Press "Enter" to skip to content

उकळत्या पाण्यात बसलेल्या मुलाचे रहस्य काय? आधुनिक प्रल्हाद की फसवाफसवी? वाचा सत्य!

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात, खास करून व्हॉट्सऍपवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका भल्या मोठ्या कढईमध्ये पाणी उकळताना दिसतेय, कढईखाली धगधगती आग आहे. एक छोटा मुलगा त्या उकळत्या पाण्यात बसलेला असल्याचे (boy sitting in boiling water) बघायला मिळतेय. त्याच्या मागे असलेल्या बोर्डवर ‘भक्त प्रहलाद’ असे लिहिलेय. या एकंदर दृश्याकडे लोक दैवी चमत्काराच्या दृष्टीने पाहत आहेत.

Advertisement
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक नितीन वाहुळे, डॉक्टर विठ्ठल घुले आणि अरविंद वाघमारे यांनी सदर व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिल्यानंतर असे लक्षात आले की हा व्हिडीओ आताचा नसून जुना आहे. वर्षभरापूर्वीच युट्युबवर अनेकांनी हे व्हिडीओज अपलोड केले होते.

परंतु लहान मुलाची शारीरिक छळवणूक चालू असल्याचे गृहीत धरून युट्युबने आपल्या प्लॅटफॉर्मवरून हे व्हिडीओज हटवले. त्यापैकी केवळ एक व्हिडीओ कारवाईपासून वाचला असल्याचे दिसतेय. तोही कधी काढला जाईल हे सांगता येत नाही.

सदर व्हिडीओ जर बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की उकळत्या पाण्याप्रमाणे बुडबुडे दिसत असले तरी ते केवळ एकाच भागात आहेत. मुलाच्या चहुबाजूने टाकलेली फुले उकळताना दिसत नाहीत.

पाण्याला उकळी आलीय म्हणजेच पाण्याचे तापमान १०० डिग्री सेल्सियसच्या वर असायला हवे. मग असे असेल तर त्यातून वाफ कशी निघत नाही? एवढे प्रचंड उकळलेले पाणी असूनही फुले आहे अशीच ताजीतवानी कशी दिसतायेत? उकळत्या पाण्यात टाकलेली फुले काही वेळातच कोमेजून जातात, त्यांचा लगदा होतो.

हे समजून घेण्यासाठी खालील फोटोज आपण पाहू शकता.

Flowers when boiled demo

या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला असता विविध ब्लॉग, विचारमंथन करणाऱ्या वेबसाईट वर असलेल्या तर्काची आम्हाला मदत झाली. या सर्वांच्या मते ही निव्वळ हातचलाखी आहे.

व्हिडीओत वापरलेली कढई व्यवस्थित पाहिली तर आपल्या लक्षात येईल की तीचे बुड काहीसे वेगळे आहे. खालची बाजू नेहमीप्रमाणे अर्धगोलाकार नाही. तो खाली वाढलेला भाग हा निर्वात पोकळीसाठी बनवलेला कप्पा आहे. जेणेकरून वरच्या भागात बसलेल्या मुलाला थेट उष्णता लागू नये.

मुळात पाण्यात दिसणारे बुडबुडे ही पाण्याची उकळी नसून हवेचे बुडबुडे आहेत. कारण आतल्या बाजून असे बुडबुडे निघण्यासाठी पंप बसवला आहे. त्याची नळी, तो पंप दिसू नये म्हणून मुलाच्या चहूबाजूने फुलांचे आच्छादन आहे. म्हणूनच बुडबुडे केवळ एकाच भागातून येत आहेत चहूबाजूंनी नाही.

खाली दिलेल्या चित्रातून हे सर्व समजणे अधिक सोपे जाईल.

Source: sawalandjawab

वरील चित्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीशी संलग्न असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ‘सवाल अँड जवाब’ या ब्लॉगवरील आहे. त्यांनी देखील सदर व्हिडीओ चमत्कार नसून फसवणूक असल्याचे तार्किक स्पष्टीकरण दिले आहे. ते आपण ‘येथे‘ क्लिक करून वाचू शकता.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार आधुनिक भक्त प्रल्हादच्या नावाने व्हायरल होत असलेल्या मुलाचा व्हिडीओ दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले. तो मुलगा उकळत्या पाण्यात बसला असल्याचे (boy sitting in boiling water) केवळ भासवले गेले आहे. परंतु ते पाणी उकळते नाही, त्यामागे हातचलाखी आहे. म्हणजेच हा काही दैवी चमत्कार नसून विज्ञानाच्या सहाय्याने केलेली फसवणूक आहे.

हेही वाचा: गोकुळाष्टमीला खुद्द श्रीकृष्ण मथुरेच्या मंदिरातील भाविकांनी ठेवलेली दहीहंडी फोडतो? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा