Press "Enter" to skip to content

रांची येथे तोडफोड करण्यात आलेल्या शिवलिंगाचा फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल!

झारखंडची राजधानी रांची येथील मंदिरातील तोडफोड करण्यात आलेल्या शिवलिंगाचा फोटो (Shivling vandalized in Ranchi) सोशल मीडियावर शेअर केला जातोय. दावा करण्यात येतोय की मुस्लिम धर्मियांकडून या शिवलिंगाची तोडफोड करण्यात आली असून हिंदूंनी जागे होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा त्यांना आयुष्यभर मुस्लिमांची गुलामगिरी पत्करावी लागेल.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

उजव्या विचारधारेशी संबंधित न्यूज पोर्टल ‘ऑप इंडिया’ने देखील यासंदर्भातील बातमी साधारणतः अशाच अर्थाची माहिती देऊन प्रसिद्ध केली आहे.

अर्काइव्ह पोस्ट

‘ऑप इंडिया’ पोर्टलच्या बातमीच्या आधारे ‘सनातन प्रभात’ने देखील ही बातमी प्रसिद्ध केली आहे. भारत असो कि पाकिस्तान, हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतच आहेत. ही स्थिती कायमस्वरूपी पालटण्यासाठी हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही! असं सनातन प्रभातच्या बातमीत म्हंटलं गेलंय.

पडताळणी:

घटना झारखंडमधील रांची येथील अपर बाजार परिसरातील असल्याचा उल्लेख ‘ऑप इंडिया’च्या बातमीत आहे. त्यामुळे घटनेविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी गुगलवर किवर्ड सर्च केलं असता आम्हाला दैनिक भास्करच्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमी मिळाली.

भास्करच्या बातमीनुसार घटना रांचीच्या अपर बाजार परिसरातील रंगरेज गल्लीतील आहे. या भागाच्या डीएसपी यशोधरा यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवलिंगाची तोडफोड (Shivling vandalized in Ranchi) करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही व्यक्ती मंदिराच्या दिशेने दगड भिरकावताना दिसतेय. याशिवाय तो तेथील नाल्यांचे स्लॅबही फेकत होता.

डीएसपी यशोधरा यांनी असेही सांगितले की भारतीय दंड संहितेमध्ये (आयपीसी) मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीवरील कारवाईची तरतूद नाही. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. ती व्यक्ती डोंगराळ भागातील मंदिर परिसरात राहते. ताब्यात घेतल्यानंतर त्या व्यक्तीवरील कारवाईविषयी निर्णय घेतला जाईल.

संपूर्ण बातमीमध्ये कुठेही आरोपीच्या नावाचा उल्लेख नाही. या प्रकरणाशी संबंधित इतरही रिपोर्ट्समध्ये कुठेही आरोपी मुस्लिम असल्याचा कुठलाही पुरावा नाही. शिवाय हे संघटीतरित्या घडवून आणलेले कृत्य नसून एका मनोरुग्णाने शिवलिंगाच्या दिशेने दगड भिरकावल्याने शिवलिंगाचे नुकसान झाल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की रांचीमधील शिवलिंगाच्या तोडफोडीच्या घटनेमध्ये कुठलाही धार्मिक अँगल नाही. प्रकरणातील आरोपी मुस्लिम असल्याच्या दाव्यांना देखील कुठलाही आधार नाही. विशिष्ट धर्माविरोधात जनमत भडकविण्याच्या उद्देश्याने जाणीवपूर्वक अशा प्रकारचे दावे केले जाताहेत.

हे ही वाचा- कॉंग्रेसने मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या फाईव स्टार होस्टेलमध्ये हिंदूंना प्रवेश नाही?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा