‘द काश्मीर फाईल्स’चे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी हिंदूंचा आवाज दाबला जातोय असा आरोप करत केम्ब्रिज कॉलेजने स्वतः कार्यक्रम ठेऊन व्हिडीओ शूट करू दिले नाही तसेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने (University of Oxford) आंदोलकांच्या दबावाला बळी पडत कार्यक्रम रद्द केल्याचे आरोप करत ट्विट केले होते. याविषयी अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.
हा लोकशाही देशाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान असल्याचे आरोप अग्निहोत्री यांनी आपल्या व्हिडीओ निवेदनात केले आहेत.
विवेक अग्निहोत्री यांचे ट्विट:
अग्निहीत्रींच्या आरोपांना प्रमाण मानत भारतीय माध्यमांनी याविषयी बातम्या केल्या, अग्निहोत्रींच्या प्रतिक्रिया घेतल्या.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने सादर बाबीविषयी पडताळणी करण्यासाठी कीवर्ड्सच्या आधारे गूगल सर्च केले असता बीबीसी हिंदीचा एक रिपोर्ट आम्हाला मिळाला. या रिपोर्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या दाव्यांची शहानिशा केली आहे.
केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने अग्निहोत्रींना निमंत्रित केलेच नव्हते:
विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी ‘ह्यूमॅनिटी टूर’वर असल्याचे सांगत आहेत. याच अंतर्गत युरोपीयन देशांत विविध ठिकाणी ते आपले कार्यक्रम करतायेत. अग्निहोत्री यांनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या अशाच एका कार्यक्रमाचे पोस्टर शेअर केले होते. त्यावर सदर कार्यक्रम केम्ब्रिज विद्यापीठाच्या फित्झविलियम कॉलेजने (Fitzwilliam College) आयोजित केल्याचे भासवले गेले होते. परंतु फित्जविलियम कॉलेजने त्याच ट्विटवर रिप्लाय देत स्पष्ट केले की सादर कार्यक्रम ‘कमर्शियल बुकिंग’द्वारे केला जात आहे. याचे आयोजक फित्झविलियम कॉलेज अथवा केम्ब्रिज विद्यापीठ नाहीत.
तसेच बीबीसीनेही केम्ब्रिज विद्यापीठाशी संपर्क करून सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी फित्जविलियम कॉलेजच्या जन संपर्क अधिकारी निकोला यांनी असे सांगितले की ‘३० मे २०२२ रोजी लॉर्ड राणा फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी बुक केलेला होता. हे बुकिंग निव्वळ व्यावसायिक स्वरूपाचे होते. केम्ब्रिज विद्यापीठ अथवा फित्जविलियम कॉलेजचा विवेक अग्निहोत्रींशी काहीएक संबंध नाही. तसेच सदर सभागृहात चित्रीकरण करण्यासाठी आगाऊ संमती आवश्यक असते. अग्निहोत्री यांनी ऐनवेळी चित्रीकरणाचा आग्रह धरला, जो नियमबाह्य असल्याने नामंजूर झाला.’
बीबीसीच्या प्रतिनिधीस फित्जविलियम-केम्ब्रिज विद्यापीठाचे मेल द्वारे उत्तर:
ऑक्सफर्ड विद्यापीठानेही विवेक अग्निहोत्रींना निमंत्रित केले नव्हते:
फित्जविलियम कॉलेजप्रमाणेच बीबीसीने ऑक्सफर्ड विद्यापीठाशीही संपर्क साधला. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी असलेल्या स्टीवन रोज यांनी त्यावर उत्तर देत स्पष्ट केले आहे की ‘विवेक अग्निहोत्री उल्लेख करत असलेल्या कार्यक्रमाचा संबंध ऑक्सफर्ड युनियनशी आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठाशी नाही. ऑक्सफर्ड युनियन (Oxford Union) ही एक खाजगी आणि स्वायत्त वाद-विवाद संस्था आहे. ती ऑक्सफर्ड विद्यापीठाचा भाग नाही. ऑक्सफर्ड युनियनवर विद्यापीठाचे कुठलेही नियंत्रण नाही.’
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत आढळलेल्या बीबीसी हिंदीच्या पाठपुराव्यात हे स्पष्ट झाले की ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलेले आरोप आणि दावे फेक आहेत. केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड या दोन्ही विद्यापीठांनी अग्निहोत्री यांना कधीच निमंत्रित केले नव्हते. ज्या दोन कार्यक्रमांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्याचे आयोजक भलतेच असून कार्यक्रमासाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले सभागृह व्यवसायिक बुकिंगच्या माध्यमातून दिलेले होते.
हेही वाचा: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता दिला २०० कोटीचा चेक? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment