Press "Enter" to skip to content

उत्तरप्रदेश निवडणूक काळात सपा कार्यकर्त्यांना सापडलेला इव्हीएम मशीनने भरलेला टेम्पो? वाचा सत्य!

नुकताच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. परंतु निवडणूक काळात आणि त्यानंतरही भाजपच्या विजयाचे कारण इव्हिएम मशीनमधील गडबड असल्याचे आरोप अनेकांकडून केले जाताहेत. याच आरोपांना आधार म्हणून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना इव्हिएम मशीनने भरलेला टेम्पो सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

प्रशासनाद्वारे इव्हिएम बदलले जाणार होते परंतु समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डाव हाणून पाडला, अशाप्रकारचे दावे व्हायरल होत आहेत. सपा-कॉंग्रेस नेते आणि कॉंग्रेस सेवादलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक विजय जगताप, निलेश घरत आणि चंद्रकांत ब्रह्मेचा यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधला असता आम्हाला अधिक स्पष्टपणे दिसणारा व्हिडीओ बघायला मिळाला.

व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर इव्हिएम मशीनच्या बॉक्सवर पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे काही स्टिकर्स आम्हाला दिसले. ते स्क्रिनशॉट घेऊन झूम करून पाहिले असता, त्यावर ‘प्रशिक्षण/ जागरूकता इव्हिएम, Training/ Awareness EVM’ असे लिहिल्याचे आढळले.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात वाराणसी जिल्हाधिकाऱ्यावर निशाणा साधला होता. ‘वाराणसी जिल्हाधिकारी स्थानिक उमेदवारांना न कळवता इव्हिएमची ने आण करत आहेत. निवडणूक संचालनालयाने याकडे लक्ष द्यायला हवे.’ असे निवेदन त्यांनी दिले होते.

यावर वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले. ‘मोजणी अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणासाठी युपी कॉलेजमध्ये इव्हीएम मशीन घेऊन जात असताना काही लोकांनी सदर मशीन रोखून धरले आणि हेच मशीन निवडणुकीसाठी वापरले जाणारे इव्हीएम असल्याची अफवा पसरविण्यात आली. यामुळे गोंधळ निर्माण झाला, असे कौशल राज शर्मा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओमध्ये टेम्पोत घेऊन जात असलेले इव्हिएम मशीन निवडणुकीसाठी नव्हे, तर मोजणी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाणार होते. त्यावर तशा पद्धतीचे स्टिकर्स देखील आहेत.

हेही वाचा: बटण हत्ती समोरचे दाबले तरी मत कमळाला जातेय? बिहार निवडणुकीत EVM घोटाळा?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा