सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओत एक व्यक्ती योगाभ्यास करताना दिसतेय. दावा केला जातोय की ही व्यक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi performing yoga) आहेत.
‘प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी का यह योगी रूप पहली बार जनता के सामने आया है…’ अशा कॅप्शनसह ब्लॅक अँड व्हाईट व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक मनोज मनोरवार यांनी व्हॉट्सऍप ग्रुपवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आमच्या निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

हा व्हिडीओ नोव्हेंबर २०२० पासून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

एफटीआयआयचे माजी संचालक गजेंद्र चौहान यांनी मोदीजींचे हे योगी रूप (narendra modi performing yoga) आपण कधीच पाहिले नसेल’ असे म्हणत व्हिडिओ शेअर केलेला. हा व्हिडीओ साधारणतः २२०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आला होता. आता त्यांनी ते ट्विट डिलीट केले आहे.
पडताळणी:
सोशल मीडियावर व्हायरल ‘ब्लॅक अँड व्हाईट’ व्हिडीओ बऱ्यापैकी जूना असल्याचं लगेच लक्षात येतं. त्यामुळे व्हिडिओतील व्यक्ती नेमकी कोण हे जाणून घेण्यासाठी आम्ही व्हिडीओच्या कि फ्रेम्स घेऊन रिव्हर्स सर्चच्या आधारे व्हिडिओचा शोध घेतला.
आम्हाला ‘MCPetruc’ या युट्यूब चॅनेलवर १२ मे २००६ रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. व्हिडिओच्या कॅप्शननुसार व्हिडिओत दिसणारी व्यक्ती प्रख्यात योगगुरू बीकेएस अयंगार आहेत. १९३८ साली त्यांच्यावर बनवण्यात आलेल्या योग प्रात्यक्षिकांचा मूक पटातील ही दृश्ये असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की व्हिडीओ १९३८ साली शूट करण्यात आलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मच १७ सप्टेंबर १९५० रोजीचा आहे. म्हणजेच व्हिडिओतील व्यक्ती नरेंद्र मोदी असणं व्यवहारिकरीत्या अशक्य आहे.
कोण होते बीकेएस अयंगार?
१४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकातील बेल्लूर येथे जन्मलेले बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अयंगार हे जगप्रसिद्ध योगगुरू होते. जगभरातील वेगवेगळ्या देशात त्यांचे अनेक अनुयायी आहेत. योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय त्यांचेच. त्यांचे २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.
‘टाइम’ मासिकाने २००४ साली जगभरातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. ‘लाइट ऑफ योग’, ‘लाइट ऑफ प्राणयाम’ यांसारख्या पुस्तकांचे लेखक असणाऱ्या अयंगार यांना पदमविभूषण सन्मानाने देखील गौरविण्यात आले होते.
बीबीसी हिंदीच्या रिपोर्टनुसार अयंगार हे योगाशी इतके एकरूप होते की ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये अय्यंगार या शब्दाचा अर्थ ‘अष्टांग योगाची शाखा’ असा करण्यात आलेला आहे. त्यांच्याबद्दल एक किस्सा असाही सांगितला जातो की त्यांनी बेल्जीयमच्या राणीकडून वयाच्या ऐंशीव्या वर्षी शीर्षासन करून घेतले होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओतील योगाभ्यास करणारी व्यक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून जगप्रसिद्ध योगगुरू बीकेएस अयंगार हे आहेत. व्हिडीओ १९३८ साली शूट करण्यात आलेला असून त्यावेळी नरेंद्र मोदी यांचा जन्म देखील झाला नव्हता.
हे ही वाचा- नेहरूंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी प्रियंका गांधींच्या ट्विटशी छेडछाड!
[…] […]