Press "Enter" to skip to content

भूमिका

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन सोबत इंटरनेट आलं. सोशल मिडिया हाताळण्यासाठी वय, शिक्षण किंवा समज यांचं कसलंही बंधन उरलं नाही. हीच संधी साधून काही समाजकंटकांनी ‘फेकन्यूज’ नावाच्या राक्षस जन्माला घातला. हा राक्षस आज इतक्या अवाढव्य रितीने वाढलाय की तो आपल्यापैकी कुणाला आणि कशाप्रकारे गिळंकृत करेल याचा काहीही नेम नाही.

कोणे एके काळी ‘पेपरात छापून आलंय किंवा टीवीवर बातमी आलीये म्हणजे ती खरीच असणार’ अशी लोकांची धारणा असायची. पण आता हे टीवी आणि पेपरवालेच जाणते-अजाणतेपणे फेकन्यूज पसरवायला लागल्यावर नेमकं बघायचं कुणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय.

सोशल मीडियात वावरताना कुठलीही शहानिशा न करता येईल ते फॉरवर्ड करण्याच्या सवयीने आज आपण या राक्षसाचे ‘सॉफ्ट टार्गेट’ बनलेलो आहोत. ‘फेकन्यूज’चा हा राक्षस मानवजातीसाठी किती विघातक ठरू शकतो याचा अनुभव आपण यापूर्वीही घेतलाय आणि कोरोना संकटाच्या काळात तर त्याचा प्रत्यय आपल्याला रोजच नव्याने येतोय.

‘फेकन्यूज’शी लढणं हे आजघडीला माध्यमजगता समोरचं सर्वात मोठं आव्हान बनलंय. खरं तर मर्यादित संसाधनांमध्ये ह्या राक्षसाशी दोन हात करणं कितपत शक्य होईल, याची कल्पना नाही. पण म्हणून हातावर हात ठेऊन शांत बसून राहणं देखील आम्हाला शहाणपणाचं वाटलं नाही. म्हणूनच ‘चेकपोस्ट मराठी’च्या माध्यमातून जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ही लढाई जिकरीने लढायचं आम्ही ठरवलंय.

… सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ना डावे, ना उजवे. कुठल्याही राजकीय विचारधारेशी आमची बांधिलकी नाही. आमची बांधिलकी फक्त आमच्या वाचकांशी आणि तथ्यांशी. आम्ही कायमच तथ्यांसोबत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुत. अर्थात ते तुमच्या सहकार्याशिवाय शक्यच नाही. तेव्हा सोबतीची खात्री असुद्यात.

× न्यूज अपडेट्स मिळवा