सोशल मीडियामध्ये फिल्मी स्टाईलने गुन्हेगारांना पकडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. दावा केला जातोय की क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांनी ‘मोहम्मद सिराज अन्वर’ (Mohammed Siraj Anwar) या गुन्हेगाराला अवैध शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. अन्वरचा दिल्ली दंगलीत सहभाग होता, असेही काही दाव्यांत सांगण्यात आले आहे.
‘थरार कॅमेरा वर रेकॉर्ड झाला – भरूच च्या क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांनी मोहम्मद सिराज अंवर नावाच्या गुन्हेगाराला दोन पिस्तूल, 19 चालू काढतुस, दोन रिकामी मॅक्झिन आणि 61 हजार नकद रकमेसह सरफरोश स्टाईल मध्ये भरूच हायवेवरून अटक केली….’
अशा कॅप्शनसह ‘मुंबई माझी‘ नावाच्या फेसबुक ग्रुपवर तोच व्हिडीओ पोस्ट केला गेलाय. बातमी करेपर्यंत १७७ युजर्सकडून हा व्हिडीओ शेअर केला गेला होता.
‘लाईव्ह ऑपरेशन.. दिल्ली दंग्यातील फरार आरोपी मोहम्मद सिराजला..भरुच क्राईम ब्रांचने अटक केली..लाइव ऑपरेशन.. दिल्ली दंगों के भगोड़े आरोपी मोहम्मद सिराज को भरूच क्राइम ब्रांच ने किया गिरफ्तार..मिली सूचना से… भरूच क्राइम ब्रांच ने उसे जाल में फंसाकर गिरफ्तार कर लिया.. लातों से रौंदा गया… बाकी की 100 फीसदी लात उसे थाने में मिलेगी…लेकिन ऐसी हरकत की फुटेज बहुत कम देखने को मिलती है…’
अशा कॅप्शनसह देखील सदर व्हिडीओ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येतंय.
पडताळणी:
- व्हायरल व्हिडीओच्या की-फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून आणि त्या संबंधी कीवर्ड्सचा आधार घेऊन गुगल सर्च केले असता ‘द इंडियन एक्स्प्रेस‘, ‘झी न्यूज‘ यांसारख्या राष्ट्रीय माध्यमांच्या बातम्या समोर आल्या.
- या बातम्यांनुसार सापळा रचून अटक करण्यात आलेली व्यक्ती ‘मोहम्मद सिराज अन्वर’ (Mohammed Siraj Anwar) नसून ‘किशोर पांचाल’ (Kishor Panchal)आहे.
- सशस्त्र दरोडे, वाहन चोरी यांसारख्या विविध गुन्ह्यांत ‘वॉन्टेड’ असणाऱ्या २९ वर्षीय किशोरला गुजरात मधील पाटनच्या एका ढाब्यावर पकडण्यात आले होते.
- सदर CCTV फुटेजचा व्हिडीओ अहमदाबाद पोलिसांनी जारी केला आहे.
- पांचालकडून ‘सेमी ऑटोमेटिक बंदूक, दोन मेगेझीन आणि ५ दारुगोळे जप्त करण्यात आले आहेत.
- विविध अंगाने शोधाशोध करूनही दिल्ली दंगलींशी संबंधित असणारा कुणी ‘मोहम्मद सिराज अन्वर’ नामक व्यक्ती अस्तित्वात असल्याचे आढळले नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. गुजरातमध्ये ढाब्यावर सापळा रचून पकडलेला गुन्हेगार ‘मोहम्मद सिराज’ नव्हे तर ‘किशोर पांचाल’ होता. अहमदाबाद पोलिसांनी जारी केलेला व्हिडीओ व्हायरल करून त्याला धार्मिक रंग देण्याचा खोडसाळपणा केला जात असल्याचं दिसून येतंय.
हेही वाचा: मोदींनी परराष्ट्र प्रमुखांना भेट म्हणून ‘ताजमहाल’ ऐवजी ‘भगवद्गीता’ देण्याचा नियम केलाय?
[…] हेही वाचा- सरफरोश स्टाईलने ढाब्यावर पकडलेला गुन… […]