X
Advertisement

उड्डाणपुलावर सपासप घसरणाऱ्या बाईक्सचा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला? जाणून घ्या सत्य!

उड्डाणपुलावर एकामागून एक बाईक्स सपासप घसरत असल्याचे दिसणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. कुणी म्हणतंय हा पुणे हडपसर रोड आहे, तर कुणी दावा करतंय हा मुंबईतील सानपाडा उड्डाणपूल आहे.

Advertisement

‘पुणे हडपसर ब्रिजवर ऑइल सांडले होते पण पावसामुळे कोणाला दिसले नसल्याने अपघात झाले. त्यामुळे पावसाळ्यात गाडी सावकाश चालवा.’ अशा कॅप्शन्ससह तो व्हिडीओ पुण्याचा असल्याचे दावे होत आहेत.

तर काही ट्विटर युजर्स हा व्हिडीओ मुंबईतील सानपाडा येथील असल्याचे दावा करत आहेत.

‘चेकपोस्ट मराठी‘चे वाचक गोविंद भुजबळ यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओ बारकाईने निरखून पाहिला तेव्हा व्हिडीओच्या साधारण चौदाव्या सेकंदाला एक झेंडा दिसला. यावर लाल-हिरव्या रंगाचे पट्टे आणि त्यात अर्धा चंद्र असल्याचे पुसटसे जाणवले.

त्यामुळे शंका येऊन आम्ही विविध कीवर्ड्सद्वारे गुगलसर्च केले असता ट्विटरवर अरीबा शाहीद यांनी कराचीमध्ये चालू असलेल्या एकूणच सावळ्या गोंधळाचे फोटोज व्हिडीओज पोस्ट करा असे नागरिकांना आवाहन केले होते. त्यालाच रिप्लाय देत अब्दुल अजीज यांनी हाच व्हिडीओ शेअर करत ‘#KarachiRains’ असे कॅप्शन दिल्याचे दिसले.

हाच धागा पकडत आम्ही कराची होंडा शोरूम असे सर्च केले असता गुगल मॅपवर शोरूमच्या बाहेरचा एक फोटो आम्हाला दिसला. तो फोटो आणि व्हायरल व्हिडीओतील दृश्य तंतोतंत जुळणारे आहे.

पावसामुळे कराची उड्डाणपुलावरील रस्ता निसरडा झाला असून त्यावर मोटरसायकलस्वार घसरत असल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांनी लावल्याचेही आमच्या निदर्शनास आले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की उड्डाणपुलावर एकामागून एक घसरणाऱ्या बाईक्सचा व्हायरल व्हिडीओ पुणे-हडपसर रोड किंवा मुंबईतील सानपाडा येथील असल्याचे दावे फेक आहेत. सदर व्हिडीओ पाकिस्तानच्या कराची येथील आहे.

हेही वाचा: गुजरात उच्च न्यायालयाने नोकरी-शिक्षणासाठीचे आरक्षण हटवले? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

View Comments (0)