सोशल मीडियावर भीम आर्मी अध्यक्ष चंद्रशेखर रावण यांचा एका महिलेसोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोत चंद्रशेखर रावण सोबत दिसणारी महिला हाथरस प्रकरणातील डॉ. राजकुमारी बंसल उर्फ नक्सल भाभी (naxal bhabhi) असल्याचा दावा करण्यात येतोय.
डॉ. राजकुमारी बंसल या जबलपूर येथील सुभाष चंद्र बोस मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक आहेत. हाथरस प्रकरणाच्या सुरुवातीच्या काळात काही चॅनेल्सकडून बंसल या हाथरस पीडितेच्या वहिनी असल्याचा दावा करण्यात आला होता.
नंतरच्या काळात मात्र त्यांचं पीडितेशी कसलंही नातं नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे उजव्या विचारधारेशी संबंधितांकडून डॉ. राजकुमारी बंसल यांचा उल्लेख ‘नक्सली भाभी’ (naxal bhabhi) असा केला जातो. त्यांच्यावर नक्सलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप देखील करण्यात आले होते. हे आरोप त्यांच्याकडून फेटाळून लावण्यात आले होते.
पडताळणी :
व्हायरल फोटोच्या पडताळणी सुरु केली असता आम्हाला ‘बूम लाईव्ह’चा रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार व्हायरल फोटोत चंद्रशेखर रावण सोबत दिसणारी महिला किरण यादव असल्याची माहिती मिळाली. स्वतः चंदशेखर आझाद रावण यांनीच ‘बूम लाईव्ह’शी बोलताना ही माहिती दिली होती.
व्हायरल होत असलेला फोटो २०१९ सालचा असून आपण हरिणामधील अंबाला येथील घरी जाऊन किरण यादवच्या कुटूंबियांची भेट घेतली त्यावेळचा हा फोटो आहे. किरण आपल्या बहिणीसारखी असून किरणच्या मुलासोबतचे फोटोज देखील उपलब्ध आहेत, असं आझाद यांनी सांगितलं होतं.
आम्ही किरण यादव यांच्या फेसबुक प्रोफाइलला देखील भेट दिली. त्यानंतर किरण यादव आणि ‘नक्सल भाभी’ म्हणून उल्लेखल्या जाणाऱ्या डॉ. राजकुमारी बंसल यांच्या फोटोची देखील तुलना केली. त्यावेळी दोघींमधील फरक स्पष्ट झाला. दोघीही वेगवेगळ्या महिला असून दोघींमध्ये कसलेही साम्य नसल्याची बाब समोर आली.
किरण यादव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. राजकीय मुद्द्यांवरील त्यांच्या भूमिकांचे अनेक फॉलोअर्स देखील आहेत. सोशल मीडियावर हिंदी भाषिक पट्ट्यात त्या खूप लोकप्रिय आहेत.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोसोबत केला जाणारा दावा चुकीचा आहे. फोटोत भीम आर्मी अध्यक्ष चंद्रशेखर रावण यांच्या बरोबर दिसणारी महिला डॉ. राजकुमारी बंसल उर्फ ‘नक्सल भाभी’ नसून किरण यादव आहे.
हे ही वाचा- गोवा काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा बोरकर यांचा फोटो ‘हाथरस नक्सल भाभी’ म्हणून व्हायरल!
Be First to Comment