Press "Enter" to skip to content

‘ऑपरेशन अर्णव’ कसे पार पडले सांगत व्हायरल होणाऱ्या पोस्ट्स किती खऱ्या किती खोट्या?

‘ऑपरेशन अर्णव’ (operation arnab) अंतर्गत तब्बल ४० मोठ्या अधिकाऱ्यांनी महिनाभर इतर सर्व महत्वाची कामे बाजूला ठेऊन अर्णव गोस्वामींना अडकवण्यासाठी व्यूव्हरचना केली आणि गोस्वामींना खोट्या केसमध्ये अटक करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियातून व्हायरल होतोय.

Advertisement
operation arnab FB post check post marathi
Source: Facebook

अर्काईव्ह लिंक

फेसबुकवर ‘इतिहास पुछता है’ या पेजसह महेश कुलकर्णी, दीपक भोसले, नवीन चंद्रा यांसारख्या अनेक पर्सनल अकाऊंट्सवरूनही सदर पोस्ट शेअर झालीय.

हीच पोस्ट व्हॉट्सऍप मेसेज बनून विविध ग्रुप्सद्वारे व्हायरल होतेय. याबद्दल ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेश दुर्गे आणि यशवंत पाटील यांनी माहिती दीई आणि पडताळणी करण्यास सांगितले.

पडताळणी:

व्हायरल पोस्ट मध्ये अनेक दावे आहेत. त्याची एकेक करून पडताळणी होणे गरजेचे आहे.

१. हातातील दुसरी कामे सोडून ४० मोठ्या अधिकाऱ्यांना अर्णब गोस्वामीला अडकवण्याच्या कामी लावले?

व्हायरल पोस्टमध्ये ज्या टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे ती बातमी आम्ही व्यवस्थित वाचली. त्यामध्ये कुठेही अर्नबच्या अटकेसाठी (operation arnab) ४० लोकांची टीम महिन्याभरापूर्वी गठीत करण्यात आल्याचा उल्लेख नाही.

व्हायरल दाव्यानुसार अर्णबच्या ऑफिसची बॅलन्स शीट, कर्मचाऱ्यांचा पगार, दिवाळी बोनस, टिश्यू पेपर सॅनिटायझर खरेदी बिल्स सुद्धा तपासले परंतु त्यात काहीही सापडले नाही म्हणून अन्वय नाईक आत्महत्या केस उकरून काढली असा दावा केलाय परंतु असा एकही शब्द त्या बातमीत नाही.

बातमीतील सर्व घडामोडी अर्णबला अटक करताना (operation arnab) काय काय खबरदारी घेण्यात आलेली, कोण कोण होतं याविषयीचा उल्लेख आहे. त्या आधीच्या इतर चौकशीचा उल्लेख नाही.

२. शरद पवारांनी अन्वय नाईक कुटुंबियांना बोलावून पैशाचे आमिष देत केस पुन्हा सुरु करण्याचा सल्ला दिला?

‘चेकपोस्ट मराठी’ने या आधीच अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचे व्हायरल फोटो आणि त्याविषयीच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. त्यात त्या सर्व भेटी २०१९ मधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या काळात अर्णब गोस्वामी आणि महराष्ट्र सरकारच्या वितुष्टाचा काहीएक संबंध नव्हता. ती संपूर्ण बातमी ‘येथे‘ वाचू शकता.

३. अन्वय नाईक यांचे केवळ ८३ लाख अर्णव गोस्वामीने थकवले होते तरीही अर्णव विरोधातच कांगावा का?

अर्णव गोस्वामीने केवळ ८३ लाख थकवले होते असे म्हणत व्हायरल पोस्ट मध्ये ८३ लाख किरकोळ असल्याचे भासवले आहे. सोबतच हे सुद्धा लिहिले आहे की आत्महत्येच्या चिट्ठीत इतर दोघांची नवे आणि त्यांची थकबाकी सुद्धा लिहिली आहे परंतु त्यांना अटक नाही न त्यांचे नाव समोर आले.

वस्तुस्थिती अशी की अन्वय नाईक यांचे तीन लोकांनी मिळून ५.४० कोटी थकवले असल्याचे चिट्ठीत लिहिले आहे. फिरोज शेख यांनी ४ कोटी, नितेश सारडा यांनी ५५ लाख आणि अर्णव गोस्वामी यांनी ८३ लाख थकवले असा उल्लेख आहे.

अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक यांनी त्यांच्या पतीच्या आणि सासूच्या निधनाला २ वर्षे झाली तरी न्याय मिळाला नाही सांगत जनतेला पाठिंब्यासाठी साद घालणारा व्हिडीओ तयार केला होता यामध्ये अर्णव गोस्वामीने अन्वय आणि त्यांच्या कुटुंबियांना पैसे तर दिले नाहीच नाहीच पण सतत धमक्या दिल्या असा आरोप केला होता. यात त्यांनी स्वतःच्या आणि मुलीच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्यास अर्णब गोस्वामी आणि वराडे व पारसकर या दोन पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे असे सांगितले होते.

४. आत्महत्येच्या चिट्ठीत तिघांची नावे पण केवळ अर्णब गोस्वामीस अटक?

तिघांची नावे असूनही केवळ अर्णबला अटक करून छळ चालू आहे असा दावा व्हायरल पोस्टमध्ये केलाय परंतु वस्तूस्थितीत तिघांनाही अटक झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. कांदिवलीतून फिरोज शहा आणि जोगेश्वरी मधून नितेश सारडा या दोघानाही अटक केल्याची बातमी अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केलीये.

५. अन्वय नाईक यांनी संपूर्ण परिवारासह आत्महत्या न करता केवळ आईसह आत्महत्या केली यातही षड्यंत्र?

अक्षता नाईक आणि अन्वय नाईक यांची घटस्फोट केस चालू होती. कर्जबाजारी व्यक्ती संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करतो यांनी केवळ आईसह केली. मुलगी सुद्धा आईच्या वळणावर जातेय म्हणून अन्वय नाराज होते असे दावे सुद्धा केले गेले आहेत.

वस्तुस्थिती अशी की अन्वय यांची आई कुमुद अलिबागच्या घरी तर मुलगी आणि पत्नीसह अन्वय मुंबईला रहात. आत्महत्येच्या दिवशी अन्वय आईसह मुंबईहून अलिबागला आले होते. त्यांच्यासोबत पत्नी व मुलगी नव्हती. याविषयी अलिबागची काळजी घेणाऱ्या केअरटेकर मधुकर पाटीलने आपल्या जबानीत सांगितले आहे. याविषयी ७ मे २०१८ च्या इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत विस्तृत माहिती आहे.

अन्वय आणि अक्षता यांच्यामध्ये घटस्फोट होणार होता किंवा काही बेबनाव होता, अथवा अन्वय यांना मुलीच्या वागणुकीबद्दल काळजी वगैरे होती याविषयी कुठेही अधिकृत उल्लेख नाहीये.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये अन्वय नाईक यांना अन्यव, अर्णब गोस्वामी यांना अरनब, अन्वय यांच्या पत्नीचे अक्षता नाव बदलून आकांक्षा अशा साध्या पण महत्वाच्या चुका व्हायरल पोस्टमध्ये सापडल्या. तसेच त्यातील काही दावे अगदीच निराधार असल्याचे निष्पन्न झाले. पोस्टमध्ये ज्या बातमीचा आधार दिला गेलाय त्या बातमीचा आणि पोस्ट मधील दाव्यांचा काहीएक संबंध नाही हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: अर्णब गोस्वामी यांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिल्याच्या व्हायरल बातमीचे सत्य भलतेच!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा