Press "Enter" to skip to content

आसाममध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या?

भाजप नेते आणि आसाम सरकारमधील आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. व्हिडीओ शेअर करताना शर्मा दावा करताहेत की ‘ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट’चे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांच्या स्वागतावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा (pakistan zindabad silchar airport) दिल्या गेल्या. निवडणुकीत युती करून अशा देशविरोधी शक्तींना पाठीशी घालणारी काँग्रेस देखील यानिमित्ताने उघडी पडली असल्याचा दावा देखील शर्मा यांनी केलाय.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

हिंदी न्यूज चॅनेल ‘न्यूज नेशन’ने याच व्हिडीओच्या आधारे सिल्चर विमानतळावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा (pakistan zindabad silchar airport) देण्यात आल्याची बातमी चालवली. एका खासदारासमोर याच देशात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या आणि बद्रुद्दीन अजमल शांतपणे या घोषणा ऐकत राहिले, असा दावा ‘न्यूज नेशन’ची अँकर करतेय.

अर्काइव्ह

इंग्रजी न्यूज चॅनेल ‘सीएनएन न्यूज १८’ने देखील हा व्हिडीओ चालवत तोच दावा केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

भाजप नेते हेमंत शर्मा यांनी केलेल्या या दाव्यानंतर लगेचच ‘ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या आरोपासंबंधीचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पक्षाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार सिल्चर विमानतळावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नाही, तर ‘अजीज खान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

आगामी निवडणुकीत ‘ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट’शी काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी होत असलेली युती तोडण्यासाठी भाजपकडून हे राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा देखील पक्षाकडून करण्यात आलाय.

या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या अनेक व्हिडीओमधील नारेबाजी लक्ष्यपूर्वक ऐकली, त्यावेळी खरंच व्हिडिओमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नाही, तर ‘अजीज खान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात येत असल्याचे लक्षात आले.

यासंदर्भात ‘अल्ट न्यूज’ची बातमी देखील आमच्या वाचनात आली. ‘अल्ट न्यूज’ने थेट आमदार अझीझ खान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी बोलताना अझीझ खान यांनी सांगितले की “पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी केली गेल्याचा दावा साफ खोटा आहे. AIUDF अध्यक्षांच्या आगमनावेळी आपल्याबरोबर इतर अनेक आमदार उपस्थित होते. त्यावेळी जमलेल्या समर्थकांकडून प्रत्येकाच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. पाकिस्तान जिंदाबादची नारेबाजी केली गेल्याचा आरोप केवळ आणि केवळ बदनामीच्या उद्देशाने केला जात आहे. आम्ही यासंदर्भात कठोर कारवाई करू”

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सिल्चर विमानतळावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आलेल्या नाहीत, तर ‘अजीज खान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. भाजप नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलेल्या दावा चुकीचा असून त्याआधारे देण्यात आलेल्या बातम्या देखील चुकीच्या आहेत.

हे ही वाचा- पाकिस्तानच्या संसदेत लावण्यात आले ‘मोदी-मोदी’चे नारे?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा