Press "Enter" to skip to content

तिरुवल्लुर येथील कडूनिंबाच्या मुळाशी शिवलिंग सापडल्याच्या घटनेचे रहस्य आले समोर!

तमिळनाडू राज्यातील तिरुवल्लुर (Thiruvallur) जिल्ह्यात एक रहस्यमयी घटना घडली. एका पुजाऱ्याच्या स्वप्नात भगवान शिव प्रकटले आणि त्यांनी त्यास दृष्टांत दिला. जवळच्याच जुन्या कडूनिंबाच्या झाडाखाली खोदले असता चक्क शिवलिंग (shivling) सापडले. अशा प्रकारचे दावे आणि त्यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Advertisement
"।। राम राम ।।

चमत्कार अजूनही घडतात

 तिरुवल्लूर येथील एका मंदिराच्या पुजाऱ्याला एक स्वप्न पडले ज्यामध्ये भगवान शिव प्रकट झाले आणि त्याला सांगितले की तो एका विशिष्ट कडुनिंबाच्या झाडाखाली आहे ...
 दुसऱ्या दिवशी सकाळी, पुजारी स्थानिक ग्रामस्थांना घटनास्थळी घेऊन गेले आणि खोदण्यास सुरुवात केली ....
 तुम्हीच बघा ...."

अशा मजकुरासह साधारण साडेचार मिनिटांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Source: Facebook

ट्विटरवरही हेच दावे इंग्रजी कॅप्शनसह व्हायरल होतायेत. यात सदर घटना तिरुवल्लुर जिल्ह्यातील मिन्जूरजवळच्या परीया मदियुर या ठिकाणची असल्याचे सांगितले आहे.

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक रवी नेवारे, वाघेश साळुंखे, राजेंद्र काळे आणि राजेंद्र गवस यांनी व्हॉट्सऍपवरही हे दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

  • व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे हे तपासताना ट्विटर, युट्युब या माध्यमांतून तिरुवल्लुर (thiruvallur) जिल्ह्यातील मिन्जूरजवळच्या परीया मदियुर या गावात शिवलिंग (shivling) सापडले असल्याचे समजले. सदर घटना याच वर्षीच्या जुलै महिन्यातील आहे. परंतु मराठी भाषिकांत आता व्हायरल होताना दिसतेय.
  • डेलीथंती या तमिळ वेबसाईटवर सदर घटनेविषयी माहिती देणारी ११ जुलै २०२१ रोजीची बातमी बघायला मिळाली. यामध्येही ती घटना मिन्जूरजवळीलच असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु तमिळ भाषेतील कुठल्याही बातमी किंवा व्हिडीओ कॅप्शनमध्ये मंदिराच्या पुजाऱ्याला भगवान शंकराने दृष्टांत दिला म्हणून खोदकाम चालू केल्याचा उल्लेख नाही.
  • अधिक शोधाशोध करत असताना ११ जून २०१६ रोजीची ‘द हिंदू’ या नामांकित वृत्तपत्राची बातमी सापडली. बातमीनुसार याच मिन्जूर जवळील कत्तूपल्ली गावात खोदकाम करताना पुरातत्व विभागास १२०० वर्षांपूर्वीचे ‘पल्लव’ कालीन शिवलिंग आणि ४०० वर्षापूर्वीचे विजयनगर साम्राज्यातील पार्वती आणि चंद्रीकेश्वर यांच्या मुर्त्या सापडल्या. तसेच त्या काळातील वीट बांधकामही सापडले आहे.
The Hindu news about excavation near Minjur
  • तीरुपलीवनम, मिन्जूर आणि पुलीकत या भागांत उत्खननामध्ये आजवर ‘चोल’ साम्राज्याच्या अनेक बाबी सापडल्या असल्याचा उल्लेख देखील बातमीमध्ये बघायला मिळतो.
  • गुगल मॅपवर शोधले असता या कत्तूपल्ली आणि परीया मदियुरमध्ये केवळ १५ किलोमीटरचे अंतर आहे. व्हिडीओतील शिवलिंगाचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास लक्षात येईल की हे शिवलिंग स्वयंभू नाही. व्यवस्थित कोरलेले आहे. याचाच अर्थ पल्लव किंवा चोल साम्राज्याच्या काळात जमिनीत गडप झालेल्या शिवलिंगावर कडूनिंबाचे झाड उगवले होते. तेच आता सापडले. यात चमत्कार म्हणण्यासारखे काहीच नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की पुजाऱ्याला भगवान शंकराचा दृष्टांत झाल्याचा दावा केवळ मराठी व्हायरल मजकुरात आहे. ज्या तमिळनाडूच्या भागात ही घटना घडली त्यांना देखील ही पुजाऱ्याची गोष्ट माहित नाही.

झाडाच्या मुळांखाली शिवलिंग सापडण्यामागे ऐतिहासिक कारण आहे. या भागात चोल आणि पल्लव साम्राज्याचे अनेक पुरावे पुरातत्व खात्याच्या उत्खननात सापडले आहेत. हे शिवलिंग देखील याच दोन्हीपैकी एका साम्राज्याच्या काळातील असण्याची शक्यता आहे कारण ती कोरीव मूर्ती आहे, स्वयंभू प्रकारातील नाही. म्हणजेच व्हायरल दावे फेक आणि दिशाभूल करणारे आहेत.

हेही वाचा: मक्का मदिनातील खऱ्या ‘मक्केश्वरनाथ शिवलिंगाचे’ दर्शन घडले आहे?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा