Press "Enter" to skip to content

पालघर हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादी नेत्याचा कारच्या आगीत होरपळून मृत्यू?

‘भगवान के घर देर है अंधेरे नहीं, कर्मा इज ए बीच’ अशा कॅप्शन्ससह राष्ट्रवादी पक्षाचे नेते संजय शिंदे (ncp leader sanjay) यांचा कारच्या आगीत मृत्यू झाला. ते पालघर साधूंच्या हत्याकांडात मुख्य आरोपी होते. त्यांच्या कर्मानेच त्यांना शिक्षा दिली, असे दावे करणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होताहेत.

Advertisement
Source:Facebook

‘पालघरमध्ये हिंदू साधूंच्या हत्याकांडाचे प्रमुख आरोपी असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते संजय शिंदे शॉर्ट सर्किटमुळे कारच्या आगीत भस्मसात झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. कर्माने धडा शिकवला. उद्धव ठाकरे देवांशी खेळ करू नका’ अशा आशयाच्या कॅप्शन सोबत जळत्या कारसह शिंदे यांचा फोटो नंदगोपाल के.एम या ट्विटर युजरने ट्विट केले आहे.

बातमी करेपर्यंत तब्बल २१०० लोकांनी हे ट्विट रीट्विट केलंय.

अर्काइव्ह लिंक

विजय डोंगरे या फेसबुक युजरने ‘मोदी फॅन्स’ या ग्रुपवर शेअर केलेल्या पोस्टला ३३१ लोकांनी शेअर केले होते आणि ५०५ जणांनी त्यावर कमेंट केली होती. आग लागलेल्या कारच्या फोटोसह त्यांनी ‘पालघर साधुओं की हत्या के आरोपी NCP नेता संजय शिंदे अपनी कार में जिंदा जल कर मर गए । प्रकृति अपना उधार ब्याज सहित वसूल करती हैं।’ अशा प्रकारे कॅप्शन दिले आहे.

अर्काईव्ह लिंक

‘आय सपोर्ट मोदी सरकार’ या ग्रुपवर सुद्धा अशाच प्रकारे एक पोस्ट शेअर केली आहे. ‘कार जलने से कुत्ते की मौत’ अशा शब्दात कॅप्शन देऊन फोटो शेअर केले आहेत. त्यास १६२ लोकांनी शेअर केलेय.

अर्काइव्ह लिंक

सोशल मीडियात अशा अनके पोस्ट आहेत. यास व्हॉट्सऍप देखील अपवाद नाही. याच प्रकारचे मेसेज आणि फोटोज तिकडेही व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक यशवंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी कारच्या आगीची घटना कधी, कुठे, कुणासोबत घडली याविषयी तपास केला.

कारच्या आगीची घटना:

विविध माध्यमांमधील बातम्यांनुसार नाशिकमधील निफाडचे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते संजय शिंदे (ncp leader sanjay) यांच्या चालत्या कारला आग्रा-मुंबई हायवेवर आग लागली. ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते परंतु सेन्ट्रल लॉकमुळे दरवाजे उघडणे शक्य झाले नाही. पोलिसांच्या आणि स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार गाडीत सॅनिटायझरची बाटली होती, त्यातील अल्कोहोलच्या प्रमाणामुळे तिनेही पेट घेतला. यातच शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला. ते द्राक्षाचे व्यापारी होते. कीटकनाशके आणण्यासाठी पिंपळगावला चालले असताना हा प्रकार घडला.

पालघर हत्याकांड आरोपी?

संजय शिंदे हे पालघर हत्याकांडातील प्रमुख आरोपी होते असा दावा व्हायरल पोस्टमध्ये केलाय. त्यामुळे तसे सर्च करून पाहिले असता अशी कुठलीही बातमी सापडली नाही. हिंदू साधूंच्या हत्येला धार्मिक रंग देणाऱ्या लोकांना उत्तर म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ताब्यात घेतलेल्या १०१ आरोपींची नावे जाहीर केली होती. यात एकही मुस्लीम नाव नसल्याचेही सांगितले होते. या यादीमध्येसुद्धा बारकाईने शोधाशोध केली असता संजय शिंदे असे नाव सापडले नाही.

राष्ट्रवादी नेत्याचा संबंध?

आरोपींच्या यादीत संजय शिंदे हे नाव नसल्याने आम्ही वेगवेगळ्या कीवर्ड्सचा आधार घेऊन पुन्हा सर्च करण्याचा प्रयत्न केला. यात ‘पालघर हत्याकांड राष्ट्रवादी कॉंग्रेस’ अशा अर्थाच्या काही कीवर्ड्सचा सुद्धा वापर केला तेव्हा काही बातम्या समोर आल्या.

माध्यमांमधील बातम्यांनुसार घटनास्थळी चित्रित झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिसल्याने महाराष्ट्र पोलीस आणि सीआयडीने स्थानिक राष्ट्रवादी नेत्यास समन जारी केले होते. त्याविषयी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. गर्दी पांगवण्यात मदत व्हावी म्हणून या नेत्यास बोलावण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. परंतु त्यांचेही नाव संजय शिंदे नसून काशिनाथ चौधरी असे आहे. याविषयी ‘NCP leader Kashinath Chaudhary summoned in Palghar mob lynching case’ याच शीर्षकासह झी न्यूजने बातमी प्रसिद्ध केली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार कारच्या आगीमध्ये मृत्यू पावलेली व्यक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संजय शिंदे असल्याचे सिद्ध झाले; परंतु ते नाशिकमधील निफाडचे रहिवासी असून त्यांचा पालघर हत्याकांडाशी काही एक संबंध नाही. याचाच अर्थ व्हायरल मेसेज आणि पोस्टमधील दावे निराधार आणि खोटे आहेत.

हेही वाचा: ‘महाराष्ट्रात ‘जय श्रीराम’चा घोष करणाऱ्यांवर कारवाई’ म्हणत भाजप कार्यकर्ते पेरतायेत अफवा!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

  1. मुरलीधर पाटील मुरलीधर पाटील October 22, 2021

    वास्तविक पाहता भाजपा ची कीव वाटते मत मागण्या साठी किती कुबल्या घेतील हे राम मंदिर पाकिस्तान मुस्लिम आणि आता 70 वर्षात काँगेस ने कसे लुटले ते दाखंवण्यात अप्यशी झाले नंतर नवीन काहीही धार्मिक आणि भावनिक लोकांना आवाहन करून धर्म भ्रष्ट राजकारण्यांची साखळी निर्माण करून पैसे उकळण्याचा डाव रचत आहेत की काय असा समज जन माणसात होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा