X
Advertisement

तुर्कीने नरेंद्र मोदींना जगातील ‘ग्रेट लीडर’ घोषित करत पोस्टाची तिकीटे छापली आहेत?

एकीकडे तुर्की (Turkey) सारख्या मुस्लीम देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जगातील ‘ग्रेट लीडर’ असल्याचे मान्य करत त्यांची प्रतिमा असलेली पोस्टाची तिकिटे (Stamp) जारी केली आहेत आणि दुसरीकडे आपण त्यांच्यावर टीका करत, चोर वगैरे म्हणत त्यांचा अपमान करत बसलोय. अशा आशयाचे दावे सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतायेत. सोबत मोदींचा फोटो असलेल्या तुर्की पोस्ट तिकिटाचा फोटोही व्हायरल होतोय.

Advertisement

“मुस्लिम राष्ट्र तुर्की ने चौकीदार प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी पर डाक टिकट जारी कर दिया और हमारे यँहा उन्हें गाली देने और चोर चोर चिल्लाने से ही फुर्सत नहीं है।” अशा कॅप्शनसह त्या तिकिटाचा फोटो फॉरवर्ड केला जातोय.

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील, प्रकाशभाऊ जगताप आणि राजेंद्र काळे यांनी व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

वस्तुस्थिती:

सदर व्हायरल दाव्यांस अनुसरून गुगल सर्च केले असता असे लक्षात आले की हे दावे एवढ्यात व्हायरल होत नसून २०१८ सालापासून व्हायरल होतायेत. अशा प्रकारचे दावे व्हायरल करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आसाम कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलचा हात आहे.

‘बीजेपी आसाम प्रदेश’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून २८ डिसेंबर २०१८ रोजी हे तिकीट ट्विट करण्यात आले होते. यामध्ये देखील मोदी जगातील ‘ग्रेटेस्ट लीडर’ असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

Source: TOI

मोदींची प्रतिमा असलेले तिकीट तुर्कीने जारी केले होते का?

होय, हे खरे आहे की तुर्कीने (Turkey) नरेंद्र मोदींची (Narendra Modi) प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकीट (Stamp) छापले होते. परंतु एकट्या मोदींचे नव्हते. जगभरातील अनेक नेत्यांची तिकिटे छापण्यात आली होती. त्यात मोदी यांचा देखील समावेश होता.

तुर्की येथे २०१५ साली झालेल्या ‘G20 तुर्की लीडर्स समीट’ साठी जगातील आर्थिकदृष्ट्या मोठ्या देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्या सर्वांचा सन्मान म्हणून एकूण ३३ पोस्टाची तिकिटे छापण्यात आली होती. यामध्ये १९ देशांच्या प्रमुखांच्या वैयक्तिक तिकिटांचा देखील समावेश होता. बराक ओबामा, व्लादिमिर पुतीन, जिनपिंग, कॅमेरून, अंजेला मर्केल, शिन्जो आबे, डोनाल्ड टस्क अशा राष्ट्रप्रमुखांचा समावेश होता.

संबंधित राष्ट्रप्रमुखाची प्रतिमा, त्यांचे नाव आणि त्यांच्या देशाचे नाव असा मजकूर असलेले ते तिकीट केवळ सन्मान म्हणून होते. एका मोठ्या होर्डिंगवर सर्व नेत्यांची तिकिटे छापली होती. असा उल्लेख स्वतः ‘G20’ संयोजन समितीच्या अधिकृत वेबसाईटवर केलेला आहे.

सर्व तिकिटे असणारे होर्डिंग:

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की तुर्कीने नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकीट छापल्याची बाब खरी आहे परंतु ते प्रतीकात्मक तिकीट होते. तसेच केवळ मोदी यांचे नव्हे तर ‘G20’ समीट मध्ये सहभागी झालेल्या सर्वच राष्ट्रप्रमुखांच्या प्रतिमा असणारी तिकिटे छापण्यात आली होती.

हेही वाचा: राज्याचा विकास दाखविण्यासाठी योगी सरकारच्या जाहिरातीमध्ये कोलकात्याच्या उड्डाणपुलाचा फोटो!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

View Comments (0)