Press "Enter" to skip to content

प्रियंका गांधींनी झाडलोट करतानाच्या फोटोसाठी फोटोग्राफरला जमिनीवर लोटांगण घालायला भाग पाडल्याचे दावे चुकीचे!

सोशल मीडियावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये प्रियंका गांधी झाडून घेताना दिसताहेत आणि एक फोटोग्राफर जमिनीवर झोपून त्यांचा फोटो घेत असल्याचे बघायला मिळतेय. अनेकांकडून हा फोटो शेअर केला जातोय.

Advertisement

प्रियंका गांधी केवळ साफसफाईचे नाटक करत असून झाडून घेण्याची कृती म्हणजे त्यांचा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा दावा केला जातोय. जीडी बक्षी फॅन या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेला हा फोटो ७०० पेक्षा अधिक वेळा रिट्विट केला गेलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

सर्वप्रथम तर प्रियंका गांधी यांचा झाडलोट करत असतानाचा हा फोटो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला india.com या वेबपोर्टलवर ८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये व्हायरल फोटो बघायला मिळाला. यामध्ये प्रियंका गांधी दिसत असल्या तरी त्यांचा फोटो घेण्यासाठी लोटांगण घातलेला फोटोग्राफर मात्र फोटोतून गायब आहे.

UP CM योगी के बयान का विरोध, प्रियंका गांधी ने फिर लगाया झाड़ू, बोलीं- यह स्वाभिमान का प्रतीक है
Source: India.com

बातमीनुसार प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) अचानक लखनौमधील इंदिरा नगरच्या दलित वसाहतीतील लवकुश नगरमध्ये पोहोचल्या. त्यांनी लवकुश नगरमध्ये झाडलोट आणि साफसफाई केली. झाडलोट करणे हे स्वाभिमान आणि साधेपणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

लखीमपूर खिरी प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका यांचा आपली रूम झाडून घेत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा प्रतीकात्मक निषेध करण्यासाठी प्रियंका यांनी पुन्हा एकदा झाडलोट केली.

भास्करच्या बातमीमध्ये देखील प्रियंका गांधींचा झाडलोट करतानाचा फोटो बघायला मिळतो. मात्र यामध्ये देखील जमिनीवर लोळण घेऊन प्रियंका यांचा फोटो घेणारा फोटोग्राफर कुठेच दिसत नाही. आम्ही जमिनीवर लोटांगण घेतलेल्या फोटोग्राफरचा फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला पीएक्सफ्युएल या फोटो स्टॉक वेबसाईटवर तो फोटो बघायला मिळाला.

Source: pxfuel

दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या फोटोजवरून हे स्पष्ट झाले की मूळ फोटोत फोटोग्राफर नाही. एडिटिंगच्या मदतीने जमिनीवर लोटांगण घातलेल्या फोटोग्राफरचा फोटो प्रियंका यांच्या फोटोसोबत जोडण्यात आला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की प्रियंका गांधी यांचा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो एडिटेड आहे. मूळ फोटोत जमिनीवर लोटांगण घातलेला फोटोग्राफर नसून तो एडिटिंगच्या मदतीने प्रियंका गांधींच्या फोटोसोबत जोडण्यात आला आहे.

अशाच प्रकारचे एडिटिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसोबत देखील करण्यात आले होते. यासंदर्भातील आमची सविस्तर पडताळणी आपण ‘येथे’ वाचू शकता.  

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा