Press "Enter" to skip to content

‘तिथे एक नव्हे, दोन गिधाडे होती, असं ऐकून फोटोग्राफरने शरमेने आत्महत्या केली.’ सांगणारी व्हायरल गोष्ट फेक

‘गिधाडे संपूर्ण भारतात हातात कॅमेरे घेऊन हजारो किलोमीटर चालत कामगारांचे फोटो घेण्यात व्यस्त आहेत. ते कामगारांच्या मृत्यूबद्दल चिंता करण्यापेक्षा टीआरपी वाढविणाऱ्या बातम्यांविषयी अधिक काळजी घेतात. कामगार आणि मुलांच्या शरीरावर मसाले ओतून ब्रेकिंग न्यूज गोळा करण्यात व्यस्त आहेत.’

Advertisement

अशा आरोपांच्या फैरी झाडण्यासाठी ‘एका’ फोटोग्राफरच्या गोष्टीचा मेसेज व्हायरल होतोय. सोशल मिडीया वॉरीयर्स वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये हा मेसेज व्हायरल करण्यात  व्यस्त आहेत.

काय आहे मेसेज?

तुम्हाला १९९३ सालचा हा फोटो आठवतो का? सुदानमध्ये काढलेल्या या फोटोमध्ये एक गिधाड त्या भुकेलेल्या लहान मुलीच्या मरणाची वाट पाहत आहे. या फोटोचे शीर्षक होतं “द व्हलचर अँड द लिटल गर्ल” फोटोग्राफर होता साउथ आफ्रिकेचा #केविन कार्टर…! त्या वर्षीचा पुलित्झर प्राईज विजेता..!!

असे असून देखील त्याने आपल्या वयाच्या केवळ ३३ व्या वर्षी आत्महत्या केली…. कारण काय तर… एकाने फोनवर त्याला प्रश्न विचारला

“त्या मुलीचं शेवटी काय झालं?”

कार्टर म्हणाला, “मला माहित नाही, मी खूप घाई गडबडीत होतो आणि मला विमान पण पकडायचं होतं.”

समोरच्या माणसाने दुसरा प्रश्न विचारला, “तिथं किती गिधाडे होती”

कार्टर म्हणाला ‘मला वाटतं बहुतेक तिथं एकच गिधाड होतं’

फोनवरील माणसाने अत्यंत तुच्छतेने कार्टरला सांगितलं, “मी तुला सांगतो त्यादिवशी तिथे दोन गिधाडे होती, एक फोटोमध्ये असलेलं आणि दुसरं कॅमेऱ्यामागे असलेलं”

हे जहाल शब्द कार्टरला इतके अस्वस्थ करून गेले की शेवटी त्याने आत्महत्या केली. आज जर कार्टर जिवंत असता जर त्याने उपासमार झालेल्या बाळाला फक्त १/२ मैलांच्या अंतरावर असलेल्या युनायटेड मिशनच्या आहार केंद्रात नेलं असतं, किंवा जर त्या भुकेल्या मुलीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता तर…

लेखक -अज्ञात

पडताळणी:

‘द व्हलचर अँड द लिटल गर्ल’ हा फोटो जगप्रसिद्ध आहे, यात काही शंकाच नाही. पण तो फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरची केव्हिन कार्टरची जी कहाणी व्हायरल होतेय त्यात किती तथ्य आहे आणि या जगप्रसिद्ध फोटोग्रापरच्या आत्महत्येशी गिधाडांचा नेमका काय संबंध हे पडताळण्यासाठी आम्ही गुगलवर ‘द व्हलचर अँड द लिटल गर्ल’ असं टाकून सर्च केलं. त्यावेळी ‘टाईम’चा एक अभ्यासपूर्ण लेख आमच्या वाचनात आला. या लेखात अगदी सविस्तरपणे  केव्हिन कार्टरची संपूर्ण कर्मकहाणी मांडली आहे.

तिथं नेमकं काय घडलं होतं?

जेम्स नॅचवे हा फोटो जर्नलिस्ट म्हणजे कार्टरचा सहकारी. त्याने ‘टाईम’शी  बोलताना असं सांगितलं की, ‘सुदान मध्ये पडलेल्या दुष्काळाचे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी परवानगी मिळालेल्या फोटोग्राफर्समध्ये केव्हिन कार्टरचा समावेश  होता. तो जसा विमानातून उतरला तसा तो दुष्काळग्रस्तांचे फोटो काढायला लागला.

तिथे असणाऱ्या झाडी झुडपाजवळून फिरत असताना त्याला काही आवाज आले. त्याने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर त्या झुडपांतून एक छोटीशी मुलगी अन्नछत्राच्या दिशेने सरकत चाललेली दिसली.

जसा तो फोटो काढण्यासाठी पुढे गेला तसं तिथे एक गिधाड आलं. मग त्याने हळुवारपणे फोटो साठी फ्रेम सेट केली आणि तब्बल २० मिनिटं त्या पक्षाने पंख पसरावेत म्हणून वाट पाहिली. पण तसं झालं नाही.

शेवटी आहे त्याच पोझिशन मध्ये काही फोटोज घेतले आणि नंतर त्या गिधाडामागे पळत त्याला उडवून लावलं. जसं त्या मुलीने पुन्हा अन्नछत्राच्या दिशेने जायला सुरुवात केली तसं तो तिथून निघाला आणि एका झाडाखाली येऊन बसला. त्याने त्याची सिगारेट शिलगावली आणि देवाशी काहीतरी बोलत रडत बसला.”

“त्यानंतर तो डिप्रेस झाला होता” अशी त्याच्या सोबत असणाऱ्या फोटोग्राफरन ‘सिल्वा’ने पुढे माहिती जोडली. पुढे तो असंही म्हणाला की त्याला त्याच्या मुलीला मिठी मारावी असं सतत वाटत होतं.

‘टाईम’च्या या स्टोरी नुसार कार्टर अजून एक दिवस सुदान मध्ये थांबला आणि मग जोहनसबर्गला माघारी आला. त्यानंतर त्याचा हा फोटो ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने विकत घेतला आणि २६ मार्च १९९३ रोजीच्या अंकात प्रकाशित केला. १२ एप्रिल १९९४ म्हणजे तब्बल एक वर्षाने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने त्याला फोन करून पुलित्झर पुरस्कार मिळाल्याचं कळवलं.

केव्हिन कार्टरने त्या मुलीला मदत का नाही केली?

दरम्यानच्या काळात तो फोटो खूप ठिकाणी प्रसिद्ध झाला. त्यावर अनेक चर्चा झडल्या. फ्लोरिडाच्या ‘सेंट पिटसबर्ग टाईम्स’ने याविषयी लिहिलं की ‘ज्या माणसाने त्या मुलीच्या संघर्षाची करुण कहाणी टिपण्यासाठी कॅमेराची लेन्स सेट केली तो अगदी शिकाऱ्यांसारखा भासत होता. जणू तिथं दुसरं गिधाड होतं.’

‘रेअर हिस्टोरीकल फोटोज’ साईटवरच्या लेखात असं सांगितलंय की ‘रोगराईचा प्रसार होण्याची भीती लक्षात घेता फोटोग्राफर्सनी दुष्काळग्रस्तांना स्पर्श करायचा नाही, अशी ताकीदच त्यांना देण्यात आली होती.’

केव्हिनने आत्महत्या का केली?

टाईमच्या स्टोरीनुसार ‘केव्हीनने २७ जुलै १९९४ रोजी कार्बन मोनॉक्साईड सेवन करून आत्महत्या केली होती. त्यानं एक चिट्ठी लिहून ठेवली होती.’

काय होतं त्या चिट्ठीत?

‘मला माफ करा. आयुष्यातला दुखःद प्रवास हेच अधोरेखित करतोय की आनंद नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. मी उदास झालोय. फोनसाठी, भाड्यासाठी, मुलीला वाढवण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. भुकेने आणि जखमांनी ग्रासलेली मुलं, भेसूर हसणारे नराधम, नेहमीचे पोलीस, फाशीला चढवलेले गुन्हेगार या सर्व प्रतिमांनी त्रस्त झालोय. जर मी तेवढा नशीबवान असेल तर मी आता केनला (नुकताच वारलेला त्याचा एक मित्र) जाऊन भेटेल.’

‘टाईम’सोबत बोलताना केविनच्या मित्रांनी त्याची जी कहाणी सांगितली त्यानुसार केविनला जन्मापासूनच दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा सामना करायला लागला होता. १९८० साली  त्याची नोकरी गेल्यानंतर देखील त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

वस्तुस्थिती:

होय, हे खरंय की “द व्हलचर अँड द लिटल गर्ल” चा फोटोग्राफर केविन कार्टरला पुलित्झर मिळालं होतं. हे सुद्धा खरंय की त्याने वयाच्या ३३ व्या वर्षी आत्महत्या केली होती.

पण, त्याचा मित्र त्याला फोन करून ‘तिथे एक नव्हे, दोन गिधाडे होती’ असं म्हणाला आणि म्हणून त्याने आत्महत्या केली, ह्यात काहीही तथ्य नाही. 

हे वाक्य तर फ्लोरिडाच्या ‘सेंट पिटसबर्ग टाईम्स’ने वापरलं होतं.

हे ही खरं नाही की केविनला वेळ नव्हता आणि त्याला विमान पकडायचं म्हणून तो निघून गेला. वस्तुस्थिती अशी की तो त्या मुलीचं दुःख पाहून तिथेच बसून रडला आणि दुसऱ्या दिवशी अजून काही फोटोज काढून माघारी परतला.

अर्थातच तो त्या फोटोतल्या मुलीसोबत जे वागला त्याचा पश्चाताप म्हणून नव्हे तर वैयक्तिक कारणांमधून आलेल्या नैराश्यातून हतबल होऊन त्याने आत्महत्या केली. त्यामुळे ‘तिथे एक नव्हे, दोन गिधाडे होती, असं ऐकून फोटोग्राफरने शरमेने आत्महत्या केली.’ असं सांगणारी व्हायरल गोष्ट फेक असून तीला आम्ही ‘चेकपोस्टवर’च अडवत आहोत.

हे ही वाचा:

‘भारतीय राजाने ‘रोल्स रॉईस’ कारची बनवलेली कचरागाडी’ कहानी अच्छी है मगर सच्ची नहीं!

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा