जिवंत कोरोना रुग्णास मृत घोषित करून जाळायला नेत असल्याच्या (Living corona patient declared dead) दाव्यासह २० सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही लोक सदर व्हिडीओ औरंगाबादचा असल्याचे सांगताहेत.
“औरंगाबादच्या दवाखान्यातील कोरोना पेशंटला जिवंत पणीच जाळायला नेले होते याची बातमी का टिव्हीवर दाखवली जात नाही ? कोणता नेता का याची चाचपणी का करत नाही ? असे भोंगळ कारभारामुळे जनतेला दवाखान्यात जायची भिती का निर्माण होणार नाही का ?कोरोनाच्या नावाने किती जिवंत पेशंटला जाळले ? मायबाप सरकारने याची दखल घ्यावी पेशंट खरच मृत आहे की फक्त घोषित केले गेले आहे हे शहानिशा करून त्यांना दहन करावे दुसरे म्हणजे प्रत्येक रुग्णाचे पोस्टमार्टम करावेत जेणेकरून खरच कोरोनाने रुग्ण मृत झाला की इतर आजाराने मृत झाला हेही लक्षात येईल.”
संतोषगुरु बाळकृष्ण केदार (फेसबुक युजर)
अशा कॅप्शनसह फेसबुकवर त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलाय.
औरंगाबाद शहरातील शासकीय रुग्णालय ‘घाटी’ मधील ही घटना असल्याचे सांगणारा हा दावा फेसबुकसह व्हॉट्सऍपवरही व्हायरल होतोय.
व्हॉट्सऍपवर व्हायरल होणाऱ्या या दाव्यांची सत्यता पडताळण्याची विनंती ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शंकर साळवे यांनी केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कर्मचारी वर्गाचा ताण खूप असल्याने सदर घटनेविषयी स्पष्टीकरण किंवा माहिती देण्यासाठी कुणा अधिकृत व्यक्तीशी बोलणे शक्य झाले नाही.
- ती घटना औरंगाबादची नाही
आम्ही शहरातील स्थानिक पत्रकार ज्यांचा शासकीय रुग्णालयाशी म्हणजेच ‘घाटी’ (Govt Hospital And Training Institute) सोबत रोजचा संबंध आहे त्यांच्याशी बोलून पाहिले असता, ती घटना औरंगाबाद मधील नसल्याची खात्रीशीर माहिती त्यांनी दिली.
- व्हिडीओतील व्यक्ती मृतच
व्हायरल व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की मृत व्यक्तीने स्वतःहून मान फिरवलेली नाही. पीपीई कीट घातलेला कर्मचारी अथवा नातलग जो कुणी शवाजवळ गेलाय त्याने आपल्या उजव्या हाताने एका बाजूला पडलेली मान सरळ करण्याचा प्रयत्न केलाय. तो डोक्याच्या मागच्या बाजूचा हात व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतोय.
राहिला प्रश्न डोळ्यांचा तर, मृत व्यक्तीचे हलकेसे डोळे आधीपासूनच उघडे आहेत. केवळ मान फिरवल्यावर त्यावर उजेड पडला आणि ते चमकल्याने सदर व्यक्ती डोळे उघडत असल्याचे जाणवले. या दोन्ही बाबी खालील स्क्रीनशॉट्समध्ये व्यवस्थित लक्षात येतील.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओसोबतचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
जिवंत कोरोना रुग्णास मृत घोषित करण्यात आले (Living corona patient declared dead) नसून व्हिडीओतील व्यक्ती मृतच आहे. तिने हलवलेली मान स्वतःहून केलेली क्रिया नसून शेजारील व्यक्तीने ती मान सरळ केली आहे. तसेच औरंगाबादच्या शासकीय दवाखान्याशी या व्हिडीओचा काहीएक संबंध नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे लोक लवकरात लवकर दवाखान्यांत जात नाहीत. आजारपण अंगावर काढतात आणि गळ्याशी आल्यानंतर मग धावाधाव सुरु होते. त्यामुळे अशा फॉरवर्डेड माहितीवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेऊ नये आणि पसरवू सुद्धा नये.
हे ही वाचा: कापराच्या ‘या’ आयुर्वेदिक पोटलीच्या वासाने ऑक्सिजन लेव्हल वाढणार नाही, उलट जीवावर बेतेल!
[…] […]