सोशल मीडियात अनेक दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओतील व्यक्ती असे सांगत आहे की अँगस मेडिसन (Angus Medicine) नावाच्या अर्थ शास्त्रद्याने जगाचा आर्थिक इतिहास लिहिला. त्यात त्याने भारताच्या प्रचंड श्रीमंतीविषयी लिहिताना इसवी सन ० ते १४९०-९९ पर्यंत भारताचा जीडीपी जगाच्या एकूण जीडीपीच्या ६६% होता असे सांगितल्याचा दावा केला जातोय.
१५०० नंतर भारतात ‘वास्को-द-गामा’ आला आणि जीडीपी घसरला. शिवाय ‘वास्को-द-गामा’ला भारत सापडला नव्हता, गुजराती व्यापारी कान्हाभाई यांनी त्यास भारतात आणले होते, असेही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन यांनी सदर व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हिडीओत उल्लेख असलेल्या अँगस मेडीसन (Angus Medicine) यांचे ‘द वर्ल्ड इकॉनॉमी मिलेनियम पर्स्पेक्टीव्ह’ हे पुस्तकच डाऊनलोड केले आणि संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकात सांगण्यात आले आहे की मुघल साम्राज्याच्या काळात भारताचे अर्थकारण चांगले होते. इसवी सन १७०० ते १८५० च्या दरम्यान ते घसरले कारण मुघल साम्राज्याचा अस्त झाला आणि इंग्रज आले.
पुस्तकात दिलेली आकडेवारी जर पाहिली तर आपल्या असे लक्षात येईल की भारताचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या तुलनेत इसवी सन ० ते १००० दरम्यान ३२.९१% होता. इसवी सन १००० मध्ये २८.८९% होता, १५०० मध्ये २४.४८% होता तर १६०० मध्ये २२.५३ इतका होता. या आकडेवारीतून हे सिद्ध होते की भारताचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या ६६% एवढा कधीच नव्हता. व्हायरल व्हिडीओतील दावा फेक आहे.
व्हायरल व्हिडीओत असेही सांगितले आहे की ‘वास्को-द-गामा’ १४९८ साली भारतात आला आणि त्यानंतर भारताच्या जीडीपीमध्ये मोठा फरक दिसू लागला. तर हा दावा देखील निराधारच आहे कारण वरील आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी क्रमाक्रमाने घसरतानाच दिसत आहे. यात ‘वास्को-द-गामा’च्या येण्याचा संबंध दिसून येत नाही. चीनचा जीडीपी देखील भारताच्या बरोबरीनेच होता.
याच व्हिडीओमध्ये असा दावा केला आहे की ‘वास्को-द-गामा’ला भारत सापडला नाही, गुजराती व्यापारी कान्हाभाई त्यास घेऊन आला. यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की अँगस मेडीसन यांचे ‘द वर्ल्ड इकॉनॉमी मिलेनियम पर्स्पेक्टीव्ह’ या पुस्तकाचा दाखला देऊन भारताचा जीडीपी जगाच्या ६६% इतका होता सांगणारे दावे अगदीच निराधार आणि फेक आहेत. आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी जगाच्या तुलनेत २२ ते ३२ टक्के इतका होता.
हेही वाचा: ‘वास्को-द-गामा’ने भारत शोधला नाही, त्यास कान्हाभाई नावाच्या व्यापाऱ्याने भारतात आणलं? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]