Press "Enter" to skip to content

प्रियंका गांधींच्या रॅलीमध्ये केवळ मुस्लिम धर्मियांच्या ‘अजान’चे पठण करण्यात आले?

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये रॅली पार पडली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी या रॅलीतील एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) आणि इतर काँग्रेस नेते दिसताहेत. सोबत इस्लामिक प्रार्थनेचे स्वर कानी पडताहेत.

Advertisement

व्हिडिओच्या दुसऱ्या भागात दोन व्यक्ती कुठल्याशा रिपोर्टरला प्रतिक्रिया देताना दिसताहेत. ती व्यक्ती म्हणतेय की “वही कांग्रेस जो हिन्दू इस देश में ब्राह्मण हितैषी बन रही है वही आज अपने मंच से जो अज़ान करवाती है. क्या वो ब्राह्मणों की रक्षा करेगी? जो अपने हिन्दू की रक्षा नहीं कर रही है वो अज़ान मंच से करवा रही है.” व्हिडीओ शेअर करून संबित पात्रांनी काँग्रेसवर मुस्लिम अनुनयाचा आरोप केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

आम्ही किवर्डच्या आधारे प्रियंका गांधी यांच्या वाराणसी रॅलीचा संपूर्ण व्हिडिओ शोधला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर आम्हाला वाराणसीमध्ये आयोजित रॅलीचा व्हिडिओ बघायला मिळाला. व्हिडिओमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख धर्मांशी संबंधित गुरूंच्या माध्यमातून प्रार्थना करण्यात आली आहे.

व्हिडिओमध्ये माईकवरील काँग्रेस कार्यकर्ता म्हणतोय, ‘सबसे पहले हम अपनी परम्पराओं के अनुसार … कांग्रेस पार्टी का हमेशा रहा है कि सर्व धर्म सद्भाव हम अपनाते रहें हैं तो सबसे पहले हमारे हिन्दू धर्म के जो साथी यहाँ पर आएं हैं उनसे मैं निवेदन करता हूँ कि मंत्रोचार के साथ जो है … फिर हमारे मुस्लिम भाई फिर हमारे सिख भाई फिर हमारे ईसाई भाई जो हैं वो वहाँ पर स्वागत करेंगे और फिर आ के यहां पे भेंट करेंगे’.

व्हिडिओमध्ये 1 मिनिट 45 सेकंद ते 5 मिनिटे 4 सेकंदांदरम्यानच्या कालावधीत कुठलाही आवाज ऐकायला मिळत नाही. आवाज सुरु झाल्यानंतर ‘हर हर महादेव’चा जयघोष ऐकायला मिळतोय. त्यानंतर कुराणमधील आयत आणि शीख धर्मियांची गुरुवाणी ऐकायला मिळतेय.

रॅलीमध्ये प्रियंका गांधी यांनी केलेल्या भाषणाची सुरुवात देखील संस्कृतमधील श्लोकाने केली असल्याचे बघायला मिळतेय. प्रियंका गांधी दुर्गामातेच्या मंत्राचे पठण करत असल्याचे देखील बघायला मिळतेय. ‘नवभारत टाईम्स’ने प्रियंका गांधींच्या वाराणसी रॅलीची बातमी प्रसिद्ध केली आहे. या बातमीमध्ये देखील ‘हर हर महादेव, कुराणची आयत आणि गुरुवानीच्या घोषात काँग्रेसच्या ‘किसान न्याय रॅली’ची सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Source: NBT

काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी संबित पात्रांच्या ट्विटवर रिप्लाय करत रॅलीमधील हिंदू मंत्रोच्चरणाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी पात्रांना अजून किती खालची पातळी गाठणार आहात, असा खोचक सवाल देखील विचारलाय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की प्रियंका गांधींच्या वाराणसीमधील रॅलीमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख धर्मांशी संबंधित प्रार्थनांचे पठण करण्यात आले. सोशल मीडियावर केवळ कुराणमधील आयतचा व्हिडीओ शेअर करून काँग्रेस मुस्लिमांचे लांगुलचालन करत असल्याचे केले जाणारे दावे चुकीचे आहेत.

हेही वाचा- प्रियंका गांधींनी झाडलोट करतानाच्या फोटोसाठी फोटोग्राफरला जमिनीवर लोटांगण घालायला भाग पाडल्याचे दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा