पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकताच तामिळनाडूचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी 31,500 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर आता सोशल मीडियावर या दौऱ्याच्या संदर्भाने एक ग्राफिक व्हायरल होतंय. व्हायरल ग्राफिकमध्ये ग्राफिकमध्ये रस्त्यावर ‘गो बॅक मोदी’ असं लिहिलेलं बघायला मिळतंय.
सोशल मीडियावर ग्राफिक शेअर करताना दावा केला जातोय की शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या तामिळनाडू मध्ये ‘गो बॅक मोदी’च्या घोषणाबाजीने मोदींचे स्वागत करण्यात आले.
ट्विटरवर देखील हाच फोटो अशाच प्रकारच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधण्याचा प्रयत्न केला असता ‘बांगला रिपब्लिक’ चॅनेलचे वरिष्ठ संपादक आणि इनपुट हेड मयूर रंजन घोष यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 11 जानेवारी 2020 रोजी हा फोटो ट्विट केला गेला असल्याचे बघायला मिळाले.
फोटो ट्विट करताना घोष यांनी लिहिलं होतं की ‘हा कलकत्ता शहरातील एक वर्दळीचा रस्ता असून इथे नेहमीच ट्राफिक बघायला मिळतं, पण आज ट्राफिक नव्हे तर ग्राफिक आहे’. कोलकात्यातील एस्प्लांडे रोडवरील हे दृश्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.
मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवर 13 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये देखील हा फोटो बघायला मिळाला. या बातमीनुसार फोटो नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधातील आंदोलनादरम्यानचा आहे. कोलकात्यातील एस्प्लांडे मेट्रो स्टेशनजवळील हे दृश्य आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो सध्याचा नसून जवळपास अडीच वर्षांपूर्वीचा आहे. शिवाय या फोटोचा मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याशी काहीही संबंध नाही.
सोशल मीडियावरील व्हायरल फोटो तामिळनाडूतील नसून कोलकात्यातील आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधातील आंदोलना दरम्यानचा हा फोटो मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याच्या संदर्भाने चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment