X
Advertisement

‘कायद्याला न जुमानणाऱ्यांनी आम्हाला मत द्या’ अखिलेश यादव यांच्या आवाहनाची व्हिडीओ क्लिप एडीटेड!

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या रणधुमाळीत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी प्रचारसभेत ‘कानून को नहीं मानने वाले समाजवादी पार्टी को वोट दें’ असे जाहीर आवाहन केलेय. म्हणजेच अखिलेश यादव यांना कायद्याचे राज्य नकोय, निवडणुका जिंकण्यासाठी गुंडाराजला प्रोत्साहन दिले जातेय, असं सुचविणाऱ्या भाषणाची क्लिप सोशल मीडियात व्हायरल होतेय.

Advertisement

“जिन्हें कानून व्यवस्था हात में लेनी है, कानून को नहीं मानना है वो समाजवादी पार्टी को वोट दें. जिन्हें गरीब पर अन्याय करना है वो समाजवादी पार्टी को वोट दें.” असे वक्तव्य असणारी २१ सेकंदाची व्हिडीओ क्लिप व्हायरल होतेय.

ट्विटर, फेसबुक प्रमाणेच व्हॉट्सऍपवरही ही व्हिडीओ क्लिप जोरदार व्हायरल होतेय. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संजय राजवाडकर यांनी पडताळणीची विंनती केली.

Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचे बारकाइने निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु व्हिडीओ अतिशय ब्लर असल्याने अखिलेश यादव यांच्या ओठांच्या हालचाली आणि ऐकू येणारी वाक्ये यांचे तारतम्य लावणे शक्य झाले नाही.

संबंधित कीवर्डसच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न केला असता रणविजय सिंह या पत्रकाराच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून १८ फेब्रुवारी रोजी ट्विट करण्यात आलेला व्हिडीओ पाहायला मिळाला. हा तोच व्हिडीओ आहे जो आता व्हायरल होतोय. फरक इतकाच की व्हिडीओ स्पष्ट आहे आणि त्यात ऐकू येणारी वाक्ये ‘जिन्हें कानून व्यवस्था हात में लेनी है, कानून को नहीं मानना है वो समाजवादी पार्टी को वोट न दें. जिन्हें गरीब पर अन्याय करना है वो समाजवादी पार्टी को वोट न दें अशी आहेत.

व्हिडीओमध्ये अखिलेश यांच्या मागच्या बाजूला औरेय असे लिहिले आहे. याचाच आधार घेऊन शोधाशोध केली असता उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यात यादव यांच्या जाहीर सभेचा संपूर्ण व्हिडीओच आमच्या हाती लागला.

या व्हिडीओच्या २३.५४ मिनिटांच्या पुढे अखिलेश यादव स्पष्टपणे ती वाक्ये बोलताना दिसतायेत. फरक एवढाच की त्यात ते ‘वोट न दे’ असे आवाहन करत आहेत. याचाच अर्थ व्हायरल करणाऱ्यांनी अखिलेश यादव यांच्या वक्तव्यातील ‘न’ हा शब्द काढून टाकला आणि गुन्हेगारीस प्रोत्साहन देणारा नेता अशी प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न केलाय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की अखिलेश यादव यांनी कायदा न जुमानणाऱ्यांनी समाजवादी पक्षाला मत द्या असे आवाहन करणारा व्हायरल व्हिडीओ एडीट केलेला आहे. मूळ व्हिडीओतील वाक्यात असणारे ‘वोट न दे’ मधील ‘न’ काढला गेलाय.

हेही वाचा: अखिलेश यादव छुप्या पद्धतीने मुस्लिम धार्जिणी आश्वासने देत असल्याचे व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)