X
Advertisement

कोरोना मृतांच्या अनाथ मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करणारे व्हायरल मेसेजेस फेक!

कोव्हीडमुळे अनाथ (corona orphan) झालेल्या अवघ्या ३ दिवसाच्या आणि ६ महिन्याच्या दोन मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करणारे मेसेज, पोस्ट्स सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतायेत.

Advertisement

काय आहे व्हायरल मेसेज?

दत्तक घेण्यासाठी:
जर एखाद्यास मुलगी दत्तक घ्यायची असेल तर
कृपया मोकळ्या मनाने 09711104773 (प्रियांका) वर संपर्क साधा. एक मुलगी 3 दिवसांची आणि दुसरी 6 महिन्यांची आहे, कोविडमुळे नुकतेच त्यांचे पालक गमावले आहेत.
कृपया या मुलांना नवीन जीवन मिळविण्यात मदत करा, शब्द पसरवा.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक, ‘समाजबंध’ या समाजसेवी संस्थेचे संस्थापक सचिन आशा सुभाष यांनी व्हायरल मेसेज निदर्शनास आणून दिले. फेसबुकवरही अशाप्रकारच्या पोस्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत.

अर्काइव्ह लिंक

पडताळणी:

व्हायरल पोस्टमधील मोबाईल क्रमांकावर कॉल करून पाहिला असता ‘अस्तित्वात नाही’ अशी सूचना आली. तो क्रमांक ‘कीवर्ड’ म्हणून वापरत गुगल सर्च केले असता अशा प्रकारचे दत्तक घेण्याचे आवाहन करणारे (corona orphan) मेसेज हिंदी आणि इंग्रजीतूनही व्हायरल होत असल्याचे समजले.

महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून सदर व्हायरल मेसेजची दखल घेत तो बेकायदेशीर, भ्रामक आणि दिशाभूल करणारा फेक असल्याचे सांगितले आहे. शिवाय अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

आपणास हव्या त्या मुलास दत्तक घेता येतं का?

व्हायरल दाव्यात सांगितल्याप्रमाणे मुल दत्तक घेता येत नाही. रुग्णालयात, रस्त्यावर, मंदिराबाहेर असहाय्य अनाथ मुल दिसलं आणि आपल्याला त्यास दत्तक घ्यावं वाटलं म्हणून घरी घेऊन आलो असं होत नाही. थेट मुल घेऊन येणं गुन्हा आहे, यास तस्करीच्या कलमाअंतर्गत शिक्षा होऊ शकते. कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केल्यानंतरच मुलांना दत्तक घेता येतं.

मुल दत्तक घेण्याची कायदेशीर पद्धत:

  • भारत सरकारच्या महिला बाल कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या ‘Central Adoption Resource Authority’ या संवैधानिक संस्थेच्या मदतीनेच आपण मुल दत्तक घेऊ शकतो.
  • एकटा पुरुष, एकटी महिला किंवा जोडपे मुल दत्तक घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना http://cara.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन स्वतःचे डीटेल्स भरावे लागतात.
  • दत्तक घेणारे पालक मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ हवेत याची खात्री केली जाते.
  • एकटी महिला किंवा पुरुष जर मुल दत्तक घेऊ इच्छित असतील तर त्यांचे वय २५ ते ४५ च्या दरम्यान असायला हवे.
  • एकटी महिला मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकते, परंतु एकटा पुरुष केवळ मुलाला दत्तक घेऊ शकतो
  • CARAच्या वेबसाईटवर जेव्हा आपण रजिस्टर करता तेव्हा एक रजिस्ट्रेशन क्रमांक आपणास मिळतो. त्यावर आपले सर्व डीटेल्स असतात. या नंबरद्वारेच आपण इच्छित असलेल्या वयोगटातील मुल दत्तक घेण्याची प्रोसेस कुठवर आलीय हे समजते.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्या जवळील केंद्रात बोलावून आपले दत्तक मुल सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे समुपदेशन केले जाते.
  • या सर्व प्रोसेसनंतर मुल घरी घेऊन आल्यानंतरसुद्धा पुढचे २ वर्ष एजन्सीचे अधिकारी घरी येऊन मुलाचा सांभाळ व्यवस्थित करत आहात की नाही हे तपासतात. त्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण त्या मुलाचे पालक बनतो.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत कोरोना मृतांच्या अनाथ मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करणारे व्हायरल मेसेजेस फेक असल्याचे स्पष्ट झाले.

या पद्धतीच्या कुठल्याही मेसेजला बळी पडू नये. कुणा तिऱ्हाईत व्यक्तीकडून मुल दत्तक घेऊन आल्यास आपल्यावर तस्करीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आपणास जर असे कुणी असहाय्य मुल सापडले तर ते पोलिसांकरवी ‘बाल कल्याण’ विभागाकडेच सुपूर्द करावे.

हे ही वाचा: जिवंत कोरोना रुग्णास मृत घोषित करून जाळायला नेत असल्याचा व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारा!

View Comments (0)