Press "Enter" to skip to content

बाजारात गर्दी केलेल्या मुस्लिम लोकांचे व्हायरल फोटोज मुंबईच्या महम्मद अली रोडचे नाहीत

मुंबईच्या महम्मद अली रोडचे म्हणून काही फोटोज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. ‘जे व्हायचं तेच झालं, हीच अपेक्षा होती, अतिशय सुंदर दृश्य, लॉकडाऊन का जनाजा’ अशा विविध उपहासात्मक वाक्यांचा आधार घेत ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांतून हे फोटोज व्हायरल केले जाताहेत.

Advertisement

रमजानची खरेदी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगला, शासन नियमांना हरताळ फासून मुस्लीम समाज कसा गर्दी करत आहे हे सांगण्याचा प्रयत्न यातून होताना दिसतोय. हे फोटोज खवैय्यांच्या आवडत्या महम्मद अली रोडवरील असल्याचा दावा केला जात आहे. शेअर करणारे काही लोक मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्वीटर हँडल्सलासुद्धा टॅग करताहेत.

पडताळणी:

‘चेकपोस्ट’ने गुगल रिव्हर्स इमेजद्वारे व्हायरल होत असलेल्या फोटोंची सत्यता तपासली असता हे फोटो मुंबईच्या महम्मद अली रोडवरील असल्याचा एकही पुरावा सापडला नाही. त्यानंतर गाड्यांचे नंबर्स, दुकानाच्या पाट्या याआधारे फोटोज नेमके कुठले हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र फोटोंची क्वालिटी तितकी उत्तम नाही की झूम करून त्याआधारे काही ठोस माहिती हाताशी लागेल.

या सर्वात एक फोटो असा सापडला की ज्यामध्ये मेट्रो पुलाखाली खरेदीसाठी जमलेली गर्दी दिसत आहे. प्रथमदर्शनी मेट्रोमुळे हे दृश्य मुंबईचेच असावे, असे कुणालाही वाटू शकेल. मात्र  आम्ही ज्यावेळी हा फोटो झूम करून बारकाईने निरीक्षण केलं, त्यावेळी मेट्रोपुलावरील एका चिन्हाने आमचं लक्ष्य खेचून घेतलं. त्या चिन्हाचा शोध घेतला असता असं लक्षात आलं की हा लोगो ‘हैद्राबाद मेट्रो रेल्वे’चा आहे. याचाच अर्थ असा की हे फोटो मुंबईतील नसून हैद्राबादमधील आहेत. 

एकदा का हे फोटोज महम्मदअली रोडवरील नसल्याची खात्री पटल्यानंतर मग ‘चेकपोस्ट’ने   महम्मदअली रोडवरील सद्यस्थिती समजून घेण्यासाठी शोधकार्य सुरु केले. त्यावेळी  महम्मदअली रोडवर घडणाऱ्या घडामोडींचं वार्तांकन करणाऱ्या विविध वृत्तपत्रांच्या आणि पोर्टल्सच्या बातम्या आम्हाला सापडल्या. त्यातली लोकसत्ताच्या बातमीचा मथळा असं म्हणतो की, ‘मशिदी बंद, नमाज घरातच- महम्मद अली रोड आणि त्याच्या आजूबाजूच्या गल्ल्यांमध्येही शुकशुकाट’.

यासंदर्भातच ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राने ‘Mumbai’s famous Mohammed Ali Road deserted!’ या शीर्षकाखाली एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये महम्मद अली रोडवरील दरवर्षीची गर्दी, वेगवगेळ्या खाद्य पदार्थांची रेलचेल आणि यावर्षीच्या निर्मनुष्य, वाळवंट सदृश्य परिस्थितीच्या दृश्यांचा कोलाज केला.

‘दैनिक भास्कर’ आणि ‘मुंबई मिरर’ने शेअर केलेले फोटोज सुद्धा महम्मदअली रोडची सद्यस्थिती दर्शवताना दिसले.

वस्तुस्थिती:

आमच्या पडताळणी अंती हे स्पष्ट झाले आहे की महम्मद अली रोड, मुंबईच्या नावे व्हायरल केले जात असलेले फोटोज हैद्राबाद आणि इतर मुस्लीमबहुल भागातील आहेत. शिवाय सद्यस्थितीत मुहम्मद अली रोड परिसर निर्मनुष्य म्हणाता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणात रिकामा आहे. त्यामुळे मुंबईच्या महम्मद अली रोड वरील गर्दीचे व्हायरल फोटो फेक असल्याचे स्पष्ट झाल्याने या फेक व्हायरलला आम्ही ‘चेकपोस्ट’वरच अडवत आहोत.

हे ही वाचा- वारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला नाही, ‘तो’ व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा !

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा