Press "Enter" to skip to content

मोदींनी परराष्ट्र प्रमुखांना भेट म्हणून ‘ताजमहाल’ ऐवजी ‘भगवद्गीता’ देण्याचा नियम केलाय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘ताजमहाल’ (Taj Mahal) भारताची ओळख कसा काय असू शकतो म्हणून जुना प्रघात मोडीत काढत परराष्ट्राच्या प्रमुखांना ‘ताजमहाल’ ऐवजी ‘भगवद्गीता’ (Bhagavad Gita) भेट देण्याचा त्यांनी नवा नियम केला. असे दावे करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement

व्हायरल दावा:

किस्सा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. इंग्रजांच्या काळापासून आपल्याकडे प्रथा आहे की कोणत्याही देशाचे प्रमुख भारत भेटीला येतात त्यावेळी ते परत जाताना त्यांना भारताची ओळख म्हणून काही भेटवस्तू दिली जाते. 

२०१४ मधे पंतप्रधान झाल्यावर मोदीजी राष्ट्रपती भवनात गेले, तेव्हा त्यांनी विचारले की आपण अशी कोणती वस्तू परराष्ट्रांच्या प्रमुखांना देतो. तर ताबडतोब उत्तर मिळाले 'ताजमहाल'. मोदींनी विचारले ताजमहाल का? तर उत्तर मिळाले तशी प्रथा आहे ब्रिटिशकाळापासून. मोदींनी विचारले ताजमहाल कधीपासून भारताची ओळख झाला आणि भारताची ओळख ठरवण्याचा ब्रिटिशांना काय अधिकार? तर उत्तर मिळाले की ब्रिटिशांनी ती प्रथा चालू केली आणि गेली ७० वर्षे सर्व राज्यकर्त्यांनी ती तशीच चालू ठेवली.

 खरं म्हणजे ताजमहाल ही एक कलाकृती म्हणून अप्रतिम आहे आणि जगातील आश्चर्यांपैकी एक आहे याबद्दल वादच नाही. पण तो भारताची ओळख कसा होऊ शकतो. कारण मुघल राजवट ही काही भारतातील मूळ राजवट नाही. मुघलांनी भारतावर आक्रमण केले आणि आपली राजवट प्रस्थापित केली. ताजमहाल शाहजहान राजाने आपल्या बेगमच्या आठवणीसाठी बांधला. त्यामध्ये बादशहा आणि त्याची बेगम यांच्या कबरी आहेत. दोन प्रेमी जीवांची कदाचित ती आठवण असू शकते, पण आपण त्यात पडायला नको. 

मूळ मुस्लिम धर्म रिवाजानुसार मृत्यूनंतर दफन केले जाते, ख्रिश्चन धर्माप्रमाणे कबर वा थडगे बांधले जात नाही. पण ही वेगळीच प्रथा या मुस्लिम राजाने चालू केली. त्यामुळे ताजमहाल घरात ठेवायचा म्हणजे माणसाची कबर घरात ठेवण्यासारखे आहे. जसं आपण मेलेल्यांच्या अस्थी घरात ठेवत नाही, तसंच आहे हे. मग ताजमहाल का भेट द्यायचा?
 या प्रश्र्नावर राष्ट्रपती कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते, पण मोदी गृहपाठ करून गेले होते, नेहमीप्रमाणे. 

कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी लगेच सूचना केल्या की जगात जितक्या म्हणून भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये गीतेच्या प्रति छापल्या जाव्यात. म्हणजे ज्या देशाचे राष्ट्रप्रमुख भारत भेटीवर येतील त्यांना त्यांच्या देशाच्या भाषेतील गीतेची प्रत भारताची ओळख म्हणून दिली जाईल. खरंच किती बारीक विचार आहे. गीतेमध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते जगात कुठल्याही ग्रंथात नाही. गीतेतील तत्त्वज्ञान हे त्रिकालाबाधित सत्य आहे. गीतेएवढा प्राचीन ग्रंथ आज तरी माझ्या माहितीत नाही. त्यामुळे भारतभेटीला येणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना भारताची ओळख म्हणून * गीता * देणे हेच जास्त योग्य आहे
 
आतापर्यंत भारतात सत्तर एक देशांचे राष्ट्राध्यक्ष येऊन गेले. त्या प्रत्येकांना त्यांच्या त्यांच्या भाषेतील गीतेची प्रत दिली गेली.
 तर सांगायचा मुद्दा असा की ताजमहाल प्रतिकृती ऐवजी गीतेची प्रत भेट देणं ही कीती छोटी गोष्ट होती पण त्यामागे कीती महान विचार होता…. !! जय श्रीकृष्ण 

खरं असेल तर खूप कौतुकास्पद !Jayanti Yashwant Deshmukhकिस्सा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. इंग्रजांच्या…

Posted by Aaj Ka Zapad on Friday, 25 June 2021
अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण फडणीस आणि राजेंद्र काळे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेली पोस्ट निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दावा व्यवस्थित वाचून त्यानुसार ऍडव्हान्स्ड की-वर्ड्सच्या आधारे गुगल सर्च करून पाहिले. त्यातून जी माहिती समोर आली ती पुढीलप्रमाणे:

१. परराष्ट्र प्रमुखांना ‘ताजमहाल’ भेट म्हणून देण्याची परंपरा होती का?

व्हायरल पोस्टमधील दाव्याप्रमाणे ब्रिटीशांनी परराष्ट्र प्रमुखांना ‘ताजमहाल’ (Taj Mahal) भेट म्हणून देण्याची परंपरा चालू केली. तीच पुढे सत्तर वर्षे कॉंग्रेस आणि इतर सरकारांनी चालू ठेवली. परंतु आम्हाला या संबंधी कुठलाही सबळ पुरावा मिळाला नाही. या उलट नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आधीच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आणि इतर प्रमुख पाहुण्यांना दिलेल्या भेटवस्तूंची यादी हाती लागली.

NDTVच्या बातमीनुसार डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी बराक ओबामा (Barack Obama) यांना भारताचा इतिहास आणि संस्कृती दर्शवणारे ऐतिहासिक ग्रंथ, पंचतंत्राच्या गोष्टी यांसारख्या पुस्तकांचा संच दिला होता. ‘फॅक्टली‘ला मिळालेल्या दस्तऐवजानुसार २००३ साली अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी १२०० डॉलर्स किमतीचा कार्पेट दिला होता.

२. नरेंद्र मोदींनी ‘भगवद्गीता’ भेट म्हणून दिली का?

होय, हे खरे आहे की पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जपानच्या शिन्जो आबे यांना भगवद्गीता (Bhagavad Gita) भेट म्हणून दिली होती. या विषयीच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु त्यांनी आजवर प्रत्येक राष्ट्रप्रमुखास केवळ भगवद्गीता भेट म्हणून दिलीय हे असत्य आहे.

  • ईराण भेटीवेळी मोदी दुर्मिळ अशा ७ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या कुराण शरीफची प्रत घेऊन गेले होते.
  • उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षास त्यांनी उत्तर प्रदेशात जन्म झालेल्या प्रसिद्ध शायर अमीर खुसरो यांच्या १३ व्या शतकात लिहिलेल्या ‘खासमा-इ-खुसरो’ची प्रत भेट म्हणून दिली.
  • इंग्लंडच्या राणीला त्यांनी उच्चतम प्रतीची विविध पुरस्कार मिळालेली दार्जीलिंग चहापत्ती आणि जम्मू काश्मीरमधील सेंद्रिय मध भेट म्हणून दिले.
  • पंतप्रधान हार्पर यांना गुरुनानक देव यांच्यासह त्यांचे शिष्य भाई बाला आणि भाई मर्दाना यांची कथा असलेली मिनीएचर चित्रे भेट दिली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावा निराधार आणि फेक असल्याचे निष्पन्न झाले. परराष्ट्र प्रमुखांना भेट म्हणून केवळ ‘ताजमहाल’ची प्रतिकृती देण्याची परंपरा भारतात कधीच नव्हती, त्यामुळे ती मोडून त्या ऐवजी ‘भगवद्गीता’ देण्याचा नवा पायंडा पाडण्याच्या दाव्याला काहीही अर्थ उरत नाही.

उलट त्यांनी स्वतः विविध राष्ट्रांच्या प्रमुखांची विचारसरणी पाहून वेगवेगळ्या पद्धतीच्या भेटवस्तू दिल्या आहेत. यात त्यांनी धार्मिक विचाराने दुजाभाव दाखवल्याचे आढळत नाही.

हेही वाचा: अमेरिकेने केला भारताचा गौरव? महात्मा बसवेश्वरांचा फोटो १०० डॉलरच्या नोटेवर?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा