उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोत योगी आदित्यनाथ यांच्या समोर एक लॅपटॉप आणि त्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर आगीचे दृश्य दिसतेय. दावा करण्यात येतोय की योगी आदित्यनाथ हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचा अंत्यसंस्कार लाईव्ह (Hathras victim Cremation Live) बघताहेत.
ट्विटरवर इतरही अनेक युजर्स मोठ्या प्रमाणात हा फोटो याच दाव्यासह शेअर करताहेत.
फेसबुकवर ‘जय भीम चॅनेल’ या पेजवरून यासंदर्भातील व्हिडीओ न्यूज शेअर करण्यात आलीये. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारा मुख्यमंत्री आपल्या घरी बसून पीडितेवरील अंत्यसंस्कार लाईव्ह बघत असल्याचं (Hathras victim Cremation Live) म्हटलंय.
पडताळणी:
व्हायरल फोटोची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही हा फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला ANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवर मूळ फोटो मिळाला. मूळ फोटोत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या खुर्चीवर बसलेले असून त्यांच्यासमोर एक लॅपटॉप आहे. लॅपटॉपची स्क्रिन ब्लर करण्यात आलेली आहे.
स्क्रिन ब्लर करण्यात आली असली तरी फोटोच्या कॅप्शनमधील माहितीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळचा हा फोटो आहे.
संवादादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कुटुंबियांना २५ लाख रुपये, कुटुंबातील एका व्यक्तीस कनिष्ठ सहायक पदावर नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले, अशी माहिती विविध माध्यमांनी दिली आहे.
दरम्यान, आदल्या रात्री हाथरस पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय मध्यरात्री परस्परच पीडितेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती घटनास्थळावरून लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या ‘इंडिया टुडे’च्या तनुश्री पांडे यांनी दिली होती.
उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना आणि स्थानिकांना घरात कोंडून पीडितेचे अंत्यसंस्कार पार पाडले होते. कुटुंबाला त्यांच्या मुलीचे अंत्यदर्शन देखील घेऊ देण्यात आले नाही, असे पांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. त्यांनी अंत्यसंकराचा फोटो देखील शेअर केला होता.
पीडितेच्या अंत्यसंस्काराचा हाच फोटो योगी आदित्यनाथ यांच्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर चिपकवून त्या फोटोच्या आधारे योगी आदित्यनाथ पीडितेचे अंत्यसंस्कार लाईव्ह बघत असल्याचा दावा केला जातोय. हे एडीट सुद्धा एवढ्या वाईट पद्धतीने केलेय की निरखून पाहिल्यास लक्षात येईल लॅपटॉपपेक्षा त्याच्यावर दिसणारं दृश्य मोठं दिसतंय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला योगी आदित्यनाथ यांचा व्हायरल फोटो एडिटेड आहे. मूळ फोटोशी छेडछाड करून तो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.
हे ही वाचा- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा म्हणून हा फोटो शेअर करताय? थांबा!
[…] हे ही वाचा: योगी आदित्यनाथ हाथरस पीडितेवरील अंत्… […]
[…] हे ही वाचा- योगी आदित्यनाथ हाथरस पीडितेवरील अंत्… […]