Press "Enter" to skip to content

राहुल गांधींनी उदयपुर हत्या प्रकरणातील आरोपींचे समर्थन केल्याची बातमी फेक!

राजस्थानमधील उदयपुर येथे कन्हैया लाल (Kanhaiya lal) या टेलरची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या मोहोम्मद पैगंबर यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर कन्हैयाने सोशल मीडियात नुपूर शर्मा (Nupur sharma) यांचा पाठिंबा देणारी पोस्ट टाकली होती. याच कारणास्तव मोहम्मद रियाज़ आणि गौस मोहम्मद यांनी कन्हैयाची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Advertisement

दरम्यान, ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने आपल्या डीएनए या शो मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं एक वक्तव्य प्रसारित केलं आहे. राहुल गांधी यांनी उदयपूर हत्या प्रकरणातील आरोपींचा ‘लहान मुले’ असा उल्लेख करत आरोपींचं समर्थन केल्याचा दावा ‘झी न्यूज’चे अँकर रोहित रंजन यांनी केलाय. रोहित रंजन म्हणतात की आम्ही आपल्याला राहुल गांधींचे एक विधान दाखवू इच्छितोय, ज्यात ते उदयपूर प्रकरणातील आरोपींना लहान मुले म्हणताहेत. आता तुम्हाला ठरवायचंच की ती मुले आहेत की दहशतवादी.

Source: HW news

त्यानंतर व्हिडिओमध्ये राहुल गांधींची प्रतिक्रिया बघायला मिळतेय. त्यात राहुल गांधी म्हणताहेत की, सध्या देशात जे वातावरण आहे, ते सरकारकडून निर्माण करण्यात आलंय. पंतप्रधान, गृहमंत्री, भाजप आणि आरएसएसने देशात अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलंय. हे वातावरण राग आणि द्वेषाने भरलेलं आहे. देशात असं वातावरण असणं हेच एक प्रकारे देशविरोधी कृत्य आहे. ती मुलं आहेत आणि त्यांचं चुकलंच. त्यांचं हे वागणं बेजबाबदारपणाचं आहे. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. ती मुलं आहेत. या कृत्याचे काय परिणाम होऊ शकतात याची त्यांना कल्पना नाही. मला वाटतं की त्यांना माफ करायला हवं.

‘झी न्यूज’च्या या बातमीची क्लिप शेअर करताना अनेक भाजप नेत्यांनी राहुल गांधी उदयपूर प्रकरणातील आरोपींच्या बचावात उतरले असून त्यांना माफ करण्याचे आवाहन करत असल्याचा दावा केलाय.

अर्काइव्ह

भाजपच्या इतरही अनेक नेत्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत साधारणतः अशाच प्रकारचे दावे केले आहेत. ते आपण ‘येथे‘ ‘येथे‘ आणि ‘येथे‘ बघू शकता.

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला एशियानेट न्यूजच्या यूट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओमध्ये राहुल गांधी प्रसार माध्यमांशी संवाद साधताहेत.

पत्रकारांनी राहुल गांधी यांना त्यांच्या वायनाड येथील कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भाने प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणताहेत की हो, हे माझं कार्यालय आहे, पण माझं कार्यालय असल्याआधी ते वायनाडमधील लोकांचं कार्यालय आहे. आपल्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांच्या संदर्भात राहुल गांधी म्हणताहेत की ती मुलं आहेत आणि त्यांचं चुकलंच. त्यांचं हे वागणं बेजबाबदारपणाचं आहे. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. ती मुलं आहेत. या कृत्याचे काय परिणाम होऊ शकतात याची त्यांना कल्पना नाही. मला वाटतं की त्यांना माफ करायला हवं.

त्यानंतर राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांच्यावर ओढलेल्या ताशेऱ्यांसंदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

दरम्यान, आता ‘झी न्यूज’कडून आपल्या या बातमी संदर्भात खेद देखील व्यक्त करण्यात आला आहे.

अर्काइव्ह

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये राहुल गांधी यांनी उदयपुर हत्या प्रकरणातील आरोपींचे समर्थन केलेले नाही किंवा त्यांना माफ करण्याची मागणी देखील केलेली नाही. ‘झी न्यूज’ने आपल्या कार्यक्रमात चालवलेली बातमी फेक आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या वायनाडमधील कार्यालयावर हल्ला करणारी लहान मुले असल्याचे सांगितले होते. तीच प्रतिक्रिया ‘झी न्यूज’ने उदयपूर प्रकरणावरील म्हणून प्रसारित केली आहे. त्याआधारे राहुल गांधींनी उदयपूर प्रकरणातील आरोपींचे समर्थन केल्याचा दावा केला जातोय.

हेही वाचा-  राहुल गांधींना इंग्रजी शिकवणाऱ्या ट्रोल्सना बेसिक इंग्रजीचे धडे घेण्याची गरज!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा