सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. फुटेजमध्ये एक मुलगा एका विद्यार्थिनीवर चाकूने वार करताना बघायला मिळतोय. दुसऱ्या एका मुलाकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तो बेफामपणे चाकूने वार करणे सुरूच ठेवतोय.
सोशल मीडियावर दावा केला जातोय की घटना बिहारमधील गोपालगंज येथील असून विद्यार्थिनीवर चाकूने वार करणाऱ्या इसमाचे नाव गुड्डा असरफ अली आहे.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या सहाय्याने शोधल्या असता आम्हाला दैनिक भास्करच्या वेबसाईटवर प्रकाशित बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार घटना बिहारमधील माझागढ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रतापपूर गावातील आहे.
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने त्याआधारे पोलिसांनी गुड्डा असरफ अली याला अटक केली आहे. पीडित मुलीने छेडछाडीला विरोध केल्याने गुड्डा असरफ अलीने तिच्यावर हल्ला केला. त्याने यापूर्वी देखील छेडछाडीचा प्रयत्न केला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याविषयीयी त्याच्या घरच्यांच्या देखील कानावर घातले होते.
पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी या संदर्भात भास्करशी बोलताना सांगितले की हे लव्ह जिहादचे प्रकरण नाही. या प्रकरणातील पीडित मुलगी देखील मुस्लिम समुदायातील आहे. या घटनेनंतर आरोपी मुलगा घटनास्थळाहून पळून गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओतील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणामध्ये कुठेही हिंदू-मुस्लिम असा अँगल नाही. पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही मुस्लिम समुदायातील आहेत.
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment