Press "Enter" to skip to content

हिंदू देव-देवतांची चित्रे असलेले गुप्तपणे बनलेले संविधान २०२४ मध्ये लागू होणार?

भारताचे पंतप्रधान आणि कायदा व न्याय मंत्र्यांजवळच असणाऱ्या गुप्त संविधानात (secretly drafted constitution) हिंदू देव-देवतांची चित्रे आहेत. २०२४ साली बहुमत मिळवून पुन्हा भाजप सत्तेवर येईल तेव्हा हे संविधान ते लागू करण्यात येणार असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

रामायणातील, महाभारतातील व्यक्तींची देवी-देवतांची चित्रे या गुप्त संविधानाच्या (secretly drafted constitution) पानांवर चितारलेली असल्याचे दाखवत एक व्यक्ती पत्रकार परिषद घेत आहे. उत्तर प्रदेशातून मिळणारी मतं २०२४ साली केंद्रात सत्ता मिळवून देतील म्हणून २०२२ सालच्या उत्तरप्रदेश निवडणूकीतच आपल्याला भाजपला रोखावे लागेल असे आवाहन देखील यात करण्यात येत आहे.

Advertisement

‘भीम आर्मी मिशन ग्राम पछौहां कमासिन बांदा उत्तर प्रदेश’ या फेसबुक पेजवरून पोस्ट झालेल्या व्हिडीओस १७० लोकांनी शेअर केले आहे.

बदला हुआ भारत का संविधान जिसे भविष्य में लागू करने की योजना है

Posted by Kaushal Kumar on Tuesday, 27 October 2020

अर्काइव्ह लिंक

ट्विटरवर देखील सदर व्हिडीओ शेअर केला जातोय.

अर्काइव्ह लिंक

व्हॉट्सऍपवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओबद्दल ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके आणि प्रमोद अहिरे यांनी माहिती देत पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या फ्लेक्सनुसार ही पत्रकार परिषद २४ ऑक्टोबर २०२० रोजीच घेतल्याचे समजते. त्यावर ‘अक्षयवर नाथ कनौजिया’ असे एक नाव निदर्शनास आले. त्यानुसार आम्ही सर्च केले असता व्हिडीओतील व्यक्ती स्वतः ‘अक्षयवर नाथ कनौजिया’ असून बहुजन सुरक्षा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे समजले.

कोण आहेत व्हायरल व्हिडीओतील ‘अक्षयवर नाथ कनौजिया’?

कनौजिया हे भारतीय जनता पक्षामार्फत उत्तर प्रदेशातून २०१४ साली खासदार बनलेल्या सावित्रीबाई फुले यांचे काका आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये कनौजीया यांच्या शेजारी दिसणारी महिला माजी खासदार सावित्रीबाई फुले याच आहेत. यांनी २०१८ साली योगी आदित्यनाथ यांच्या ‘हनुमान दलित होते’ या विधानावर नाराजी व्यक्त करत भाजपला राजीनामा सोपवला आणि कॉंग्रेस पक्षात सामील झाल्या.

२०१९सालची लोकसभा निवडणूक कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवून त्या हरल्या आणि २०२०च्या जानेवारीमध्ये त्यांनी ‘कांशीराम बहुजन समाज पार्टी‘ नावाच्या पक्षाची स्थापना केली. अर्थात या सर्व घडामोडीत त्यांचे काका ‘अक्षयवर नाथ कनौजिया’ त्यांच्या साथीला होते.

संविधानात हिंदू देव-देवता?

व्हायरल व्हिडीओमध्ये केलेल्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आम्ही विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले. या सर्चमध्ये आम्हाला भाजप नेते आणि केंद्रीय कायदा व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांचे एक ट्विट सापडले. यामध्ये त्यांनी संविधानाच्या पानाचा फोटो शेअर केला असून त्यात असणाऱ्या चित्राविषयी माहिती सुद्धा दिली आहे.

‘भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण रावणचा पराभव करून अयोध्येत परतलेले सुंदर रेखाटन आहे.
मूलभूत अधिकारांशी संबंधित नियमावलीच्या सुरूवातीस हे उपलब्ध आहे.
हे आपल्या सर्वांना कळावे म्हणून शेअर करतोय.’
असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

केंद्रीय मंत्री स्वतः सदर पान भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतीचे असल्याचा दावा करत आहेत म्हणजे ही जास्त गंभीर बाब आहे असे समजून आणखी काळजीपूर्वक तपास आम्ही करायला सुरुवात केली.

भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतींवर चित्रे?

सदर माहिती पडताळण्यासाठी सर्च केले असता ‘ब्लुमबर्ग क्विंट’वर भारतीय राज्यघटनेविषयी २६ महत्वाचे फॅक्ट्स सापडले. यामध्ये राज्यघटनेची मूळ प्रत टाईप किंवा प्रिंट केलेली नसून हस्तलिखित असल्याचे सांगितले आहे.

हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषेतील प्रती ‘प्रेम बिहारी नारायण रायजादा‘ यांचे हस्तलिखित आहे. प्रत्येक पानावर बोहार राममनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस या कलाकारांनी चितारलेल्या कलाकृती आहेत. या दोन्ही मूळ प्रती हेलियम वायू भरलेल्या एका विशिष्ट बॉक्स मध्ये संसदेच्या ग्रंथालयात जतन करून ठेवल्या आहेत.

Photo Courtesy: Wikimedia | Source: Bloomberg Quint

या माहितीस ‘हफिंगटन पोस्ट‘ने सुद्धा दुजोरा दिला आहे. किंबहुना ‘द इंडियन एक्स्प्रेस‘ने सुद्धा आपल्या एका रिपोर्टमध्ये याविषयी विस्तृत माहिती दिली आहे.

हिंदू देव-देवतांचीच चित्रे यात आहेत का?

इंडियन एक्प्रेस आणि हफपोस्टच्या रिपोर्ट्सनुसार या प्रतींवर असणाऱ्या चित्रात भारतीय संस्कृतीचे आणि इतिहासाचे दर्शन घडावे या दृष्टीने कलाकुसर केलेली आहे.

मोहंजदडो, वैदिक काळ, गुप्त-मौर्य आणि मुघल साम्राज्य ते भारताचा स्वातंत्र्यलढा या सर्व घटनांना या चित्रांत स्थान आहे. राम-सीता-लक्ष्मण तसेच हनुमान तर आहेतच परंतु गौतम बुद्ध व महावीर सुद्धा आहेत. सम्राट अशोक व विक्रमादित्य यांचीही चित्रे यामध्ये आहेत.

भारतीय इतिहासात महत्वाचे स्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, झाशीची राणी लक्ष्मी बाई, अकबर, टिपू सुलतान आणि गुरु गोविंदसिंह यांचाही समावेश यात आहे. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचाही समावेश या चित्रांत आहे. अजंठाची चित्रे आणि भारताची भौगोलिक विविधता दाखवण्यासाठी हिमालयाच्या पर्वतरांगासुद्धा या चित्रांत पहायला मिळतात.

निवडक प्रातिनिधिक चित्रांचा कोलाज:

Paintings on Indian Constitution checkpost marathi
Source: Pinterest/ Huffingtonpost

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओतील गुप्त संविधाना संदर्भातील (secretly drafted constitution) दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय संविधानात हिंदू देवी-देवतांची चित्रे भाजपने समाविष्ट केलेली नसून संविधानाच्या मूळ प्रतीमध्येच ती आहेत.

महत्वाचे म्हणजे केवळ हिंदू देवच नव्हे तर यात गौतम बुद्ध, महावीर आणि गुरु गोविंदसिंह सुद्धा आहेत तसेच सम्राट अशोकापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत महत्वाच्या सम्राट, राजे महाराजांचा/ महाराणीचाही समावेश आहे. स्वातंत्र्य लढ्याचा आणि भारताच्या ऐतिहासिक भौगोलिक विविधतेचा सुद्धा प्रातिनिधिक स्वरुपात या चित्रांतून गौरव करण्यात आलाय.

सर्वात महत्वाचे म्हणजे या हिंदी-इंग्रजी भाषेतील मूळ प्रती कुणा मंत्र्याच्या अथवा पंतप्रधानाच्या घरी गुप्तपणे ठेवलेल्या नसून संसद भवनाच्या ग्रंथालयात ठेवलेल्या आहेत.

हेही वाचा: डोनाल्ड ट्रम्प बौद्ध धम्म स्वीकारणार असल्याच्या बातम्या भारतीय मीडियाकडून लपवल्या जाताहेत ?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा