Press "Enter" to skip to content

डॉ. मनमोहन सिंह यांनी २६ सरकारी कंपन्या विकल्याचे सांगणाऱ्या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या!

‘मोदींनी नाही, मनमोहन सिंग ने देश विकला..!!!’ असे म्हणत काही आकडेवारी देणाऱ्या पोस्ट आणि व्हिडीओज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

Advertisement

‘निर्गुंतवणूक’ म्हणजेच ‘Disinvestment’ करणे म्हणजे जर देश विकणे असेल तर मनमोहन सिंह यांनी २००९-१४ या ५ वर्षात २६ सरकारी कंपन्या ३३ वेळा ‘विकल्या’! जर मोदी देश विकत आहेत, तर मनमोहनने देश विकून झाला असं म्हणावं लागेल.

या मजकुरासह काही आकडेवारी सांगणारा मेसेज फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होतोय. याविषयीची माहिती ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक भाऊराज भोसले आणि राजेंद्र काळे यांनी आम्हाला दिली आणि पोस्टची पडताळणी करण्यास सांगितले.

सदर पोस्ट फेसबुकवरून साहेबराव शेळके यांनी शेअर केली आहे, यास बातमी करेपर्यंत २५८ लोकांनी शेअर केले होते.

अर्काईव्ह लिंक

याच आशयाची माहिती देण्यासाठी नितीन शुक्ला यांनी तयार केलेल्या व्हिडीओलाही असेच मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया युजर्सने व्हायरल केले आहे. सदर व्हिडीओ ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन यांनी निदर्शनास आणून दिला. विशाल ठक्कर या फेसबुक युजरने शेअर केलेला हाच व्हिडीओ:

nitin shukla fb viral video

अर्काईव्ह व्हिडीओ

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी ‘Department of Investment and Public asset management’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली आणि ‘Past Disinvestment’ सेक्शनमधील माहिती तपासून पाहिली. २००९ते आतापर्यंतची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

व्हायरल पोस्ट मध्ये अर्ध सत्य:

व्हायरल व्हिडीओमध्ये डॉ. मनमोहन सिंह यांच्या २००९ ते २०१४ च्या काळात ज्या ज्या सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक म्हणजेच Disinvestment केलीय ती यादी बरोबरच आहे. म्हणजेच ३३ वेळा विविध सरकारी कंपन्यांमधून निर्गुंतवणूक केली आहे. परंतु हा आकडा सांगताना २०१४ नंतरच्या (मोदी सरकारच्या काळातील) आकडेवारीबद्दल काहीही बोलले गेले नाही.

त्याच आकडेवारीचा आढावा:

  • २०१४ ते १५ सालातील निर्गुंतवणूक- ७ वेळा
  • २०१५ ते १६ सालातील निर्गुंतवणूक- ९ वेळा
  • २०१६ ते १७ सालातील निर्गुंतवणूक- २१ वेळा
  • २०१७ ते १८ सालातील निर्गुंतवणूक- ३६ वेळा
  • २०१८ ते १९ सालातील निर्गुंतवणूक- २८ वेळा

याचाच अर्थ मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षात जवळपास १०१ वेळा विविध सरकारी कंपन्यांमधून निर्गुंतवणूक केली गेली होती.

याच पद्धतीने पाहिल्यास २०१९ ते २० या आर्थिक वर्षात १५ वेळा निर्गुंतवणूक केली गेली आहे.

मोदींनी देश विकला की मनमोहन सिंह यांनी?

वरील आकडेवारीकडे पाहिल्यास लक्षात येईल की मनमोहन सिंह यांनी त्यांच्या ५ वर्षाच्या एका टर्म मध्ये ३३ वेळा विविध कंपनीज मधून निर्गुंतवणूक केली होती, तेच नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या ५ वर्षाच्या टर्म मध्ये १०१ वेळा हा निर्णय घेतला होता. म्हणजे मग मोदींनी देश विकला मनमोहन सिंह यांनी नाही असे म्हणायचे का? तर तसेही नाही.

कारण यासाठी आपणास निर्गुंतवणूक म्हणजेच Disinvestment म्हणजे काय आणि ती कशासाठी केली जाते. त्याचे फायदे तोटे काय हे समजून घ्यावे लागेल.

काय असते निर्गुंतवणूक/ Disinvestment?

केंद्र किंवा राज्य सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा प्रकल्पात असलेली आपली भागीदारी विकते किंवा तेवढ्या टक्क्याच्या गुंतवणुकीचे समभाग करते त्यास विनिवेश/निर्गुंतवणूक/ Disinvestment असे म्हणतात.

सरकारी तिजोरीवरील वित्तीय बोजा कमी करण्यासाठी किंवा इतर नियमित स्रोतांकडून होणाऱ्या महसुलातील तूट भरून काढण्यासाठी अथवा इतर विशिष्ट गरजा भागविण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी सरकार निर्गुंतवणूक करते.

काही प्रकरणांमध्ये मालमत्तेचे खासगीकरण करण्यासाठी निर्गुंतवणूक केली जाऊ शकते. परंतु याचा अर्थ प्रत्येक निर्गुंतवणूक खाजगीकरण नाही.

जेव्हा विशिष्ट सार्वजनिक कंपनीतून मोठ्या टक्केवारीत निर्गुंतवणूक केली जाते, अर्ध्याहून अधिक प्रमाणात खाजगी गुंतवणूक वाढते तेव्हा तिच्यावरील सरकारी हक्क कमी होतात, या प्रक्रियेस खाजगीकरण म्हणू शकतो.

वस्तुस्थिती:

निर्गुंतवणूक म्हणजे थेट खाजगीकरण, कंपनी विकली किंवा देश विकला असे म्हणणे चुकीचे आहे. डॉ. मनमोहन सिंह काय किंवा नरेंद्र मोदी काय दोन्ही पंतप्रधानांच्या कार्यकाळात कितीवेळा निर्गुंतवणूक झाली हा आकडा तितकासा महत्वाचा नाही. किती टक्के करण्यात आली आणि किती टक्के शिल्लक आहेत यावर ती कंपनी सरकारी आहे की खाजगी हे ठरेल.

या सर्व आकडेवारीपैकी किती कंपन्यांतून सरकारी हक्क कमी झाले किंवा संपले हे Department of Investment and Public asset management’ च्या वेबसाईट वरून समजणे अवघड आहे कारण यावर टक्केवारीची माहिती मोजक्याच कंपनीजची आहे.

म्हणजेच थोडक्यात काय तर व्हायरल मेसेज, पोस्ट, व्हिडीओज एक गोष्ट झाकून दुसरीवर प्रश्न विचारत मनमोहन सिंह यांनी सरकारी कंपन्या कशा विकल्या हे नकळतपणे पसरवत आहेत.

हेही वाचा: ‘गुजरात व्हेंटीलेटर ब्लास्ट आणि मालकाचे राजकीय कनेक्शन?’ वाचा काही महत्वाचे ‘फॅक्ट्स’!

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा