सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क पाणी ओतून पणती पेटवत आहे. साक्षात साई बाबांनी पाण्यावर पणत्या पेटवल्याचा चमत्कार केला होता त्याच आधारे एक विशिष्ट कौशल्य वापरून पाण्यावर पेटणारी पणती आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केलीय असा मजकूर त्या तरुणाने व्हिडीओसोबत जोडलाय. याकडे काहीजण कुतुहलाने तर अनेकजण दैवी चमत्काराच्या दृष्टीने पाहतायेत.
‘पाण्यावर पणती पेटविणे हा साक्षात साई बाबा यांनी चमत्कार साऱ्या विश्वाला दाखविला होता.पण त्याच आधारे एक विशिष्ट कौशल्य वापरून आम्ही तयार करून आपल्यासाठी आणत आहोत पाण्यावर पेटणारी पणती.ज्या पणती मध्ये फक्त आपणास पुरेसे पाणी ओतायचे आहे, आणि आपली पणती ज्योती सकट प्रखर पेटती होणार.’
असा हा मजकुराचा काही भाग संभ्रम निर्माण करणारा ठरतोय. हा मजकूर स्वतः त्या व्हिडीओतील तरुणाने म्हणजेच तेजस नारायण खरे याने ‘ब्राह्मण व्यवसाय संघ’ या फेसबुक ग्रुपवर पोस्ट केलाय. यालाच कॉपीपेस्ट करत अनेकांनी फेसबुक, व्हॉट्सऍपसारख्या माध्यमांत तो व्हिडीओ व्हायरल केला आहे.
‘पंढरपूर माझा’ नावाच्या युट्युब न्यूज चॅनलने यावर बातमी केलीय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले असता असे लक्षात आले की त्यात दाखवलेली पणती मातीची नसून प्लास्टिकची आहे. तसेच त्यातील तरुणाने केलेल्या दाव्याप्रमाणे त्यात ज्योत नसून एलईडी बल्ब आहे. याचाच अर्थ ती पारंपारिक पणती नसून इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेला दिवा (water-based light) आहे.
आम्ही विविध कीवर्डसच्या आधारे सर्च केले असता. तेजस खरे यांच्यापेक्षा स्पष्टपणे दिसत असलेल्या अशाच प्रकारच्या पणतीचा एक व्हिडिओ आम्हाला युट्युबवर मिळाला.
हा व्हिडीओ अगदी सुरुवातीपासून जर आपण पाहिलात तर लक्षात येईल की त्यात ती पणती खोलल्याचे दिसतेय. साधारण मातीच्या पणतीस अशा पद्धतीने खोलता येत नाही. तसेच त्यातील पणत्या व्यवस्थित निरखून पाहिल्या तर लक्षात येईल की त्यावर धातूच्या दोन छोट्या पट्ट्या आहेत.
हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आपणास विद्युत प्रवाहाने दिवा कसा पेटतो याचे सर्वसाधारण ज्ञान असणे आवश्यक आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास बॅटरीला जोडलेल्या दोन तारा जेव्हा बल्बला जोडू तेव्हा बल्ब चालू होतो हे आपणास माहित आहे. फक्त तो बल्ब कायमचा चालू राहू नये म्हणून आपण त्यात बटण जोडतो. बटण चालू केले की विद्युत प्रवाह सुरळीत होतो आणि ‘सर्किट’ पूर्ण होऊन बल्ब पेटतो. तेच बटण बंद केले की विद्युत प्रवाह खंडीत होऊन बल्ब विझतो. खालील आकृतीतून हे आपणास अधिक सहजतेने समजेल.
व्हायरल व्हिडीओतील पणतीमध्ये बटणाचे काम पाणी करते. कारण पाण्यातून विद्युत प्रवाह सहज वाहू शकतो. म्हणजेच पणतीच्या वर दिसणाऱ्या त्या दोन धातूच्या पट्ट्यांचा विद्युत प्रवाह एकमेकांना जोडण्याचे काम आपण ओतलेले पाणी करते. जसे आपण त्यातील पाणी ओतून देतो तसा तो ‘एलईडी’ बल्ब विझून जातो.
बाहेरून विद्युतप्रवाह जोडण्याची गरज नसली तरीही पणतीच्या आत असणारा सेल हा विद्युत उपकरणाचाच भाग आहे. त्यामुळे ‘ विद्युत उर्जे शिवाय उत्कृष्ट रोषणाई’ असे मजकुरात लिहिणे ही जनतेची दिशाभूल करण्यासारखेच आहे.
या अशा पणत्या आताच बाजारात आल्या आहेत असे नाही. डोंबिवलीतील एका तरुणाने अशाच प्रकारच्या पणत्या २ वर्षांपूर्वी तयार केल्या होत्या. हेच तंत्र वापरून अधिक सफाईदारपणे आणि आकर्षक पद्धतीने बनविलेले दिवे (water-based light) बाजारात उपलब्ध आहेत.
या संपूर्ण प्रकरणाविषयी व्हायरल व्हिडिओतील तरुणाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही तेजस खरेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु फोनच्या माध्यमातून संपर्क होऊ शकला नाही. आम्ही व्हॉट्सऍप मेसेजद्वारे देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावरही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की पाण्यावर पेटणाऱ्या पणत्यांचा व्हायरल व्हिडीओ आणि सोबतचा मजकूर सामान्य जनतेची दिशाभूल करणारा आहे. ते दिवे काही चमत्कार नसून विज्ञान तंत्रज्ञानाचा आणि पाण्याच्या विद्युतवाहक क्षमतेचा वापर करून बनविलेले आहेत.
हेही वाचा: कृष्णाच्या पायाला स्पर्श होताच वाटीतील पाणी गळून कसे जाते? दैवी चमत्कार की विज्ञान? वाचा सत्य!
Be First to Comment