Press "Enter" to skip to content

कोव्हीड१९ उपचारावर नाराज असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यालाच कोसळले रडू?

‘ऑप इंडिया’ या वेब पोर्टलने २४ सप्टेंबर रोजी एक बातमी दिलीये. या बातमीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे (omprakash shete) यांना राज्यातील कोरोनामुळे वाढत्या मृत्यू संख्येमुळे रडू कोसळल्याचा दावा करण्यात आलाय.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे हे राज्यातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीविषयी माध्यमांशी बोलताहेत. कोरोना व्हायरसमुळे राज्यातील मृत्यूच्या वाढत्या प्रमाणावर शेटे हतबलपणे रडताना दिसताहेत, असा दावा बातमीत करण्यात आला आहे.

Advertisement
OP India news caiming Om Prakash Shete is current OSD checkpost marathi
Source: OPINDIA

साधारणतः असाच काहीसा दावा करत ट्विटरवर देखील व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ओमप्रकाश शेटे (omprakash shete) हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अर्थात ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’ असल्याचा दावा करण्यात येतोय.

अर्काइव्ह पोस्ट

हे ट्विट जवळपास २३०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलं आहे. इतरही अनेक युजर्स याच कॉपीपेस्ट दाव्यांसह हा व्हिडीओ पोस्ट करताहेत. काही हिंदी भाषिक पोर्टलने देखील अशीच बातमी दिलीये.

VK news about Omprakash Shete checkpost marathi
Source: VK News

पडताळणी:

‘ऑप इंडिया’ या वेबसाईटवर प्रकाशित बातमीमध्ये ओमप्रकाश शेटे यांच्या नावाचा उल्लेख असल्याने आम्ही थेट ओमप्रकाश शेटे यांच्याविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.

विविध न्यूज पेपर्समधील बातम्यांनुसार ओमप्रकाश शेटे हे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखलील भाजप-सेना युतीचे सरकार सत्तेत असताना ‘मुख्यमंत्री सहायता निधि कक्षाचे’ प्रमुख होते अशी माहिती आम्हाला मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर मात्र शेटे यांचा देखील कार्यकाळ संपला. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मात्र शेटे यांनी कुठलेही पद भूषवलेले नाही.

खुद्द ओमप्रकाश शेटे यांनी देखील आपल्या ट्विटर बायोमध्ये आपला परिचय ‘विशेष कार्य अधिकारी तथा माजी कक्षप्रमुख मुख्यमंत्री वैदयकीय सहाय्यता कक्ष’ असाच करून दिला आहे.

Om Prakash Shete twitter bio checkpost marathi
Source: Twitter

त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडीओ संदर्भात माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला दै. लोकमतच्या ट्विटर हँडलवर व्हायरल व्हिडीओ बघायला मिळाला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये देखील ओमप्रकाश शेटे यांचा उल्लेख स्पष्टपणे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजीप्रमुख असाच करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ‘ऑप इंडिया’ने देखील आपल्या बातमीत लोकमतच्या या बातमीचा संदर्भ देऊन शेटे यांचा उल्लेख ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख’ असा केला आहे.

महाराष्ट्रातील सामान्य माणूस राज्य सरकारच्या तांत्रिक चुकांमुळे मरतोय असा आरोप करत शेटे यांनी महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत कोरोना रुग्णांचा केवळ व्हेंटिलेटरचाच नव्हे, तर सर्वच खर्चाचा समावेश करावा यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भातील पत्रकार परिषेद विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान शेटे यांना रडू कोसळलं होतं.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडिया आणि काही न्यूज पोर्टल्सच्या दाव्यांप्रमाणे ओमप्रकाश शेटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख नाहीत.

शेटे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख होते. सध्याच्या सरकारमध्ये ते कुठल्याही पदावर कार्यरत नाहीत. 

हे ही वाचा- डॉ. मनमोहन सिंह यांनी २६ सरकारी कंपन्या विकल्याचे सांगणाऱ्या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा