‘झी न्यूज हिंदी’च्या वेबसाईटवर अभिनेता आमिर खान (Aamir Khan) संदर्भातील एक बातमी प्रकाशित करण्यात आलीये. बातमीची फिचर इमेज म्हणून एक कोलाज फोटो वापरण्यात आलाय. त्यात अभिनेता आमिर खान आणि त्याच्या सोबत दंगल सिनेमातील अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) बघायला मिळतेय, तर दुसऱ्या बाजूला आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) बघायला मिळतेय.
या फोटोच्या आधारे ‘झी न्यूज’ने ‘आमिर की तिसरी पत्नी से तंग आई बेटी इरा खान, कहा ये सब सहन करना मुश्किल’ अशा हेडलाईनसह बातमी प्रकाशित केलीये.
आमिर खानने किरण राव हिच्याशी घटस्फोट घेतल्यापासूनच माध्यमांमध्ये आमिर खान ‘दंगल’ मधील अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्याशी तिसरे लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. अर्थात आमिर खानने तिसरे लग्न केले असल्याच्या दाव्यांना सध्या तरी कुठलाही आधार नाही. अशात ‘झी न्यूज’ने आमिरच्या तिसऱ्या लग्नामुळे मुलगी इरा परेशान असल्याची बातमी प्रसिद्ध केलीये.
‘झी न्यूज’च्या बातमीतील आमिर खान आणि फातिमा सना शेख यांचा फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता मिस मालिनीच्या वेबसाईटवर एक फोटो मिळाला. फोटोमध्ये आमिर खानच्या शेजारी फातिमा सना शेख नाही, तर आमिर खानचा भाचा बॉलिवूड अभिनेता इमरान खानची (Imran Khan) बायको अवंतिका मलिक (Awantika Malik) बघायला मिळतेय.
हा फोटो इमरान खान आणि अवंतिका मलिक यांच्या विवाह समारंभातील आहे. शिवाय फोटो सध्याचा नसून तो जवळपास 10 वर्षांपूर्वीचा म्हणजेच 2011 मधील आहे. फोटोमध्ये इमरान खान आणि किरण राव देखील बघायला मिळताहेत.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ‘झी न्यूज’च्या बातमीत वापरण्यात आलेला फोटो एडिटेड आहे. अवंतिका मलिकच्या फोटोवर फातिमा सना शेखचा चेहरा एडिटिंगच्या मदतीने जोडण्यात आला आहे.
‘झी न्यूज’च्या बातमीमधील इरा खान हिचा फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता ‘न्यूज 18’ चा 09 मे 2021 रोजीचा रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये इरा हिने कुठेही आमिर खानच्या लग्नाविषयी काही भाष्य केले असल्याचे बघायला मिळाले नाही.
रिपोर्टमध्ये इरा खानने आपल्या वाढदिवशी इंस्टाग्रामवर चाहत्यांशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ देखील बघायला मिळाला. या संपूर्ण व्हिडिओमध्ये देखील तीने आमिरच्या लग्नाविषयी काहीही मत व्यक्त केलेले नाही.
वस्तुस्थिती:
‘झी न्यूज’ने आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाशी संबंधित काल्पनिक कथा बातमी म्हणून प्रसिद्ध केली आहे. शिवाय बातमी प्रसिद्ध करण्यासाठी आमिर एडिटेड फोटोजचा वापर करण्यात आला आहे.
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]