Press "Enter" to skip to content

उत्तर प्रदेशात 34 मुस्लिम कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय?

सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांच्या हिंदू धर्मातील प्रवेशानंतर आता उत्तर प्रदेशातील आणखी 34 मुस्लिम कुटुंबियांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय. व्हायरल फोटोमध्ये अनेक मुस्लिम तरुण आणि प्रौढ डोक्यावर टोप्या घातलेले दिसताहेत. फोटोत भगवे कपडे परिधान केलेला एक साधूही बघायला मिळतोय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता अमर उजालाच्या वेबसाईटवर 24 सप्टेंबर 2016 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. ‘जामा मस्जिद पर लगे पाकिस्तान मुर्दाबाद के नारे’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध बातमीनुसार जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर वृंदावनमधील मुस्लिम समुदायाने पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत हल्ल्याचा निषेध केला होता.

शुक्रवारच्या नमाजानंतर मथुरा दरवाजा येथील शाही जामा मशिदीबाहेर मुस्लिम समाजाचे लोक जमले. शाही जामा मशिदीचे इमाम मुहम्मद उमर कादरी आणि महामंडलेश्वर नवल गिरी यांच्या पुढाकाराने वृद्ध, तरुण आणि लहान मुलांनी भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

याच घटनेचा व्हिडीओ देखील अमर उजालाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. व्हिडिओमध्ये मुस्लिम समुदायातील लोक आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबादची घोषणाबाजी करत असताना बघायला मिळताहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. फोटो साधारणतः ५ वर्षांपूर्वीचा असून पाकिस्तानकडून उरी येथील लष्करी तळावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाचा हा फोटो आहे.

हेही वाचा- नासाच्या वैज्ञानिकाने कुटुंबासह स्वीकारला हिंदू धर्म? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा