Press "Enter" to skip to content

अमेरिकेने केला भारताचा गौरव? महात्मा बसवेश्वरांचा फोटो १०० डॉलरच्या नोटेवर?

बाराव्या शतकातील महान युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा १०० डॉलरच्या नोटेवर प्रस्थापित करून अमेरिकेने भारताचा गौरव केल्याचे सांगत नोटेचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. (Basveshwara 100 dollar note)

Advertisement

‘भारत देशात एकूण ४ महात्मा आहेत, त्यापैकी एक बाराव्या शतकातील महान युगपुरुष समतेचे जनक क्रांतिसूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची त्यांच्या महान कार्याची दखल घेऊन जगातील आर्थिक दृष्ट्या सबल असलेल्या अमेरिकेने महात्मा बसवेश्वर यांची शंभर डॉलरच्या नोटेवर प्रतिमा प्रस्थापित करून भारत देशाचा गौरव वाढवला.. आता अमेरिकेत प्रत्येक शंभर डॉलर वर दिसणार भारतातील क्रतीसुर्य महात्मा बसवेश्वर..’

अशा मजकुरासह महात्मा बसवेश्वर असणाऱ्या १०० डॉलरच्या नोटेचा (Basveshwara 100 dollar note) फोटो भारतीय जनता युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत घोडके यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.

FB post claiming basveshwar on 100 dollar note check post marathi fact

अशा इतरही पोस्ट्स फेसबुकवर पहायला मिळत आहेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अक्षय कुलकर्णी यांनी व्हायरल पोस्ट निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्याआधी थोडक्यात परिचय करून घेऊयात महात्मा बसवेश्वर कोण होते.

महात्मा बसवेश्वर यांचा परिचय:

  • १२ व्या शतकात म्हणजे तब्बल ९०० वर्षांपूर्वी भारतीय समाज अनेक रूढी, परंपरांनी, अंधश्रद्धांनी, भेदभाव व स्त्री दास्यत्वाच्या मान्यतांनी ग्रस्त होता तेव्हा यास विरोध करत महात्मा बसवेश्वर यांनी समाज प्रबोधनाचे खूप भरीव कार्य केले. त्यांना विद्रोही महात्मा म्हंटले जाते.
  • तत्कालीन समाजव्यवस्थेला सुरुंग लावत त्यांनी मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत आणि मधुरस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांचा विवाह लाऊन दिला होता, जे आजच्या घडीला देखील फार जिकिरीचं कार्य आहे.
  • हिंदू धर्मातल्या वर्ण व्यवस्थेला विरोध करत, भट-ब्राह्मण उच्चता मोडून काढत ७७० पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी ‘लिंगायत’ धर्माची स्थापना केली. आजही महाराष्ट्रात बसवेश्वरांना मानणारे अनेक जण आहेत.

नोट एक फोटो अनेक

आम्ही व्हायरल पोस्टमधील नोटेचा फोटो रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला असता CL 01985909B या क्रमांकाच्या १०० डॉलरच्या अनेक नोटा आम्हाला सापडल्या ज्यांवर विविध लोकांचे चेहरे होते. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही प्रतिमा त्या नोटेवर छापली असल्याच्या व्हायरल पोस्ट्स आमच्या निदर्शनास आल्या.

काय आहे या नोटांचे सत्य?

ऍडव्हान्स्ड की-वर्ड्सच्या सर्चअंती आम्हाला अशा काही वेबसाईट्स सापडल्या जेथे आपण आपला फोटो अपलोड करून स्वतःच्या फोटोची १०० डॉलर नोट बनवू शकतो. गंमत म्हणजे यावरील क्रमांक तोच आहे. (Basveshwara 100 dollar note)

प्रयोग म्हणून आम्ही ‘चेकपोस्ट मराठी’चा लोगो टाकून पाहिला. आता ही नोट सर्वत्र पसरवून आम्ही म्हणावे का की अमेरिकेने भारताचा-महाराष्ट्राचा गौरव करत एका मराठी ‘फॅक्टचेक न्यूज वेबसाईट’चा लोगो १०० डॉलरच्या फोटोवर छापला? अर्थातच नाही.

fun experiment to prove fact_Checkpost Marathi fact check
Source: photofunia

खऱ्या नोटेवर कुणाचा फोटो?

वस्तुतः वसाहतींना एकत्र करत अमेरिका निर्माण करणाऱ्या ‘फादर ऑफ अमेरिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेन्जामिन फ्रँकलिन यांचा फोटो १०० डॉलरच्या नोटेवर आहे.

2013 $100 Bill Front

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले. (Basveshwara 100 dollar note) महात्मा बसवेश्वर यांचा फोटो अमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेवर छापण्यात आलेला नाही. या अशा प्रकारच्या नोटांवर फोटो छापण्याची सुविधा म्हणजे केवळ मनोरंजनाचा भाग आहे.

हेही वाचा: टाईम्स स्क्वेअरच्या भव्य जाहिरात फलकांवरील श्रीरामाच्या प्रतिमांचे व्हायरल फोटोज फेक!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा