पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (AAP) जनतेचा कौल मिळाला. याच नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘आप’ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना निमंत्रित केल्याचे दावे व्हायरल होतायेत. याआधारे ‘आप’ भाजप आणि संघाची बी टीम असल्याचा दावा केला जातोय.
‘आम आदमी पार्टी के मंत्रियों के शपथ ग्रहण समारोह में RSS प्रमुख मोहन भागवत जी का आना बहुत कुछ बयां करता है,,, अंधभक्तो ने कहा हमारा उनसे कोई रिश्ता नही,,,।’ असा मजकूर फोटोवर लिहून व्हायरल केला जातोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक केतन देशमुख यांनी फेसबुक प्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिला असता विविध बातम्यांतून असे लक्षात आले की शपथविधी समारंभात उपस्थित असलेली व्यक्ती सरसंघचालक मोहन भागवत नसून हरियाणाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय (Bandaru Dattatreya) आहेत.
शहीद भगतसिंह यांचे गाव असलेल्या खटगड येथे २० मार्च रोजी मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्यासह १० आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, आप नेते मनिष सिसोदिया इत्यादी नेते उपस्थित होते.
बंडारू दत्तात्रेय आणि मोहन भागवत :
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की आम आदमी पक्षाच्या पंजाबमध्ये निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित असल्याचे दावे फेक आहेत. व्हायरल फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती मोहन भागवत नसून हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आहेत.
हेही वाचा: पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयानंतर पोलिसांसमक्ष खलिस्तान जिंदाबादच्या नारेबाजीचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]