Press "Enter" to skip to content

‘इतना डर काफी है तुम्हारे लोगो के लिये’ म्हणणारा मुस्लीम इसम मालेगाव मधला नाही

‘हे पहा मालेगाव स्टार हॉटेलजवळ धिंगाणा घालून सरळ सरळ प्रशासनाला आणि इतर समुदायाला धमकी. कोणाचाच येथे धाक राहिलेला नाही. मालेगाव मध्ये प्रशासनाचे हात बांधून ठेवले आहेत म्हणून एवढी दादागिरी आणि डेअरिंग वाढलेली आहे. आहे का कुणी मालेगावला वाली?’ अशा आशयाच्या मेसेज सोबत एका मुस्लीम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Advertisement

व्हिडीओतील व्यक्ती पेहरावावरून मुस्लीम वाटत आहे. परिसरातील पोलिसांच्या तीनचार गाड्या दाखवत तो म्हणतोय, ”ये देखो एक, दोन गाडी, तीन गाडी, ये देखो चार गाडीया हमारे एरीये में. स्टार होटल के सामने. हम जरा कूच करे तो तेहलका मचा देते ये लोग. इतना डर काफी है तुम्हारे लोगोंके लिये समझे ना? समझ गये शायद ना?”

पडताळणी:

  • पिवळी बॉडी असणारी रिक्षा:

या दाव्याची पडताळणी करणं फार सोपं आहे. मेसेजमध्ये लिहिलंय की हे सर्व मालेगावात  म्हणजेच महाराष्ट्रात घडत आहे. आम्ही जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हाच आमच्या लक्षात आलं की काहीही झालं तरी हा व्हिडीओ मालेगावचाच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतरही कुठल्या भागातील असूच शकत नाही. कारण व्हिडीओच्या सुरुवातीलाच आपणास रस्त्यावर एक रिक्षा दिसतेय. तिच्या छताचा रंग काळा आणि इतर बॉडीचा रंग पिवळा आहे.

‘संपूर्ण बॉडी पिवळ्या रंगात आणि हूड म्हणजेच छत काळ्या रंगात’ अशा रंगसंगती असणाऱ्या रिक्षा संपूर्ण भारतात आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या तीन राज्यांमध्येच अढळतात. उर्वरित राज्यांमध्ये मुख्यतः ‘संपूर्ण काळा रंग आणि मध्ये छोटासा पिवळ्या रंगाचा पट्टा’ अशीच रंगसंगती असणारे रिक्षा बघायला मिळतात.

मालेगावचा RTO नंबर आहे MH41. त्याच क्रमांकाची गुगल इमेज मध्ये सापडलेली एक रिक्षा पहा. तिची रंग संगती इतर रिक्षांप्रमाणे सामान्य आहे. पूर्ण बॉडी पिवळ्या रंगात नाही.

  • बोलण्याची हैद्राबादी शैली:

दुसरा मुद्दा असा की, व्हिडीओ जरासा लक्ष देऊन ऐकला तर त्यातील इसमाची बोलण्याची शैली हैद्राबादी लहेजाशी मिळती जुळती वाटते. “तुम्हारे लोगोंके लिये समझे ना? समझ गये शायद ना?” यात संबंधित व्हिडिओतील इसमाने ‘ना’ म्हणताना लांबवलेला सूर हा हैद्राबादी हिंदी सारखाच आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट’च्या पडताळणी मध्ये हे लक्षात आलं की संबंधित व्हिडीओ हैद्राबादच्या आसपासच्या परिसरातील असावा. व्हिडीओची क्वालिटी तितकीशी चांगली नसल्याने आम्हाला गाड्यांचे नंबर्स बघणं शक्य झालं नाही. त्यामुळे अर्थातच घटनेचं निश्चित ठिकाण सांगता येणं अवघड आहे परंतु एवढं मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो की हा व्हिडीओ महाराष्ट्रातील मालेगावचा नक्कीच नाही. धार्मिक तेढ निर्माण होईल अशा या अफवांना वेळीच थांबवलेलं बरं. म्हणूनच  आम्ही हा मालेगावच्या नावाखाली खपवला जात असलेला व्हिडीओ ‘चेकपोस्ट’वरच थांबवत आहोत.

हे ही वाचा- बाजारात गर्दी केलेल्या मुस्लिम लोकांचे व्हायरल फोटोज मुंबईच्या महम्मद अली रोडचे नाहीत

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा