X
Advertisement

हिजाब विवाद: धर्म रक्षणासाठी कर्नाटकातील हिंदू मुले उतरली रस्त्यावर?

सोशल मीडियावर कर्नाटकातील हिजाब विवादाच्या (Hijab Controversy) संदर्भाने अनेक फोटोज आणि व्हिडीओज चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होताहेत. सध्या एक साधारणतः दीड मिनिटांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. व्हिडिओमध्ये भगवा ध्वज हातात घेतलेल्या मुलांची रॅली बघायला मिळतेय.

Advertisement

व्हायरल व्हिडिओसोबत दावा केला जातोय की हा व्हिडीओ कर्नाटकातील असून हिजाब संदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील हिंदू धर्मीय मुले हिंदू धर्माचे रक्षण करण्याकरिता रस्त्यावर उतरली आहेत. आपण मुलांना धर्मरक्षणापासून रोखू नये, तर त्यांना यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला फेसबुकवर 9 ऑगस्ट 2017 रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. ‘जे. जे. फ्लाय ओव्हर मुंबई मराठा सागर…’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

Source: Facebook

याआधारे अधिक शोध घेतला असता ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनेलच्या युट्यूब चॅनेलवर 9 ऑगस्ट 2017 रोजी अपलोड करण्यात आलेली बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) दरम्यानचा आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राणीच्या बागेपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.

‘टाईम्स ऑफ इंडिया प्लस’ या ट्विटर हॅण्डलवरून देखील हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओतील दृश्ये व्हायरल व्हिडिओतील दृश्यांशी तंतोतंत जुळणारी आहेत. ‘मराठा क्रांती मोर्चा: जेजे उड्डाणपुलाजवळून जात असताना घोषणाबाजी करताना मराठा समाजाचे लोक.’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. व्हिडीओचे क्रेडिट राजू शिंदे यांना देण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की कर्नाटकमधील हिजाब विवादात कर्नाटकातील हिंदू मुले धर्म रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडीओ कर्नाटकातील नसून मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा दरम्यानचा आहे.

हेही वाचा- हिजाब विवाद: ‘बुरखा गर्ल’ कन्हैय्या कुमारच्या कथित ‘टुकडे टुकडे गँग’ची सदस्य असल्याचे व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)