Press "Enter" to skip to content

पायी चालणाऱ्या मजुरांवर फुले उधळणाऱ्या हेलीकॉप्टरचा फोटो एडीटेड

पायी चालणाऱ्या मजुरांवर फुले उधळणाऱ्या हेलीकॉप्टरचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. अनेकांनी कलात्मक कॅप्शनसह तो शेअर केलाय.

“असं म्हणतात की एक फोटो हजार शब्दांच्या तोडीचा असतो, पण हा मात्र लाखो शब्दांच्या तोडीचा आहे. मला माहित नाही हा फोटो कुणी क्लिक केलाय, तो मला फेसबुकवर मिळाला. परंतु मला असं वाटतं की २०२० सालचे एकुणात सगळे बारकावे केवळ एका चौकटीत ज्याने पकडले त्या फोटोग्राफरला नक्कीच काही पारितोषिक मिळायला हवं. इतिहास अशाच काही फोटोग्राफ्स मधून तयार होत असतो.” असं काहीसं मत व्यक्त करत मयूर पुरी या ट्विटरधारकाने मजुरांवर फुले उधळणाऱ्या हेलीकॉप्टरचा फोटो ट्विट केलाय. ट्विटनंतर अवघ्या १२ तासात तो फोटो २९५ वेळा रीट्वीट झाला होता. त्यावर जवळपास बाराशे लाईक्स मिळाले होते.

पडताळणी:

खरेतर पाहता क्षणीच हा फोटो कुणा फोटोग्राफरने असा क्लिक केलेला नसून तो एडीट केलेला आहे हे लक्षात यावं इतक्या वाईट पद्धतीने तो एडीट केला आहे. त्यात दोन रंगाचे आकाश एकमेकांत मिसळवण्याचा प्रयत्न केलाय हे सहजच लक्षात येत आहे, किंबहुना माणसाच्या एवढ्या जवळ हेलीकॉप्टर आलं तर त्याचा मानवी आकृतीच्या तुलनेत आकार केवढा असेल याचा अंदाज कुणीही लावू शकतं. एवढंच नव्हे तर एवढ्या जवळ हेलिकॉप्टर आल्यावर जमिनीवर किती जोराचा वारा असेल, त्या मजुरांचे केस, कपडे सर्व किती अस्ताव्यस्त होतील याचाही अंदाज सुज्ञास सहज येईल. तरीही आम्ही पुराव्यानिशी पडताळणी करण्याचं ठरवलं आणि गुगल रिव्हर्स इमेज सर्चचा आधार घेतला. आम्हाला दोन वेगवेगळे फोटो सापडले. एक होता पायी चालणाऱ्या मजुरांचा. जो बीबीसीने आपल्या एका बातमी मध्ये वापरला होता.

आणि दुसरा होता फुले उधळणाऱ्या हेलीकॉप्टरचा, जो नॉर्थ इस्ट लाइव्ह टीव्हीच्या वेबसाईटने एका बातमीच्या संदर्भात वापरला होता. विशेष म्हणजे हा फोटो ३ मे रोजी कोरोना विरुद्ध लढणाऱ्या मेडिकल स्टाफवर फुले उधळणाऱ्या सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरचा नसून जुनाच कुठल्या संचलनाचा आहे. कारण या साईटने सैन्यदल पुष्पवृष्टी करणार असल्याची आदल्या दिवशी जी बातमी दिली होती त्यात वापरलेला हा फोटो आहे. खाली दिलेल्या बातमीच्या स्क्रिनशॉट मध्ये आपल्याला ‘मे २, २०२०’ अशी  बातमीची तारीख दिसेल.

वस्तुस्थिती:

पायी चालणारे मजूर आणि जुन्या कुठल्याशा संचलनात फुले उधळणारे हेलिकॉप्टर अशा दोन वेगवेगळ्या फोटोंना एकत्र करून तो व्हायरल झालेला तो फोटो एडीट केला गेला आहे. सैन्यदलाचे फ्लाय पास्ट हे कोरोना वॉरीअर्स म्हणजेच कोरोना विरोधात लढणाऱ्या मेडिकल स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचार्यांचे आभार मानण्यासाठी केला गेला होता पायी चालणाऱ्या मजुरांसाठी नाही. व्हायरल होत असलेला फोटो एडीटेड आहे, फेक आहे. त्यामुळे हा फोटो आम्ही ‘चेकपोस्ट’ वर अडवत आहोत.

हे ही वाचा- इंस्टाग्राम वर मुलींचे न्यूड फोटोज टाकून गँग रेप करणाऱ्या मुलांची एक्स्पोज लिस्ट फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा