित्रपट प्रदर्शित झाला होता, पण त्याच्या कथानकाचा सध्याच्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटसोबत काहीही संबंध नाही.

सध्या व्हायरल होत असलेले पोस्टर देखील फोटोशॉपच्या मदतीने बनविण्यात आलेले आहे. 1974 साली प्रदर्शित ‘फेज IV’ या चित्रपटाच्या पोस्टरवर ते आधारलेले आहे.

हेही वाचा- केजरीवाल, राहुल गांधींना सेल्समन म्हणत तिसरी लाट ‘फायजर’ची खेळी सांगणाऱ्या दाव्याची झाडाझडती!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा