राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्या सोबतच्या पत्रकार परिषदेत (devendra fadnavis anna hazare press conference) अण्णांना अडचणीत आणणारा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत ‘प्रश्न उत्तरांची गरज नाही’ असे वक्तव्य केल्याचे दर्शवत फडणवीस विरोधकांनी व्हिडीओ व्हायरल केले.
त्यानंतर फडणवीस यांच्या समर्थकांनी फेसबुक पेजवरून प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी अर्धवट व्हिडीओ शेअर केल्याचे सांगत फॅक्टचेक करणारा दुसरा व्हिडीओ शेअर केलाय.
‘प्रश्न उत्तरांची गरज नाही’- देवेंद्र फडणवीस
मग मला इथ कशाला आणुन बसवलंयसेटलमेंट कींग – आण्णा हजारे’
अशा कॅप्शनसह अनेक फेसबुक युजर्सने तो २४ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये अन्न हजारे यांच्यासाठी पत्रकाराच्या प्रश्नाला टाळत परिषद गुंडाळण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करताना दिसत आहेत.
फेसबुकवर हा व्हिडीओ बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. ट्विटर देखील यास अपवाद नाही. यावर प्रत्युत्तर म्हणून ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवरून ‘हाय रे, देवेंद्रजींचा अपुर्ण व्हिडीओ दाखवून अर्ध्या हळदकुंडाने पिवळे होणारे विरोधक इथेही “एपटले” हो.. ‘ अशा कॅप्शन सह २.४१ मिनिटांचा व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये अण्णा पत्रकाराच्या त्या प्रश्नास उत्तर देताना दिसत आहेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने दोन्ही बाजूंचे व्हिडीओज व्यवस्थित पाहिले. पहिला व्हिडिओ केवळ २४ सेकंदाचा आहे. त्यामुळे तो प्रमाण मानता येणार नव्हता आणि दुसरा व्हिडीओ २.४१ मिनिटांचा म्हणजेच पहिल्यापेक्षा मोठा असला तरीही त्यावर एडिटिंगचे संस्कार करून दोन वेगळ्या तुकड्यात बनवलेला आहे. त्यामुळे तो सुद्धा तितकासा विश्वासार्ह नव्हता.
यामुळेच या पत्रकार परिषदेचा (devendra fadnavis anna hazare press conference) अनएडीटेड संपूर्ण व्हिडीओ आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला. काही कीवर्ड्सच्या मदतीने सर्च केल्यानंतर युट्युबवर आम्हाला ‘न्यूज १८ लोकमत’च्या अधिकृत चॅनेलवर अपलोड केलेला २३.४० मिनिटाचा अखंड व्हिडीओ सापडला.
काय झालं पत्रकार परिषदेत?
केंद्र सरकारच्या बाजूने शिष्टाई करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांशी चर्चा केली आणि काही आश्वासने देऊ केली. यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतले.
या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत अण्णा हजारे यांना “अण्णा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात ही तुमची मागणी इथे मान्य तर नाही झाली. फक्त इथे एक ड्राफ्ट देण्यातआलाय. तेवढ्यावर तुम्ही उपोषण मागे घेताय. तुमची विश्वासार्हता कायम आहे असं वाटतं तुम्हाला?” असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर अण्णांचे उत्तर येण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस ‘मला असं वाटतं प्रश्न उत्तरांची गरज नाही’ असे म्हणत खुर्चीवरून उठू लागले. यावर अण्णा “गरज नाहीये?” असे म्हणाले परंतु ते काही जागेवरून उठले नाहीत, पत्रकाराने पुन्हा एकदा प्रश्न विचारला तेव्हा अण्णांनी कान देऊन व्यवस्थित प्रश्न ऐकला आणि त्यावर उत्तर दिलं.’ या सर्व घडामोडी खालील व्हिडीओच्या १७.२५ व्या मिनिटांपुढे पाहू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु अण्णा हजारे जागेवरून उठले नाहीत, त्यांनी फडणवीस यांच्या खुर्चीवरून उठण्याकडे दुर्लक्ष करत पत्रकाराचा प्रश्न पुन्हा ऐकला आणि उत्तर दिलं.
याचाच अर्थ फडणवीस समर्थकांनी फॅक्टचेक करण्यासाठी पोस्ट केलेला व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.
हे ही वाचा: ‘महाराष्ट्रात ‘जय श्रीराम’चा घोष करणाऱ्यांवर कारवाई’ म्हणत भाजप कार्यकर्ते पेरतायेत अफवा!
Be First to Comment